AIMIM in Bihar Election 2025 : गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत दमदार पुनरागमन करणाऱ्या काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. हरियाणापाठोपाठ महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठं अपयश आलं होतं. बिहारमध्ये आपल्या पराभवाचा सिलसिला थांबणार अशी आशा काँग्रेसचे नेते बाळगून होते. शुक्रवारी निवडणुकीचे कौल हाती आल्यानंतर या आशेवर पाणी फेरलं गेलं. विशेष बाब म्हणजे- बिहारमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षही काँग्रेसपेक्षा शक्तिमान ठरला. एमआयएमने या निवडणुकीत नेमकी कशी कामगिरी केली? त्यासंदर्भातील हा आढावा…
बिहारमध्ये एनडीएची पुन्हा मुसंडी
बिहारमध्ये यंदाही सत्ताधारी एनडीएलाच स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज बहुतेक एग्झिट पोलनी वर्तवला होता. शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात होताच भाजपासह त्यांच्या मित्रपक्षांनी आघाडी जोरदार मुसंडी घेत बहुमताचा आकडा गाठला. सायंकाळपर्यंत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली होती. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला पन्नाशीचा आकडा गाठण्यातही अपयश आलं होतं. पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य पक्षाला भोपळाही फोडता आलेला नव्हता. बिहारमध्ये एनडीएची लाट आली असताना असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही चांगली कामगिरी केली.
एमआयएमने कशी केली कामगिरी?
बिहारच्या एकूण लोकसंख्येत मुस्लीम समुदायाचा १७.७ टक्के इतका वाटा आहे. राज्यातील सीमांचल भागातील पूर्णिया, सहरसा, किशनगंज, मधेपुरा, कटिहार, अररिया या जिल्ह्यांमध्ये मुस्लीम मतदारांचा मोठा प्रभाव आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लीम बहुल मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी किंवा विरोधकांच्या महाआघाडीबरोबर युती न करता ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. एमआयएमने एकूण २९ उमेदवारांना विधानसभेचे तिकीट दिले होते आणि त्यापैकी २४ उमेदवार सीमांचल भागातील होते. या उमेदवारांपैकी पाच जणांनी निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.
आणखी वाचा : Congress Defeat in Bihar : काँग्रेस पक्ष नेमक्या कोणत्या दिशेने? बिहारमधील पराभव मोठ्या संकटाचे संकेत?
एमआयएम कोणकोणत्या मतदारसंघात विजयी?
सीमांचल भागातील जोकीहाट, बहादूरगंज, कोछधमन, अमौर आणि बैसी या पाच विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. जोकीहाट विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे मोहम्मद मुर्शीद आलम यांनी जनता दल युनायटेड पक्षाचे मंझर आलम यांचा पराभव केला. या मतदारसंघात प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचे उमेदवार सरफराज आलम तिसऱ्या स्थानी राहिले; तर राजदचे शहानवाझ चौथ्या स्थानावर फेकले गेले. मोहम्मद मुर्शीद आलमन यांना ८३ हजार ७३७ मते मिळाली आणि त्यांनी तब्बल २८ हजार ८०३ मताधिक्याने विजय मिळवला.
बहादूरगंजमध्ये एमआयएमचा काँग्रेसवर विजय
बहादूरगंज विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे मोहम्मद तौसिफ आलम यांनी काँग्रेसच्या मोहम्मद मसावार आलम यांना २८ हजार ७२६ मतांनी पराभूत केलं. कोछधमण विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे मोहम्मद सरवार आलम यांनी राजदच्या मुजाहिद आलम यांचा पराभव केला. सरवार आलम यांना ८१ हजार ८६० इतकी मतं मिळाली; तर काँग्रेसचे उमेदवार मुजाहिद आलम यांनी ५८ हजार ८३९ मतं मिळवली. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार बिना देवी यांना ४४ हजार ८५८ मतांवरच समाधानी राहावं लागलं.
अमौरमध्ये एनडीएच्या उमेदवाराला केलं पराभूत
अमौर विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे अख्तरुल इमान यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सबा जफार यांचा तब्बल ३८ हजार ९२८ मतांनी पराभव केला; तर बैसी विधानसभा मतदारसंघात गुलाम सरवर यांनी भाजपाचे उमेदार विनोद कुमार यांचा पराभव केला. या मतदारसंघात राजदचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिले. गुलाम सरवर यांना ९२ हजार ७६६ मतं मिळाली; तर विनोद कुमार यांनी ६५ हजार ५१५ इतकी मते घेतली. गेल्या विधानसभा निवडणुकीतही एमआयएमने मुस्लीम बहुल भागातील पाच मतदासंघात विजय मिळवला होता, मात्र त्यापैकी चार आमदारांनी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदमध्ये प्रवेश केला होता.
एमआयएम काँग्रेसपेक्षाही शक्तिमान
बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने काँग्रेसपेक्षाही चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसने या निवडणुकीत जवळपास ६० जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी सहा जागांवरच पक्षाला विजय मिळवता आला. दुसरीकडे एमआयएमने कमी जागा लढवूनही पाच जागांवर चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे ओवैसी यांच्या पक्षाचा विजयी स्ट्राइक रेट काँग्रेस पक्षाही जास्त असल्याचे दिसून आले. या निवडणुकीत काँग्रेसला अंदाजे पाच ते सहा टक्के मतं मिळाली; तर एमआयएमने दोन तीन टक्के मते आपल्या पारड्यात पाडून घेतली. २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसने १९ जागा जिंकल्या होत्या आणि त्यांच्याकडे ९.४८% मते होती. या तुलनेत २०२५ मध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी घट झाली असून, मतांची टक्केवारीही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
हेही वाचा : बिहारपाठोपाठ भाजपाचा जम्मू-काश्मीरमध्येही ऐतिहासिक विजय; पोटनिवडणुकीत काय घडलं?
विजयानंतर ओवैसी काय म्हणाले?
बिहारच्या निवडणुकीत एमआयएमचे पाच आमदार निवडणूक आल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सीमांचल भागातील मतदारांचे आभार मानले. एमआयएमच्या पाच उमेदवारांना विजयी केल्याबद्दल आपले आभार मानतो. या प्रदेशात गेल्या ११ वर्षांपासून आपण उभारलेला लढा यापुढेही सुरूच राहील. राज्यात भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येईल याचा मला अंदाज होता; पण त्यांना २०० हून अधिक जागा मिळणार याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. बिहारच्या जनतेचा जनादेश आपण मनापासून स्वीकारला पाहिजे, असं ओवैसी यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीशकुमार यांचंदेखील अभिनंदन केलं.
