BJP AI video controversy आसाम भाजपाच्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुस्लिमांना बेकायदा स्थलांतरित म्हणून दाखवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, भाजपा या व्हिडीओच्या माध्यमातून समाजात विष कालवण्याचे काम करीत आहे. भाजपाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. दुसरीकडे एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या व्हिडीओला घृणास्पद म्हटले आहे. हा व्हिडीओ वादग्रस्त का ठरतोय? विरोधकांनी नक्की काय आरोप केले? भाजपाची यावर प्रतिक्रिया काय? जाणून घेऊयात…

व्हिडीओत नक्की काय?

‘आसाम विना भाजप’ (Assam Without BJP) नावाच्या या व्हिडीओमध्ये, बुरखा आणि टोपी घातलेले महिला आणि पुरुष चहाच्या मळ्यांपासून ते विमानतळांपर्यंत असे सर्वत्र दिसत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) तयार केलेला या व्हिडीओच्या माध्यमातून भाजपाने ‘तुमचं मत काळजीपूर्वक निवडा’ (Choose Your Vote Carefully) असा संदेशही दिला आहे. हा व्हिडीओ सोमवारी उशिरा रात्री पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या शेवटी असे म्हटले आहे की, आसाममध्ये ९० टक्के मुस्लीम होतील आणि बेकायदा राज्यात शिरणेदेखील सोपे होईल.

व्हिडीओच्या अगदी शेवटी विनंतीदेखील करण्यात आली आहे की, मतदान विचारपूर्वक करा. आसाम भाजपाने व्हिडीओसोबत कॅप्शन लिहिले होते, “आम्ही पैजान यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही.” येथे ‘पैजान’ हा शब्द भाजपाने आसाम काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार तरुण गोगोई यांच्यासाठी वापरला आहे. कारण- राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे सातत्याने आरोप करीत आहेत की, गौरव गोगोई हे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालतात.

विरोधक का संतापले?

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी हा व्हिडीओ शेअर केला. त्यांनी निवडणूक आयोगाला टॅग केले आणि विचारले की, त्यांचा अशा पोस्टवर काही आक्षेप आहेत का? सुप्रिया श्रीनाते यांनी सांगितले की, भाजपा विष पसरवत आहे. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विचारले, “तुम्ही नेहमीप्रमाणे याचे समर्थन करीत राहाल आणि मूक प्रेक्षक राहाल का?” त्यांनी हेदेखील सांगितले की, गुरुवारी झालेल्या घटनेबाबत पक्ष गुवाहाटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करील.

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या व्हिडीओला घृणास्पद म्हणत व्हिडीओवरून भाजपावर टीका केली आहे. त्यांचे स्वप्न मुस्लीममुक्त भारत आहे, असा आरोपही ओवैसी यांनी केला आहे. ओवैसी म्हणाले, “भाजपा आसामने एक घृणास्पद एआय व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये भाजपा नसता, तर आसाम मुस्लीमबहुल झाला असता, असे दाखवले आहे. ते केवळ मतांसाठी भीती पसरवत नाहीत, तर ही त्यांची घृणास्पद हिंदुत्ववादी विचारसरणी आहे. भारतातील मुस्लिमांचे अस्तित्वच त्यांच्यासाठी एक समस्या आहे, त्यांचे स्वप्न मुस्लीममुक्त भारत आहे. या सततच्या तक्रारींव्यतिरिक्त त्यांच्याकडे भारतासाठी कोणतीही दूरदृष्टी नाही.”

भाजपाने यावर काय प्रतिक्रिया दिली?

आसाम भाजपचे प्रवक्ते रूपम गोरबामी म्हणाले, “हा व्हिडीओ वास्तव दाखवतो. तुम्ही आसामच्या १४ जिल्ह्यांमध्ये झालेल्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांकडे लक्ष दिले पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. धोका मुस्लिमांकडून नाही, तर बेकायदा मुस्लीम स्थलांतरितांकडून आहे. ते आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली झाले आहेत आणि सामाजिकदृष्ट्या आपले नुकसान करीत आहेत आणि आपले राजकीय अधिकारही हिरावून घेतील. “

ते म्हणाले, ” @BJP4Assam च्या व्हिडीओमध्ये बेकायदा स्थलांतरितांच्या धोक्याबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे, जे आसामची लोकसंख्या बदलत आहेत. जर हा मुद्दा बेकायदा स्थलांतर करणाऱ्या लोकांबद्दल आहे, तर मग त्यांना त्रास का होत आहे? आणि खरी गंमत अशी आहे की, जर त्यांच्या तर्कानुसार, बेकायदा स्थलांतरितांबद्दल बोलणे म्हणजे इस्लामफोबिया आहे, तर याचा अर्थ ते स्वतःच असे सुचवत नाहीत का की सर्व मुस्लीम हे बेकायदा स्थलांतरित आहेत? तर मग, खरा इस्लामफोब कोण आहे? ते की आम्ही”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पुढील वर्षी आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारी करीत असतानाच हा व्हिडीओ वादग्रस्त ठरला आहे. आसाम भाजपाच्या अधिकृत ‘एक्स’वर अशाच पद्धतीचे अजूनही काही व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. एका व्हिडीओमध्ये तरुण गोगोई यांना टोपी घातल्याचे दाखवण्यात आले आहे आणि ते पाकिस्तानच्या आर्मी प्रमुखांबरोबर बोलत असल्याचे दाखविण्यात आले आहे.