एजाजहुसेन मुजावर

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वजनदार नेते मंडळींना प्रवेश देण्याचा सपाटा चालविला आहे. करमाळा तालुक्यातील बागल गटही त्याच वाटेवर आहे. माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या जयंतीदिनी आयोजित कृषी महोत्सवाच्या निमित्ताने बागल गट भाजपच्या प्रभावाखाली आल्याचे संकेत मिळाले. बागल गटाने ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे पालकत्व पत्करल्यामुळे करमाळा तालुक्यातील राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे बागल गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकट होता. मात्र आता त्यांचा कल भाजपकडे आहे.

Shyam Manav on Devendra Fadnavis
Shyam Manav : “सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये…”, देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांचा उल्लेख करून श्याम मानव यांचा पलटवार
Protest against Home Minister Amit Shah criticism of Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंना ‘औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष’ संबोधल्याने शिवसैनिक संतापले, अमित शाहांच्या पुतळ्याचे दहन
eknath shinde criticized opposition
“वाघनखांवर आक्षेप म्हणजे, शिवरायांच्या शौर्याचा अपमान”; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “काही लोक…”
Nana Patole Veena in Discussion
‘भावी मुख्यमंत्री’ हा उल्लेख असलेली वीणा नाना पटोले यांच्या गळ्यात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
arvind kejriwal health
“केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
Dr Madhav Kinhalkar, Dr Madhav Kinhalkar Resigns from BJP, Dr Madhav Kinhalkar next political decision, Bhokar Assembly constituency, nanded, sattakaran article, Maharashtra vidhan sabha election 2024,
सूर्यकांता पाटील यांच्यापाठोपाठ माधव किन्हाळकर यांचाही भाजपाला रामराम
Ajit Pawar vilas lande
अजित पवारांच्या चिंता वाढली? आमदार विलास लांडे शरद पवारांच्या संपर्कात? जवळचा मित्र म्हणाला, “त्या भेटीनंतर…”

माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात कृषी प्रदर्शन तसेच सभेचे आयोजन करण्यात आले होते. बागल यांचे पुत्र दिग्विजय आणि कन्या रश्मी बागल-कोलते यांनी आयोजिलेल्या या कार्यक्रमासाठी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील ही भाजपची नेते मंडळी उपस्थित होती. रश्मी बागल यांनी काही महिन्यांपूर्वी आपला आदिनाथ सहकारी साखर कारखाना राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीच्या ताब्यात जाऊ न देता शिवसेना नेते आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या सहकार्याने शासनाची मदत घेऊन पुन्हा सुरू केला आहे. या कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. तेव्हा बागल गट एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याची चिन्हे दिसत होती. परंतु अवघ्या अडीच महिन्यात बागल गटाने भूमिका बदलली असून, शिवसेनेपेक्षा भाजपचा आसरा घेण्याची त्यांची मानसिकता आहे. त्यामुळेच आदिनाथ साखर कारखान्यासाठी शासनाची मदत मिळवून देणारे तानाजी सावंत किंवा त्यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत हे बागल गटाच्या कार्यक्रमात दिसले नाहीत.

आणखी वाचा- रामदास कदमांचे बंधू पण ठाकरे गटाचे समर्थक, ईडीने अटक केलेले सदानंद कदम कोण आहेत?

एकेकाळी सोलापूर जिल्ह्याची सूत्रे सांभाळणारे दिवंगत नेते नामदेवराव जगताप करमाळा तालुक्याचे. जिल्ह्यात सुरूवातीला दोनच गट होते. एक जगताप आणि दुसरा मोहिते-पाटील गट. अर्थात मोहिते-पाटील गट नेहमीच वरचढ ठरलेला. या तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारण अधिक महत्त्वाचे मानले गेले आहे.

दिवंगत नेते माजी मंत्री दिगंबर बागल हे मूळचे तसे मोहिते-पाटील गटाचे. १९८५-९० च्या सुमारास मोहिते-पाटील यांच्या छत्रछायेखाली राजकारणात येऊन बागल यांनी वजन वाढविले होते. १९९५ साली विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी आपले तत्कालीन पारंपरिक विरोधक जयवंत जगताप (काँग्रेस) यांचा पराभव करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नाराजी पत्करून दिगंबर बागल यांना बंडखोर म्हणून निवडून आणले होते. त्यावेळी राज्यात शिवसेना- भाजप युती सत्तेवर आली असता बागल यांनी युती सरकारला पाठिंबा दिला होता. त्यांना राज्यमंत्रिपद मिळाले होते. पुढे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्यासह दिगंबर बागल हे मोहिते-पाटील गटातून शरद पवार गटात गेले. तेव्हापासून बागल व मोहिते-पाटील यांच्यात दुरावा होता. बागल हे १९९५ आणि १९९९ अशा सलग दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले होते. २००४ साली जयवंत जगताप यांच्याकडून बागल पराभूत झाले. पुढे दोन वर्षातच बागल यांचे आकस्मिक निधन झाले. नंतर २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून त्यांच्या पत्नी शामल बागल आमदार झाल्या. तोपर्यंत करमाळा भागात बागल गटाचा प्रभाव होता. आदिनाथ आणि मकाई हे दोन्ही साखर कारखाने बागल गटाच्या ताब्यात राहिले.

आणखी वाचा- राजस्थान : पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या पत्नींचे आंदोलन, भाजपाही आक्रमक; अशोक गहलोत सरकार अडचणीत

बागल गट भाजपच्या प्रभावाखाली आला. यात आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची मानली जाते. रश्मी बागल व त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी आपण पोरके झालो असून आमचे पालकत्व आता मोहिते-पाटील यांनी स्वीकारावे, अशी विनंती केली असता त्यांच्या समर्थकांनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली. करमाळा भागात भाजपचे फारसे अस्तित्व नाही. बागल गट भाजपकडे आल्यास करमाळ्यासह माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाची ताकद भक्कम होण्यास मदत होणार आहे, हे निश्चित. बागल गट आता भाजपच्या वळचणीला जात असल्यामुळे त्यावर प्रा तानाजी सावंत यांची भूमिका कशी राहील ? याची उत्सुकता आहे.