Bangladesh Currency Notes: बांगलादेशने रविवारी नवीन नोटा जारी केल्या आहेत. त्यामध्ये पूर्वीच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील व देशाचे संस्थापक राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र या नोटांवरून काढून टाकण्यात आले आहे.
आतापर्यंत सर्व नोटांवर दिवंगत शेख मुजीबुर रहमान यांचे चित्र होते. त्यांनी १९७१ मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते १९७५ च्या उठावात सैनिकांनी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्यांची हत्या करेपर्यंत बांगलादेशचे नेतृत्व केले. मात्र, आता बांगलादेशच्या चलनी नोटांवरून त्यांचे चित्र हटविण्यात आले असून, आता देशातील पारंपरिक वास्तूंची चित्रे त्यावर असतील.
“नवीन नोटांवर कोणत्याही व्यक्तीचे चित्र नसेल. त्याऐवजी नैसर्गिक व पारंपरिक वास्तू किंवा खुणा असतील”, असे बांगलादेश बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. रविवारी नऊ वेगवेगळ्या मूल्यांपैकी तीन मूल्यांच्या नोटा प्रसिद्ध करण्यात आल्या. “नवीन नोटा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयातून आणि नंतर देशभरातील इतर कार्यालयांमधून जारी केल्या जातील”, अशी माहिती खान यांनी दिली.
या नवीन नोटांवर काय असेल?
बांगलादेशच्या नवीन नोटांवर हिंदू आणि बौद्ध मंदिरांच्या तसेच ऐतिहासिक राजवाड्यांच्या प्रतिमांचा समावेश असेल. त्यामध्ये दिवंगत चित्रकार झैनुल आबेदीन यांच्या कलाकृतींचाही समावेश असेल. या कलाकृतींमध्ये यामध्ये ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत बंगालच्या दुष्काळाचे चित्रण केलेले आहे. दुसऱ्या मूल्यातील चलनी नोटांवर पाकिस्तानविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात मृत्युमुखी पडलेल्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शहीद स्मारक दाखविले जाईल. इतर मूल्यांच्या नोटा टप्प्याटप्प्याने जारी केल्या जातील.
बदलत्या राजकारणाचे प्रतिबिंब पडण्यासाठी चलनी नोटांवर हे बदल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. १९७२ मध्ये बांगलादेशने पूर्व पाकिस्तानमधून आपले नाव बदलल्यानंतर जारी केलेल्या सुरुवातीच्या नोटांवर नकाशा दिला होता. नंतरच्या नोटांवर अवामी लीगचे नेतृत्व करणाऱ्या शेख मुजीबुर रहमान यांचा समावेश होता. त्यांचे नेतृत्व शेख हसीना यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या राजकीय कार्यकाळात केले होते.
शेख हसीना यांच्यावर आरोपपत्र दाखल
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वादग्रस्त कोटा प्रणालीविरुद्ध विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोठ्या निषेधात शेख हसीना यांना पदावरून काढून टाकण्यात आले. देशात हिंसाचार वाढल्यानंतर शोख हसीना यांना अक्षरश: पळून जावे लागले होते आणि त्या भारतात आल्या.
गेल्या वर्षी झालेल्या देशव्यापी उठावादरम्यान सामूहिक हत्याकांडाचे आदेश दिल्याबद्दल रविवारी शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा औपचारिक आरोप दाखल करण्यात आला. थेट प्रसारित झालेल्या सुनावणीदरम्यान, आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT)चे मुख्य अभियोक्ता मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी सांगितले, “हिंसाचार नियोजित व समन्वयित होता आणि ती उत्स्फूर्त किंवा स्वाभाविक प्रतिक्रिया नव्हती.”
संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, जुलै ते ऑगस्ट २०२४ दरम्यान जेव्हा हसीना यांच्या सरकारने निदर्शनांवर कारवाई सुरू केली तेव्हा १,४०० लोक मारले गेले. सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांच्या कोट्याविरुद्ध विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सुरू झालेली ही चळवळ १९७१ मध्ये स्वातंत्र्यानंतर बांगलादेशात झालेल्या सर्वांत वाईट अशांततेच्या परिस्थितीत रूपांतरित झाली.
“पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर आम्ही असा निष्कर्ष काढला की, हा एक समन्वयित, व्यापक व पद्धतशीर हल्ला होता”, असे इस्लाम यांनी आपल्या सुरुवातीच्या भाषणात सांगितले. “आरोपींनी उठाव चिरडून टाकण्यासाठी सर्व कायदा अंमलबजावणी संस्था आणि तिच्या सशस्त्र पक्षाच्या सदस्यांना मोकळे सोडले होते”, असेही त्यांनी सांगितले.