ठाणे : महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेल्याने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसमधील इच्छुकांनी बंडाची तयारी सुरू केल्याचे समजते. काँगेसकडून उमेदवारी नाही मिळाली तरी निवडणूक लढविणार असल्याचे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. तर, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दिल्याचे समजते. यामुळे भिवंडीत महाविकास आघडीत बंडाचे वारे वाहू लागले आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदारसंघाचा समावेश आहे. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आगरी, कुणबी, आदिवासी, मुस्लीम अशा मतदारांचा भारणा असलेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला होता तर, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. यामुळे काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला होता. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या जागेसाठी आग्रह धरला होता.
हेही वाचा – घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे हेसुद्धा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असल्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे बोलले जात होते. पण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही जागेसाठी आग्रही होता. यामुळे या जागेचा तिढा सुटत नव्हता. दरम्यान, महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात कोणता उमदेवार अधिक सक्षम ठरू शकतो, याचा आढावा महाविकास आघाडीने घेतला आणि यानंतर ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला सोडण्यात आली असून या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांची उमेदवारी जाहीर केली.
हेही वाचा – भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?
जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गावर राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक लावून वातावरण निर्मिती केली होती. काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. तसेच ही जागा काँग्रेसला मिळाली नाहीतर राजीनामा देऊ असा इशारा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिला होता. हे पदाधिकारी आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. शिवाय, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे हेसुद्धा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. परंतु राष्ट्रवादीला जागा मिळाल्याने ते अस्वस्थ झाले असून यातूनच त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे भिवंडीत महाविकास आघडीत बंडाचे वारे वाहू लागले आहेत.