Drug rape racket targeting Hindu girls केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते बंदी संजय कुमार यांनी असा आरोप केला आहे की, हैदराबादमध्ये ‘एआयएमआयएम’च्या पाठिंब्याने एक ‘ड्रग्स-रेप रॅकेट’ कार्यरत आहे. त्यांनी तेलंगणा पोलिसांवर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की, हैद्राबादमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पश्चिम बंगालमधील अल्पवयीन हिंदू मुलींना लक्ष्य केले जात आहे. अलीकडेच अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या मुलींना समारंभाच्या बहाण्याने आमिष दाखवले जाते, त्यांना ड्रग्स (अंमली पदार्थ) मिसळलेले चॉकलेट दिले जातात, त्यानंतर त्यांचे अपहरण केले जाते, त्यांच्यावर हल्ला केला जातो आणि व्हिडीओ वापरून त्यांना ब्लॅकमेल केले जाते. या आरोपामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नेमकं प्रकरण काय आहे? भाजपा नेते काय म्हणाले? हिंदू-मुस्लीम वाद उफाळण्याचे कारण काय? जाणून घेऊयात…
प्रकरण काय?
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते बंदी संजय कुमार म्हणाले, हैदराबादमध्ये सुरू असलेल्या एका ‘ड्रग्स-रेप रॅकेट’ला ‘एआयएमआयएम’चा पाठिंबा आहे. त्यांनी असा आरोप केला की, ‘एआयएमआयएम’च्या दबावामुळे तेलंगणा सरकार या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पालकांच्या तक्रारींचा पोलिस पाठपुरावा करत नाहीत आणि काही प्रकरणांमध्ये मुली सापडल्यानंतर त्यांना पोलिस ठाण्याबाहेर सोडून दिल्यावर ते खटले बंद केले जातात. बंदी संजय यांनी सांगितले की, जर राज्य सरकारने कारवाई केली नाही तर भाजपा या प्रकरणात हस्तक्षेप करेल.
ते म्हणाले, “भाजपा हैद्राबाद रक्षण पथकांचे मोर्चे काढेल. जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्यासाठी फक्त मुख्यमंत्रीच जबाबदार असतील.” एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “जसा ‘केरळ फाईल्स’ चित्रपट वाईट होता, तसेच आज हैदराबादमध्ये गोष्टी घडत आहेत. मुस्लीम मुली शांतपणे अभ्यास करत आहेत. तिथे कोणतीही समस्या नाही. पण, जिथे हिंदू मुली शिक्षण घेत आहेत, ते त्या भागांना लक्ष्य करत आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले, “सुरुवातीला त्यांनी एका मुलीला जाळ्यात अडकवले, तिला काही कार्यक्रमाच्या बहाण्याने बोलावले आणि ड्रग मिसळलेले चॉकलेट दिले. चॉकलेट्सच्या माध्यमातून तिला बळजबरीने या ड्रग्सचे व्यसन लावले, त्याची मात्रा वाढवली. एकदा ती व्यसनी झाल्यावर आणि अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असताना, त्यांनी त्या मुलीचे अश्लील व्हिडीओ घेतले. तिला धमकावले की जर तिने कोणाला काही सांगितले, तर ते व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतील, तिच्या पालकांना सांगतील, इत्यादी. सहा दिवसांनंतर त्यांनी तिला पोलिस ठाण्याबाहेर सोडून दिले आणि निघून गेले,” असे त्यांनी नमूद केले.
या कथित घटनांशी संबंधित व्हिडीओ ‘इंडिया टुडे’ला खासगीरित्या बंदी संजय यांच्या टीमने पुरवले आहेत. त्यांचा दावा आहे की ते घटनेतील साक्षीपुराव्याचे दस्तऐवजीकरण करतात. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी असा दावा केला की, या रॅकेटमध्ये शेकडो मुली सामील आहेत. त्यांनी लिहिले, “एकदा व्यसन लागल्यानंतर मुली असुरक्षित होतात. त्यांचे अपहरण केले जाते, कधीकधी अनेक दिवसांसाठी आणि त्यांना आदिल ऊर्फ अजीजसारख्या टोळीतील सदस्यांकडून वारंवार बलात्काराला सामोरे जावे लागते.”
ते पुढे म्हणाले, “ही टोळी या भयानक कृत्यांचे चित्रीकरण करते, फोटो आणि व्हिडीओ घेते. ते या सामग्रींचा वापर मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी करतात, ज्यामुळे त्यांना सततचा अत्याचार, शांत राहणे आणि या रॅकेटमध्ये आणखी अल्पवयीन मुलींना आणण्याची मागणी करण्यास भाग पाडले जाते.” त्यांनी पोलिस आणि गुन्हेगार एकत्र असल्याचा आरोप केला आणि राज्याच्या गुप्तचर यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी राजकीय दबावापासून मुक्त असलेल्या सक्षम पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली.
भाजपा नेत्याचे इतर आरोप
हैदराबादमधील जुबली हिल्स पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी त्याला ‘हिंदू आणि मुस्लिमांमधील युद्ध’ म्हटले. त्यांनी ८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पक्षाचे उमेदवार लंकाला दीपक रेड्डी यांच्यासाठी प्रचार करताना अनेक जातीयवादी आणि भीती निर्माण करणारी विधाने केली. तेलंगणामध्ये हिंदूंना एका मतपेढीत रूपांतरित करण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. बंदी संजय म्हणाले की, ही पोटनिवडणूक टिकली, बांगड्या घालणाऱ्यांमधील आणि न घालणाऱ्यांमधील एक स्पर्धा आहे. ते म्हणाले, “काँग्रेस जुबली हिल्सचे रूपांतर खान बेगम नगरमध्ये करत आहे. जर भाजपा जिंकला, तर आम्ही त्याचे सीता राम नगरमध्ये रूपांतर करू.” ते पुढे म्हणाले, “जुबली हिल्स पोटनिवडणूक ही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये युद्ध आहे.”
बंदी संजय यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि काँग्रेसने त्या परिसरातील मुस्लीम समुदायासाठी कब्रस्तानसाठी जमीन देण्याच्या आश्वासनांचा संदर्भ दिला. “काँग्रेस आणि बीआरएस मुस्लीम कब्रस्तानाचे आश्वासन देत आहेत, तुम्हाला मंदिरे हवी आहेत की कब्रस्तान? जर काँग्रेस जिंकला, तर ते तुमची उद्याने मुस्लीम कब्रस्तान, दर्गा आणि मशिदींमध्ये रूपांतरित करतील. बकरी ईदच्या दिवशी तुमच्या रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहतील. तुम्हाला गणेश चतुर्थी, दसरा, हनुमान जयंती इत्यादी सण साजरे करण्याची परवानगी दिली जाणार नाही,” असे त्यांनी म्हटले. चारमिनारवर भगवा ध्वज फडकवण्याचे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.
