हरियाणामधील भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने ‘जननायक जनता पार्टी’शी (JJP) युती केल्यास मी भाजपाला सोडचिठ्ठी देईन, अशा इशाराच बिरेंद्र सिंह यांनी दिला आहे. काँग्रेसचे माजी नेते असलेल्या बिरेंद्र सिंह यांनी असेही म्हटले की, भाजपापेक्षाही काँग्रेस पक्षात त्यांचे जास्त मित्र आहेत. द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अनेक विधाने केली आहेत. त्यांच्या मुलाखतीचा अंश प्रश्नोत्तराच्या स्वरूपात खालीलप्रमाणे :
प्रश्न : पक्ष सोडण्याची धमकी देऊन भाजपाने जेजेपीशी संबंध तोडावेत, असे तुम्ही सांगितले आहे?
बिरेंद्र सिंह : मी हे कधीही बोललो नाही. सध्याच्या सरकारमध्ये असलेली युती आणि निवडणुकीसाठी केलेली युती यामध्ये फरक असतो. जर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्याशी (जेजेपी पक्ष) युती केली जाणार असेल, तर मला भाजपामध्ये राहण्यात स्वारस्य वाटत नाही.
हे वाचा >> हरियाणा : भाजपाचा बडा नेता मांडणार वेगळी चूल?
प्रश्न : तुमचा मुलगा भाजपाचा विद्यमान खासदार आणि पत्नी माजी आमदार आहेत. त्यांच्याशी या निर्णयाबाबत चर्चा झाली?
बिरेंद्र सिंह : राजकीय कुटुंबात तशी २४ चर्चा तास सुरूच असते. मात्र, अंतिम निर्णय हा ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो; मग मी स्वतः असो, माझी पत्नी असो किंवा माझा मुलगा. मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. जर त्या पक्षासोबत युती झाली, तर मी पक्षात राहणार नाही.
प्रश्न : भाजपा-जेजेपी युती पुढेही राहिली, तर तुम्ही काँग्रेसमध्ये पुन्हा जाल?
बिरेंद्र सिंह : जर दोन्ही पक्षांमध्ये युती होणार असेल, तर मला राजकीय निर्णय घ्यावा लागेल. माझ्या पुढच्या निर्णयाबाबत आताच भाष्य करणे हे जरा घाईचे होईल. तसे पाहिले, तर माझे काँग्रेसमध्ये अनेक मित्र आहेत. आज मी जो काही आहे; त्यामध्ये राजीव गांधी यांचे मोठे योगदान आहे.
प्रश्न : विरोधकांच्या इंडिया आघाडीवर तुमचे मत काय?
बिरेंद्र सिंह : जर त्यांनी (इंडिया आघाडी) ठामपणे निर्धार करीत एकत्रित निवडणूक लढविली, तरच आघाडीला अर्थ उरेल आणि तसे झाले तर ही सर्वांत मोठी राजकीय घडामोड ठरू शकते. पण वैयक्तिक स्वार्थासाठी जर आघाडीत काही आगळीक झाली, तर या आघाडीचे भवितव्य हे १९७७ सालच्या जनता पार्टीच्या आघाडीसारखेच होईल.
हे वाचा >> हरियाणा हिंसाचार : नूह जिल्ह्यातील जलाभिषेक यात्रा काय आहे?
प्रश्न : इंडिया आघाडीचे प्रारंभिक संकेत कसे वाटत आहेत?
बिरेंद्र सिंह : मी पाहतोय, आघाडीला आकार देण्यासाठी त्यांचे चांगले प्रयत्न सुरू आहेत. पण, मला वाटते की, ते आघाडीतर्फे लोकसभेच्या ४०० ते ४२५ जागा लढवू शकतात आणि उर्वरित १०० ते १२५ जागांवर सहमती न होता, या जागा सोडून दिल्या जाऊ शकतात. जर ते संपूर्ण एकजुटीने निवडणूक लढवू शकले नाहीत, तर भाजपाला पराभूत करणे अवघड होणार आहे. जर का ते एकजुटीने लढले, तर आगामी निवडणुकीत कडवी झुंज पाहायला मिळेल.
प्रश्न : तुमच्या मते, हरियाणा आणि केंद्रातील भाजपा सरकारबाबत जनमत काय सांगते?
बिरेंद्र सिंह : राज्य आणि केंद्र सरकारने ग्रामीण भागातील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या आणि काही प्रमाणात शहरी भागातील जनतेशी संबंधित असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन तांत्रिक पद्धत (पोर्टल – संकेतस्थळ) आणली आहे. त्यामुळे काही प्रमाणात ग्रामीण भागातील जनता हैराण झाली आहे. त्यांना तंत्रज्ञानासह जुळवून घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. याचे (राजकीयदृष्ट्या) नुकसान होण्याची शक्यता वाटते. हरियाणा सरकारशी संबंधित जास्तीत जास्त धोरणे पोर्टलद्वारे राबविली जात आहेत. पण, हे प्रयत्न मतदारांना आकर्षित करीत नसून, लोकांना आपण यात अडकलो असल्याचे संदेश जात आहेत.
आणखी वाचा >> हरियाणामध्ये हिंसाचार का भडकला? गोरक्षक मोनू मानेसरशी त्याचा काय संबंध?
प्रश्न : हरियाणातील राजकीय परिस्थिती आणि भाजपच्या भवितव्याबाबत तुमचा अंदाज काय?
बिरेंद्र सिंह : हे पूर्णतः त्यांच्या (भाजपा-जेजेपी) युतीवर अवलंबून आहे. निवडणूक युतीमध्ये होणार की युतीशिवाय होणार, हे आज आपण सांगू शकत नाही. तथापि, हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजपामध्येच मुख्य लढत होणार हे निश्चित आहे.