BJP Minister Aleixo Sequeira and Goa Assembly Speaker Ramesh Tawadkar Resignation : गोवा सरकारमधील पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी बुधवारी अचानक आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे त्यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र सुपूर्द केलं. त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच रमेश तवडकर यांनीही गोव्याचे विधानसभा अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. भाजपाच्या दोन दिग्गज नेत्यांनी अचानक राजीनाम्याचा निर्णय घेतल्याने सत्ताधारी गोटात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? तसेच रमेश तवडकर यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडण्याची घोषणा का केली? याबाबत जाणून घेऊ…
काही दिवसांपासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार, अशी चर्चा गोव्यातील राजकीय वर्तुळात रंगली होती. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून एका मंत्र्याला मंत्रिपद सोडण्याचे आदेश आले आहेत, अशी कुजबुज सत्ताधारी गोटात सुरू होती. आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. दामू नाईक यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी तासभर चर्चा केली आणि अधिवेशनातील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा सादर केला. त्यानंतरच सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे आदेश भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आलेस्क सिक्वेरा यांची राजकीय कारकीर्द
- ६८ वर्षीय आलेक्स सिक्वेरा हे नुवेम मतदारसंघाचे आमदार आहेत.
- सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता.
- १९ नोव्हेंबर २०२३ रोजी मंत्री नीलेश काब्राल यांचा राजीनामा घेऊन सिक्वेरा यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
- काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या आठ आमदारांपैकी मंत्रिपद मिळण्याचा पहिला मान सिक्वेरा यांना मिळाला होता.
- त्यांच्याकडे पर्यावरण, कायदा अशी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती.
- जानेवारी २०२५ मध्ये सिक्वेरा यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक खळबळजनक दावा केला होता.
- माझ्याकडील मंत्रिपद कित्येकांच्या डोळ्यात खुपतं. मंत्रिपदावरून माझी हकालपट्टी व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे, असं सिक्वेरा म्हणाले होते.
आणखी वाचा : भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?
२०२४ मध्ये सिक्वेरा यांच्या विधानाने झाला होता वाद
२०२४ मध्ये स्वातंत्र्यदिनी मडगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधताना तत्कालीन मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी विद्यार्थ्यांना ड्रग्जपासून दूर राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गोव्यात सर्वत्रच ड्रग्ज मिळतात, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानं राज्यात एकच खळबळ उडाली होती. काँग्रेसनं सरकारच्या गृह खात्याचं अपयश या मुद्द्यावरून उघड होतंय, अशी टीका केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कानउघाडणी केल्यानंतर सिक्वेरा यांनी आपल्या विधानाबाबत सारवासारवही केली. “मी सगळीकडेच ड्रग्ज मिळतात, असं म्हटलं होतं. त्याचा अर्थ- सर्वत्र म्हणजेच जगभरात सगळीकडेच असादेखील होतो, असं सिक्वेरा म्हणाले होते.
आलेक्स सिक्वेरा यांनी राजीनामा का दिला?
काही दिवसांपासून आलेक्स सिक्वेरा हे आजारी असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही झालेली आहे. आजारपणामुळे सिक्वेरा यांना विधानसभा अधिवेशनात हजर राहता आलं नाही. त्यांच्या खात्यांच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला सभागृहात मुख्यमंत्र्यांनाच उत्तरं द्यावी लागली. आजारपणामुळे सभागृहात त्यांची कामगिरी ठीक होऊ शकलेली नाही, याची कल्पना भाजपाच्या नेत्यांना आहे. हीच बाब लक्षात घेता, मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा करून मंत्रिमंडळात फेरबदलाचा निर्णय घेतला. त्यानंतर सिक्वेरा यांनी बुधवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. आजारपणामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. यावेळी सिक्वेरा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभारही मानले.

विधानसभा अध्यक्षांनी राजीनाम्याची घोषणा का केली?
दरम्यान, आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी आपणही राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. सूत्रांच्या माहितीनुसार, तवडकर यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांना मिळणाऱ्या खात्याबाबत अद्याप माहिती समोर आली नसली तरी त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तवडकरांच्या जागी दुसरे एसटी नेते सावर्डेचे आमदार गणेश गांवकर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची सूत्रे दिली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयात कलगीतुरा; एकमेकांना दिले संविधानाचे दाखले, प्रकरण काय?
दुसरीकडे काँग्रेसमधून फुटून आलेल्या आठ आमदारांपैकी दिगंबर कामत यांचे मंत्रिपद बऱ्याच काळापासून रखडले आहे. आज ना उद्या आपल्याला मंत्रिपद मिळेल या आशेवर ते आहेत. “माझा शपथविधी होईल तो दिवस खरा, मंत्रिपद मिळणार अशा वावड्या रोजच उठतात”, असं वक्तव्य त्यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केलं होतं. दरम्यान, मठाच्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी आमदार दिगंबर कामत हे दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
गेल्या तीन वर्षांत तीन मंत्र्यांचा राजीनामा
२०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून भाजपानं गोव्यात बहुमतात सत्ता स्थापन केली. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर गेल्या तीन वर्षांत भाजपा सरकारमधील तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. सुरुवातीला नीलेश काब्राल यांचा राजीनामा घेऊन, त्या जागी आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या मंत्री गोविंद गावडे यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. तर, आता २२ महिन्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळानंतर आलेक्स सिक्वेरा राजीनामा देत आहेत. त्यामुळे भाजपा सरकारमध्ये चाललंय तरी काय, असा प्रश्न गोव्यातील जनतेला पडला आहे.