लक्ष्मण राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालना शहरातील पाणीप्रश्नावर पावसाळ्याच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीने काढलेल्या मोर्चाची पाण्याच्या संदर्भात कमी आणि राजकीय अनुषंगानेच चर्चा अधिक होत आहे. जालना शहरात पाणीप्रश्न आहेच, परंतु मोर्चाच्या माध्यमातून भाजपने राज्यातील महाविकास आघाडीला लक्ष्य करण्याची संधी मात्र सोडली नाही. जालना नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठीच या मोर्चाचा घाट घालत भाजपने आक्रमक राजकारण सुरू केले आहे.

जालना नगरपरिषदेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली आहे. ही नगरपरिषद आणि जालना विधानसभेची निवडणूक भाजपला स्वबळावर लढवायची आहे. मावळती जालना नगरपरिषद काँग्रेसचे स्थानिक आमदार गोरंट्याल यांच्या अधिपत्याखाली होती. ६१ सदस्यांच्या या नगरपरिषदेत नगराध्यक्षासह २८ सदस्य काँग्रेसचे होते. या नगरपरिषदेतील दानवे आणि गोरंट्याल यांची जवळीक अनेक कार्यक्रमांतून जाहीर रीत्या स्पष्ट झालेली होती. परंतु आता पाणीप्रश्नावर निघालेल्या मोर्चामुळे गोरंट्याल यांनी भाजपवर टीका केली आहे. गेली पाच वर्षे नगरपरिषदेवर काँग्रेसची सत्ता असताना पाणीप्रश्नावर एकही मोर्चा किंवा रस्ता रोको झाला नाही. आताच पावसाळ्याच्या तोंडावर मोर्चा काढण्याचे भाजपचे राजकारण असल्याचे गोरंट्याल यांनी म्हटले आहे. मोर्चासाठी शहराच्या बाहेरील माणसे तसेच पैसे देऊन गर्दी जमवल्याच्या समाजमाध्यमांवरील ध्वनिफितीकडेही गोरंट्याल यांनी लक्ष वेधले आहे.

बोंडे-भारतीय या भाजपच्या दोन शिलेदारांमुळे अमरावतीत राणा दाम्पत्याचे महत्त्व कमी होणार ?

शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना या मोर्चामागे नगरपरिषदेची आगामी निवडणूक असल्याचे वाटते. परंतु असे असले तरी हा मोर्चा नेमका कशासाठी होता, असा प्रश्नही त्यांना पडला आहे. स्थानिक पातळीवर नगरपरिषदेत काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचे सख्य होते. मग भाजपने हा मोर्चा आतापर्यंत काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगरपरिषदेविरुद्ध काढला होता का, की भाजपचा मोर्चा आपल्यावर टीका करण्यासाठी होता, इत्यादी प्रश्न खोतकर यांनी उपस्थित केले आहे. मोर्चासाठी पैसे दिल्याच्या संदर्भातील चित्रफितीचा उल्लेखही त्यांनी केला आहे.

मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यानंतर केलेल्या भाषणात भाजपच्या नेतेमंडळींनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या राष्ट्रवादीचे पालकमंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे स्थानिक आमदार कैलास गोरंट्याल यांना लक्ष्य केले, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांची तोफ डागली. त्यामुळे जालना नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवण्याचा भाजपचा निर्धार स्पष्ट झाला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp politics in jalna water issue protest before local bodies elections print politics news pmw
First published on: 18-06-2022 at 17:38 IST