पुणे : भाजपचा बालेकिल्ला कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे विद्यमान आमदार हेमंत रासने यांचा केलेला पराभव भाजप अद्याप विसरलेला नाही. काँग्रेस सोडून धंगेकर हे आता महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे पुणे महानगरप्रमुख असल्याने ते भाजपचे मित्र झाले असले, तरी भाजप मित्रत्व स्वीकारायला तयार नाही. धंगेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत घेरण्यासाठी भाजपने पूर्वीचा ‘कसबा’ हा प्रभागच इतिहासजमा करून नवीन प्रभाग केला आहे. त्यावरून आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे.
पुणे महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली असून, त्यावरील हरकतींवर सुनावणी सुरू आहे. प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी भाजपच्या पुण्यातील काही स्थानिक नेत्यांकडे सोपविण्यात आली. त्यांनी प्रभाग रचना करताना ‘कसब्या’वर विशेष लक्ष केंद्रीत केले. २०१७ च्या निवडणुकीत कसबा पेठ-सोमवार पेठ हा प्रभाग होता. हा प्रभाग भाजपबहुल असला, तरीही माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रभागातून काँग्रेस पुरस्कृत अपक्ष निवडणूक लढवून भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांचा पराभव केला. या प्रभागाशेजारील शनिवार पेठ-सदाशिव पेठ या प्रभागातून भाजपचे आमदार हेमंत रासने हे निवडून आले होते. महापालिका निवडणुकीत बीडकर यांचा आणि विधानसभा निवडणुकीत रासने या दोन भाजपच्या प्रमुख नेत्यांशी दोनहात करत धंगेकर हे आतापर्यंत विजय साकारत आले आहेत. ही सल कायम भाजपला टोचत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत धंगेकर यांची कोंडी करण्याची व्यूहरचना भाजपने आखल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
प्रभाग रचना तयार करताना कसबा-सोमवार पेठ हा प्रभागच इतिहासजमा करून टाकला आहे. या प्रभागाचे तुकडे करून कमला नेहरू हॉस्पिटल-रास्ता पेठ असा नवीन प्रभाग तयार केला आहे. त्यामध्ये मूळ कसब्यातील धंगेकर यांचा हक्काचा मतदार असलेल्या भागाची विभागणी शेजारील रविवार पेठ-नाना पेठ आणि शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई या प्रभागांमध्ये करून धंगेकर यांची भाजपकडून अडचण करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यावरून आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद उफाळून आला आहे.
धंगेकरांचे पुत्र पहिल्यांदाच सक्रिय
विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांचा रासने यांनी पराभव करून पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. त्यानंतर धंगेकर हेदेखील काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असताना, महापालिका निवडणुकीत ते कसब्यामध्येच अडकून पडतील, अशी खेळी भाजपकडून खेळण्यात आल्याची चर्चा आहे. आगामी महापालिका निवडणुकीत धंगेकर यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. प्रारुप प्रभाग रचनेत ‘कसबा’च गायब करण्यात आल्यावरून धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांनी प्रारुप प्रभाग रचनेच्या सुनावणीत हरकत घेतली आहे. ‘आपला कसबा कुठंय?’ असे फलक दाखवून त्यांनी सर्वांचे लक्ष्य वेधले. त्यावरून आता प्रणव धंगेकर हे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात येते.