सीताराम चांडे

राहाता: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘महाविजय-२०२४’ मोहिमेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी दौरा केला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांनी ‘संपर्क से समर्थन’ अभियान राबवले. राज्यातील ज्या निवडक लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे त्यामध्ये शिर्डीचा समावेश आहे. परंतु मध्यंतरी राज्यातील सत्ता समीकरणे बदलली. भाजप आणि शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट सत्तेसाठी एकत्र आले. या महायुतीतील शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. असे असताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी या मतदारसंघात अभियान राबवण्यासाठी दौरा केल्याने शिंदे गटात चलबिचल निर्माण झाली आहे.

Bhiwandi Lok Sabha Constituency, election 2024, Maha Vikas Aghadi, mahayuti, Suresh mhatre alias Balya Mama
भिवंडी लोकसभा मतदारसंघ विकास कामांमध्ये ढ; महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा यांची टीका
sunetra pawar marathi news, sharad pawar marathi news
…अन् शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर सुनेत्रा पवारांनी हातच जोडले !
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
Chandrapur, new voters,
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत नवमतदार, महिला मतदारांची भूमिका निर्णायक

अभियानात शिर्डीची जागा महायुतीतील कोणत्या पक्षाकडे याबद्दल बावनकुळे यांनी कोणतेही भाष्य न करता भाजपचा दावा कायम राहील असाच अभियानात त्यांचा रोख होता. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यात संभ्रमाचे वातावरण आहे. महायुती असले तरी भाजपची वाटचाल या मतदारसंघावर डोळा ठेवून सुरू असल्याचेही स्पष्ट होते. त्यामुळे महायुतीत शिर्डी मतदारसंघाची जागा कोणाकडे हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… सांगलीत वंचितच्या दाव्याने काँग्रेसपुढे प्रश्नचिन्ह

शिर्डीचा समावेश राहता विधानसभा मतदारसंघात होतो. हा मतदारसंघ महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा बालेकिल्ला. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या काही दिवसच अगोदर शिर्डी मतदारसंघातील भाजपच्या निष्ठावंतांनी महसूल मंत्री विखे यांच्या विरोधात नाराजीचा सूर आळवणारी बैठक घेतली होती. विखे गटाकडून विश्वासात घेतले जात नसल्याचे निष्ठावंतांचे म्हणणे होते. मात्र निष्ठावातांच्या बैठकीची दखल प्रदेशाध्यक्षांकडून घेतले गेली नाही. निष्ठावंतांनीही नाराजीचा मुद्दा प्रदेशाध्यक्षांकडे आळवला नाही. त्यामुळे विखे आणि भाजपमधील निष्ठावंत अशा दोन्ही बाजूंनी परस्पराशी जुळवून घेतल्याचा तर्क लढवला जात आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी संगमनेर व राहता येथे दोन स्वतंत्र बैठका घेतल्या. संगमनेर येथे संगमनेरसह अकोला व कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे बैठकीस अनुपस्थित होत्या. कोल्हे गटाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सहकार्य घेत विखे गटाच्या ताब्यातून गणेश सहकारी साखर कारखाना हिसकावला. थोरात हे तर विखे यांचे परंपरागत विरोधक. त्यामुळे सध्या भाजपमधीलच विखे गट व कोल्हे गटामध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका बैठकीसाठी शिर्डीऐवजी संगमनेरला जोडला गेला की काय? अशी चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे. विखे गटाशी कोल्हे गटाचा संघर्ष सुरू झाला असतानाच महायुतीमध्ये कोल्हे गटाची काहीशी कुचंबनाच झालेली आहे. कारण कोपरगावचे आमदार आशुतोष काळे अजितदादा गटात सहभागी झालेले आहेत.

हेही वाचा… मराठवाड्यात खासदार निधी खर्च करण्यात प्रीतम मुंडे मागील बाकावर

नेवासे, श्रीरामपूर व शिर्डी या तीन विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शिर्डी येथे घेतली. या बैठकीस महसूल मंत्री विखे, त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे हे दोघेही अनुपस्थित होते. संगमनेर येथील बैठकीसही दोघे अनुपस्थित राहिले. मंत्री विखे यांच्याकडे कौटुंबिक विवाह सोहळा असल्याने ते बैठकींना अनुपस्थित होते, त्यांनी याची माहिती पक्षश्रेष्ठींना दिली होती, असा दावा केला जात असला तरी त्यांची अनुपस्थिती खटकणारीच ठरली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व महायुतीमधील एकनाथ शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे करतात. ते या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यापूर्वी शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा कायम असणार आहे. असे असतानाच भाजप या मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी अभियान राबवत आहे. शिवसेनेमध्ये फूट पाडण्यापूर्वीही भाजपचे या मतदारसंघाकडे विशेष लक्ष होतेच. त्यादृष्टीने मतदारसंघाची समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे, निळवंडे प्रकल्प लोकार्पण, विमानतळ विस्तारीकरण अशा विविध विकासकामांच्या माध्यमातून बांधणी सुरू केली होती. अलीकडच्या काळातही महसूल मंत्री विखे यांनी शक्तीप्रदर्शन करत ‘शासन आपल्या दारी’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असे विविध कार्यक्रम आयोजित करत भाजपचा दावा कायम राहील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या माध्यमातूनही हेच प्रयत्न कायम असल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. त्यामुळे नाही म्हटले तरी शिंदे गटात याबद्दल चलबिचल असू शकते.

हेही वाचा… अधिवेशन फक्त दहा दिवसांचे , विदर्भाच्या प्रश्नांना किती स्थान मिळणार ?

या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघ कोणाकडे यावर कोणतेही भाषण न करता आपला दावा कायम राहील यासाठीच हा दौरा केला, असे मानले जाते. भाजपची ही भूमिका शिंदे गटामध्ये संभ्रम निर्माण करणारी ठरते आहे.