जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये विद्यार्थी नेता म्हणून प्रसिद्धीस आलेला कन्हैया कुमार आता राष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा झाला आहे. जेएनयूमध्ये शिकत असताना ‘तुकडे-तुकडे गँग’चा म्होरक्या ठरवून त्याच्यावर देशद्रोहाचे आरोपही झाले आणि त्याला वीस दिवस तिहारच्या तुरुंगाची हवादेखील खायला लागली. मात्र, या साऱ्या घटनाक्रमातही तगून राहत कन्हैया कुमारने भाजपाविरोधी आवाजाचा एक प्रमुख चेहरा म्हणून आपले स्थान कायम केले. २०१९ साली त्याने बिहारमधील बेगुसरायमधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने कन्हैया कुमारला ईशान्य दिल्ली जागेवरून तिकीट दिले आहे. या ठिकाणी भाजपाचे दोन वेळा खासदार राहिलेले विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्याविरोधात त्याची लढत होणार आहे. मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार हे दोघेही पूर्वांचल भागाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे त्यांच्यात अटीतटीचा सामना होणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करून कन्हैया कुमारला शह देण्याची राजनीती भाजपाने अवलंबली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कन्हैयाने विविध प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यावर एक नजर टाकूयात.

दिल्लीतील सातही लोकसभा जागांवर भाजपाने गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे. तुमच्यासाठी हे आव्हान किती मोठं आहे?

मी दिल्लीतील लोकांचा, काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा तसेच काँग्रेस हाय कमांडचा आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. मी इथे तगडी टक्कर देऊ शकतो, असा विश्वास पक्ष नेतृत्वाला वाटतो. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मी काँग्रेसचा किल्ला लढवेन.

हा सामना अवघड असला तरीही प्रत्यक्ष मैदानात, मग ते दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण देशात असं चित्र दिसून येत आहे की, लोक या सरकारवर नाखूश आहेत. टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर जे आकडे आपण पाहतो आहोत ते साफ खोटे आहेत. भाजपा सातत्याने त्याच त्याच मुद्द्यांवर बोलत आहे. त्यांच्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. ते बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक विषमता यांसारख्या मुद्द्यांवर बोलू शकत नाहीत.

लोकशाहीमध्ये प्रत्येक आव्हान हे लोकांवर अवलंबून असते. जेव्हा लोक तुमच्यावर खूश नसतात तेव्हा ते आव्हान अधिक कठीण होते. मला असा विश्वास आहे की, या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बाजूने सकारात्मक गोष्टी घडतील.

हेही वाचा : “राहुल गांधींचं हेलिकॉप्टर तपासता, मग मोदींचं का नाही?”, काय आहेत नियम…

तुम्ही मनोज तिवारी यांच्याविरोधात लढत आहात. म्हणजे दिल्लीमध्ये बिहारी विरुद्ध बिहारी असा सामना होणार आहे तर…

ही स्थानिक नव्हे तर लोकसभेची निवडणूक आहे. काँग्रेसकडे राष्ट्रीय अजेंडा आहे. आम्ही आमच्या न्यायपत्रामध्ये (जाहीरनाम्यामध्ये) महिला, युवा, शेतकरी अशा समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याविषयी भाष्य केले आहे.

भाजपाच्या गेल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात बेरोजगारी आणि महागाई इतकी वाढली आहे की, लोकांसाठी हा ‘अन्याय काळ’ ठरला आहे. यावेळचा लढा हा अन्याय आणि न्यायामधला लढा असणार आहे.

ईशान्य दिल्लीतील लोकांसाठी भाजपाने काय केले आहे? किती नोकऱ्यांची निर्मिती केली? किती दवाखाने, शाळा आणि महाविद्यालये बांधली? हे खरे मुद्दे आहेत.

तुम्ही ‘तुकडे तुकडे गँग’चे सदस्य असल्याचा भाजपा दावा करते. तुम्ही या प्रकारच्या आरोपांना कसे तोंड देणार आहात?

या आरोपांना मी का उत्तरे देऊ? खोट्याला उत्तरे द्यायची गरज नसते. हा त्यांच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा भाग आहे. खरं तर प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी त्यांची आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) अशा सगळ्या यंत्रणा त्यांच्या हाताखाली आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्री त्यांचेच आहेत. जर ते कोणत्याही पुराव्याशिवाय लोकांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकू शकत असतील तर मला अटक करण्यापासून त्यांना कोण अडवत आहे? गेल्या दहा वर्षांपासून ते हाच आरोप करत आहेत. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं दुसरं काहीही नाही. त्यांना वास्तवातील मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करायचे आहे.

एवढेच नाही तर केंद्रीय गृहमंत्रालयानेही आमच्याकडे ‘तुकडे-तुकडे गँग’संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. हा एक राजकीय प्रोपगंडा आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की, त्यांच्याकडे वास्तवातील प्रश्नांसाठी काहीही अजेंडा नाही.

तुम्हाला दिलेल्या उमेदवारीमुळे ध्रुवीकरण वाढेल, अशी चिंता तुम्हाला वाटते का?

अजिबातच नाही. म्हणूनच तर मी भाजपाने केलेल्या अशा आरोपांवर प्रत्युत्तरही देत नाही. अशा प्रकारच्या आरोपांना आता लोकच कंटाळले आहेत. बेरोजगारी आणि महागाई का वाढते आहे, हे तुम्ही त्यांना सांगत नाही. बुलेट ट्रेन आणि पक्क्या घराचे वचन कुठे गेले, हे तुम्ही सांगत नाही? त्यांना लोकांना काहीच देता आलेले नाही म्हणूनच ते ध्रुवीकरण, प्रोपगंडा आणि फुटीरतावादी राजकारणाचा पर्याय वापरत आहेत.

तुम्ही मुळचे बिहारचे आहात आणि मागील लोकसभेची निवडणूक तुम्ही बेगुसरायमधून लढवली आहे. तुम्ही तुमच्या राज्यामधून निवडणूक लढण्यास प्राधान्य दिले असते का?

जसे मी याआधीही म्हणालो की, ही स्थानिक निवडणूक नाही आणि काँग्रेस हा भाजपाप्रमाणेच राष्ट्रीय पक्ष आहे. नरेंद्र मोदी हे वाराणसीचे आहेत का? दिल्लीचा विचार करायचा झाल्यास हे राजधानीचे शहर आहे, तर मग हा प्रश्न कशासाठी?

प्रश्न असा आहे की, जर तुम्हाला बेगुसराय अथवा बिहारमधील इतर जागेवरून लढण्याचा पर्याय दिला गेला असता तर तुम्ही काय निवडले असते?

अर्थातच, मला बेगुसरायमधून निवडणूक लढवायला आवडले असते. मी तयारीदेखील बेगुसरायसाठीच केली होती. मात्र, काँग्रेस हा इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे आणि ती जागा सहकारी पक्षाला दिली गेली आहे, त्यामुळे काँग्रेस त्या जागेवरून निवडणूक कशी लढवणार?

तुम्ही या एकंदर निवडणुकीकडे कसे पाहता?

‘भारत जोडो’ आणि ‘भारत जोडो न्याय यात्रां’नी आम्हाला दाखवून दिले आहे की, समाजातील सगळे घटक वेगवेगळ्या समस्यांशी झुंजत आहेत. सरकार काय करते आहे? दिवसभर प्रोपगंडा आणि दुष्प्रचार एवढंच ते करत आहेत. त्यांना मूळ मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करायचे आहे.

भारतात प्रत्येक तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो असे डेटा सांगतो. जीडीपी वाढला असला तरी दरडोई जीडीपी वाढलेला नाही. एकीकडे एक अब्जाधीश उद्योगपती हा जगातील सर्वांत श्रीमंत अशा दहा व्यक्तींच्या यादीत झळकतो आहे, तर दुसरीकडे भूक निर्देशांकात भारताची अधिकाधिक घसरण होत आहे. एकूणच देशातील विषमता वाढली आहे.

हेही वाचा : Prestige fight: आसाममधल्या या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष

दीर्घकाळापासून कडवे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्लीत मित्रपक्ष आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या समन्वयावर याचा परिणाम होतोय का?

मला असे वाटते की, अशा परिस्थितीत पक्षाचे कार्यकर्ते आणि लोक आधी एकत्र येतात आणि मग शेवटी नेते एकमेकांबरोबर येतात. ही युती देशाला कमकुवत करणाची इच्छा असलेल्यांच्या विरोधात लढण्यासाठी आकाराला आली आहे. एकीकडे देशात श्रीमंत उद्योगपतींना मदत करणारा ‘मित्रकाळ’ आणि सामान्य लोकांसाठी ‘अन्याय काळ’ सुरू आहे, तर दुसरीकडे न्यायासाठी सामान्य लोक लढत आहेत.

काही काळापूर्वी अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या की, तुम्ही दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष व्हाल. ईशान्य दिल्लीमधून मिळालेली उमेदवारी हा त्याच प्रक्रियेचा भाग आहे का?
राजकारण हे अंदाजावर चालत नाही, अशी काही दीर्घकालीन योजना असेल असे मला वाटत नाही.