प्रबोध देशपांडे

अकोला : निधी वाटपावरून मतभेद झाल्याने अकोला शिवसेनेत नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. पक्षाचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरूद्ध पदाधिकारी असा वाद रंगला आहे. पक्षातील कलह आता विकोपाला गेला. शिवसेनेला संघटनात्मक बळकटी येण्यापूर्वीच जिल्ह्यात पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत. अकोल्यात शिवसेना वाढविण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे राहणार आहे.

हेही वाचा >>>उत्तर प्रदेश पालिका निवडणुका : घरपट्टी अर्ध्यावर तर पाणीपट्टी माफ करण्याचे ‘आप’चे आश्वासन

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन वाढवण्याऐवजी निधीसाठीच मोठा खटाटोप केला. पक्षामध्ये अवघ्या दोन-तीन महिन्यात निधीवरून हेवेदावे वाढत गेले. सर्व अधिकार गोपीकिशन बाजोरियांकडे असल्याने ते विश्वासात घेत नसल्याचा आरोप त्यांच्याच जवळच्या पदाधिकाऱ्यांकडून झाला. त्यामुळे शिवसेना पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली. निधीचा चुकीच्या ठिकाणी वापर व टक्केवारीचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. शिवसेना भक्कम होत असल्याने काही जणांचा हा कट आहे असा आरोप बाजोरियांनी केला. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेत बाजोरिया व पदाधिकारीअसा दोन गट तयार झाले. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी खा. प्रतापराव जाधव यांची नियुक्ती केली. वादाच्या पार्श्वभूमीवर बाजोरियांचे अधिकार कमी केल्याचे सांगितले जात आहे. त्यातच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्या घरात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. पक्षांतर्गत वाद हल्ला करण्यापर्यंत पोहोचला. हा प्रकार बाजोरिया यांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप सरप यांनी केला. या वादावरून एकमेकांच्या विरोधात समाजमाध्यमातून बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचे प्रकार देखील घडले आहेत.

वाद संपेना

हेही वाचा >>>योग, क्रीडा महोत्सवातूनही भाजपची बांधणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अकोला जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे सक्षम नेतृत्वाचा अभाव होता. त्याच वेळी तत्कालीन शिवसेनेतील गटबाजीमुळे नाराज गोपीकिशन बाजोरिया यांनी आपले पुत्र विधान परिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया व समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या गटाची वाट धरली. शिंदे यांना विधान परिषदेत शिवसेनेच्या एका आमदाराचे समर्थन मिळाले. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी विप्लव बाजोरियांना पक्ष प्रतोद करण्यासाठी उपसभापतींना पत्र दिले. मोठ्या विश्वासाने गोपीकिशन बाजोरियांनी आपल्या समर्थकांना एकनाथ शिंदेंकडे नेऊन जिल्ह्यातील मुख्य पदांचे वाटप केले होते. अल्पावधीतच तेच पदाधिकारी आता बाजोरियांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. जिल्ह्याला प्राप्त झालेला निधी हे शिवसेनेतील वादाचे मुख्य कारण ठरले.