नारायणराव राणे किंवा छगन भुजबळ हे पक्षांतरे करण्यात तरबेज असलेले नेते नेहमीच चर्चेत असतात. राणेंना एकदा मुख्यमंत्रीपद मिळाले, पण परत या पदाने हुलकावणी दिली. छगन भुजबळ यांच्यासमोरील उप कधीच गेले नाही. शिवसेनेच्या तालमीत तयार झालेले हे दोन नेते कायमच आक्रमक. जे काही आहे ते आडपडदा न ठेवता बोलण्यासाठी प्रसिद्ध. ‘आपण नाशिक मतदारसंघातून लढावे ही भाजपची भूमिका असल्याचे छगन भुजबळांनी जाहीर करून टाकले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता पसरणे स्वाभाविकच. भुजबळांना आता दिल्लीचे वेध लागले आहेत. नारायण राणे हे आधीच दिल्लीत आहेत, पण लागोपाठ दोन पराभवांमुळे राणे यांनी लोकांमधून निवडून येण्यापेक्षा मागील दाराने कायदे मंडळात जाणे पसंत केले. आधी विधान परिषद मग राज्यसभा गाठली. भाजपने राणे यांना राज्यसभा नाकारल्याने त्यांना एक तर लोकसभा लढावी लागेल अन्यथा निवृत्ती स्वीकारावी लागेल. भुजबळ नाशिकमधून उमेदवारी द्या म्हणून आग्रह धरत असताना राणे यांचे मात्र अजूनही तळयात-मळयात सुरू आहे.

हेही वाचा >>> काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश

कोणाचा प्रचार?

कोल्हापुरातून काँग्रेस वर्तुळातील काही जणांना उमेदवारी आपल्यालाच मिळणार याचा पुरेपूर विश्वास होता. त्यांच्यात उत्साह इतका की पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या जात असताना दुसरीकडे मतदारसंघातील गावे पिंजून काढायला सुरुवात केली होती. प्रचाराच्या एक-दोन फेऱ्याही पूर्ण झाल्या होत्या. ऐन वेळी श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित होऊन महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा सक्रिय झालीदेखील. तरीही उत्साहींची प्रचाराची खुमखुमी थांबेल तर ना. जिल्ह्याच्या पार दक्षिणेकडेच्या तालुक्यात असाच एक उमेदवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची भेट झाली. त्यांना पाहून बडया नेत्याने विचारले, काय राव, कोणाचा प्रचार चाललाय? अवस्था तर बिकट होती. पण गडबडलेल्या अवस्थेतही रावसाहेबांनी, आपलाच प्रचार की, असे म्हणत वेळ मारून नेली खरी, पण खरे दर्शन समोर आले ते आलेच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक वसले, दोन वसेचना..

सांगली लोकसभेसाठी भाजपने खासदार संजयकाका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. यालाही आता पंधरा दिवसांचा काळ होऊन गेला. मात्र, विरोधक कोण यावरून उत्सुकता कायम राहिली आहे. ठाकरे शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या हाती शिवबंधन बांधून मैदानात उतरवले आहे. मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेसने या ठाकरे सेनेच्या उमेदवारीवर आक्षेप घेत थेट दिल्लीदरबारी धडक दिली. दिल्लीतील खलबतखान्यात समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. आता पुन्हा चर्चेचे केंद्र मुंबईत बनले आहे. काँग्रेस की शिवसेना यापैकी लढतीसाठी मैदानात कोण उतरणार याची चर्चा जशी सामान्य कार्यकर्त्यांना लागली आहे तशीच ती भाजपलाही लागली आहे. संत एकनाथांच्या भारुडाप्रमाणे सांगलीच्या उमेदवारीची अवस्था झाल्याचे गावकरी म्हणत आहेत, ‘काटयाच्या अरीवर वसले तीन इच्छुक, एक वसले, दोन वसेचना.’