आदित्य ठाकरेंच्या ‘खळा बैठका’

उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात रत्नागिरी -सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. विधान परिषदेच्या आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित या दौऱ्याचं नाव ‘खळा बैठक’ असं थोडं वेगळं ठेवण्यात आल्याने काहीजण संभ्रमात पडले. पण कोकणात ‘खळा’ म्हणजे भाताचं खळं. शेतात पिकलेलं भात घरी आणल्यावर या खळ्यात झोडपून लोंब्यामधले भाताचे दाणे वेगळे करायचे आणि नंतर स्वच्छ करुन पोत्यात भरण्याची पद्धत आहे. हे बऱ्यापैकी कष्टाचं काम करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि सगेसोयरे एकत्र येत असतात. स्थानिक लोकगीतं म्हणत रात्री उशीरापर्यंत ते चालतं . हे करण्यासाठी येणाऱ्या मंडळींना सहसा मजुरी दिली जात नाही. त्याऐवजी श्रमपरिहार म्हणून सामिष भोजनाचा बेत असतो. हा खास स्थानिक कृषी संस्कृतीचा संदर्भ आदित्य यांच्या या बैठकांच्या नावामागे होता. अर्थात विरोधकांनी त्यावर, ठाकरे गटाच्या नेते-कार्यकर्त्यांचे मेळावे-बैठका खुलं मैदान, सभागृह, कॉर्नर सभा असं करत आता भाताच्या खळ्यापर्यंत आक्रसल्या असल्याची टिप्पणी केली आणि बैठकीचा अजेंडा लक्षात घेता ते काहीसं खरंही होतं!

तेव्हा लय भारी….

राज्यात उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा वेदगंगा (बिद्री ) शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचे रंगात आली आहे. पाहुणे – रावळे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे असल्याने निवडणुक विशेष चर्चेत आहे. सत्तारूढ आणि विरोधी गटाकडून टीकेच्या तोफा डागल्या जात आहेत. यात मेव्हण्या- पाहुण्यांची टीकाटिपणी लक्षवेधक बनली आहे. कारखान्याचे अध्यक्ष, राधानगरीचे माजी आमदार के. पी. पाटील यांची साथ सोडून त्यांचे मेहुणे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए .वाय. पाटील यांनी विरोधकांना साथ केली आहे. ते राधानगरीचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या सोबत आहेत. त्यावरून के. पी. पाटील यांनी टीकेचे लक्ष्य करणे सोडले नाही. एका प्रचार सभेत के . पी. यांनी ए. वाय. यांचा तिरकस समाचार घेतला. ते म्हणाले, गद्दार म्हणून ज्यांचा उल्लेख पदोपदी झाला होता त्यांच्या जोडीला आमच्या सोबत होते ते गेले आहेत. याला आता काय म्हणायचं? गेले दशकभर बिद्री कारखान्याचा कारभार लय भारी असे राज्यभर स्तुती करीत होते ते कोणता चमत्कार घडला म्हणून रातोरात विरोधात बोलू लागले आहेत? हा प्रश्न दुसऱ्या मेहुण्यांना भंजाळून सोडत आहे.

BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
gopal shetty poonam mahajan absent from bjp meeting
Lok Sabha Election 2024 : बैठकीला गोपाळ शेट्टी, पूनम महाजन गैरहजर; भाजपकडून निवडणूक तयारीचा आढावा
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी

हेही वाचा : चावडी : अहो, मीच उमेदवार आहे!

राजीनाम्याचा इशारा की मतांच्या गणिताचा खुंटा बळकट ?

पश्चिम घाटातील कृष्णा खोरे हा तसा जल, जंगल आणि जमिन यांचा सुपिक भाग म्हणून ओळख असलेला भाग. कृष्णा बारमाही राखण्यात आणि कृष्णाकाठाला आर्थिक संपन्नता मिळवून देण्यात या नदीवरील कोयना धरण महत्वाचे आहे. या धरणामुळेच कृष्णाकाठ हा उस पट्टा समृध्द झाला. उसाच्या शेतीवर जशी कारखानदारी फोफावली, तशी राजकीय समृध्दीही आली. गावपातळीवरच्या चावडीवर उस दराबरोरबच राजकारणाच्या गप्पांचा फड नित्यनियमाने रात्री जागवत असतो. याच आर्थिक संपन्नेतून गावपातळीवरचे पुढारी अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देण्याबरोबरच सोनिया गांधी यांचे काय चुकले हे ठामपणाने सांगणारे पदोपदी भेटतात. यंदा मात्र, पावसाने डोळे वटारल्याने शिवारातील उसाला पाणी कसे पुरणार हा प्रश्न जसा शेतकर्यांना पडला आहे तसाच तो राजकारण्यांना पडला नसता तरच नवल. याच प्रश्नाच्या तव्यावर राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न निश्चितच विशेषत: खासदारकीची निवडणूक आल्यानंतर झाला नाही तर तो कृतघ्नपणा ठरला असता. यातूनच सांगलीचे खासदार भाजपचे असताना कृष्णा कोरडी पडण्यास शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांना जबाबदार धरत प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. एकेकाळी राजीनामे खिशात ठेवून सत्ता भोगत असलेले शिवसेनेचे मंत्री आणि आता भाजपचे खासदार एकाच पंगतीला आहेत. खासदारांची राजीनाम्याची तयारी हा मतांच्या गणितात खुंटा हलवून घट्ट करण्याचा प्रयत्नच म्हणावा लागेल.

हेही वाचा : चावडी: राडा आणि स्नेहभोजन..

यशवंतरावांचा विसर

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाला सातारा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात शासनाच्या सर्व विभागांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासाठी राज्यभरातून अनेक राजकीय नेते आणि यशवंत प्रेमी येत असतात. जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय सर्व विभागांना स्मृतिदिनाचा कार्यक्रम करण्याबाबत सूचना देते. मात्र साताऱ्यातील खंडाळा पंचायत समितीला शनिवारी शासकीय सुट्टी होती.याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश असतानाही व सुट्टी दिवशी शिल्लक कामे उरकण्याचा सूचना असतानाही आपल्याच इमारतीत यशवंतराव चव्हाण पुतळा अनेक वर्षांपूर्वी बसविण्यात पुतळा आहे याचाच विसर पंचायत समितीच्या प्रशासनाला पडला. मग कोणाच्या तरी लक्षात आले आणि घाईगडबडीत साफसफाई करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

(संकलन : सतीश कामत, दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे, विश्वास पवार)