शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्हीकडील चित्र एकदमच विसंगत दिसते. शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट गल्लीपासून ते पार दिल्लीपर्यंत हमरातुमरीवर आलेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील मुंब्रा परिसरातील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. ठाकरे गटाने तो विषय पेटविला. उद्धव ठाकरे स्वत: मुंब्र्यात आले. तेव्हा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली वा काळे झेंडे दाखविले. ठाकरे यांची भेट म्हणून फुसका बार ठरल्याचा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. मग जनताच शिंदे यांना धडा शिकवेल, खोके सरकार वगैरे उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या आवेशात इशारे दिले. एकूणच काय तर शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गटात प्रत्यक्ष राडा झाला नसला तरी परिस्थिती तशीच निर्माण झाली होती. नेमके वेगळे चित्र राष्ट्रवादीतील. गेल्या शुक्रवारी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे पुण्यात एकत्र आले होते. आता त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली की नाही हे कळण्यास मार्ग नाही. पण स्नेहभोजनाला उभयता एकत्र होते. तेथूनच अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठली. शिवसेनेत फुटीनंतर दोन्ही गटात कमालीची कटुता आणि परस्परांचा काटा काढण्याची लागलेली स्पर्धा. दुसरीकडे, राष्ट्रवादीत फुटीनंतरही बंडखोर मंत्री शरद पवारांना भेटतात, अजित पवार हे शरद पवारांच्या घरी जातात काय किंवा काका-पुतणे भेटतात काय, सारेच अचंबित करणारे. म्हणूनच फुटीनंतर एकीकडे राडा बघायला मिळतो तर दुसरीकडे स्नेहभोजन. तडीपारी आणि सोलापूर पोलिसांची कसोटी सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा वाहणारे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाईफेक केल्यामुळे चर्चेत आलेले भीम आर्मीचे शहराध्यक्ष अजय ऊर्फ रावण मैंदर्गीकर यांच्यावर पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. परंतु ही तडीपारीची नोटीस तातडीने रद्द करावी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनीच केल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासन पेचात सापडले आहे. यातून किमान सोलापुरात तरी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद होणार की काय, अशी प्रश्नार्थक चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपचे वजनदार नेते. सोलापुरात त्यांच्या अंगावर शाईफेक होण्यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर एका आंदोलक कार्यकर्त्यांने भंडारा उधळला होता. अजय मैंदर्गीकर हे विद्रोही दलित चळवळीतून आले आहेत. आपणसुध्दा विद्रोही चळवळीतूनच आलो आहोत. विद्रोही चळवळ आपला श्वास आहे, अशी पुष्टी ज्योती वाघमारे देतात. मैंदर्गीकरांवर अन्याय होऊ देऊ देणार नाही. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई झाल्यास ती कारवाई मुख्यमंत्र्यांकडून रद्द करून घेऊ, असे प्रा. डॉ. ज्योती वाघमारे बजावतात. त्यामुळे आता खरी कसोटी कोणाची, हा प्रश्न चर्चेत आला आहे. (संकलन : संतोष प्रधान, एजाज हुसेन मुजावर)