एजाजहुसेन मुजावर
सोलापूर : मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत माजी आमदार राजन पाटील-अनगरकर आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतरही सुरूच आहे. त्यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असताना पक्षश्रेष्ठी कोणताही हस्तक्षेप करीत नाहीत. त्यामुळे हा सारा प्रकार पक्षश्रेष्ठी पुरस्कृत मानायचा काय, अशी प्रश्नार्थक चर्चा सुरू आहे.
मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील राजकारण आणि समाजकारणावर प्रभाव असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. यानिमित्ताने राजन पाटील-अनगरकर आणि उमेश पाटील यांच्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्घाला आणखी जोर चढला. राजन पाटील हे शरद पवारनिष्ठ तर उमेश पाटील हे अजित पवारनिष्ठ मानले जातात. जनता दरबाराच्या नावाखाली गावोगावी सभा-बैठकीतून उमेश पाटील हे राजन पाटील व त्यांच्या कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडत आले आहेत. याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे वारंवार दाद मागितली तरीही उमेश पाटील टीकेची तलवार म्यान करीत नाहीत. मोहोळमधून १९९५ ते २००९ पर्यंत विधानसभेवर सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्वतःचा खासगी साखर कारखाना, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती आदी सत्तास्थाने वर्षानुवर्षे स्वतःच्या वर्चस्वाखाली ठेवलेले राजन पाटील यांचा मोहोळ तालुक्यात मोठा दरारा होता. त्यांचे वडील बाबुराव पाटील-अनगरकर हेसुद्धा पूर्वी अनेक वर्षे शेकापचे आमदार होते.
हेही वाचा: हातकणंगलेमध्ये चार मोठ्या घराण्यांतील तरुण नेतृत्वाची चाचपणी
मोहोळ परिसरात त्यांची मोठी दहशत असायची. त्यांच्याशी काँग्रेसचे दिवंगत माजी मंत्री शहाजीराव पाटील यांचा संघर्ष व्हायचा. १२ वर्षांपूर्वी टोकाच्या राजकीय संघर्षातून शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंडित देशमुख यांच्या खून प्रकरणात राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील हे आरोपी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यावर त्यांच्या शेटफळ गावात प्राणघातक हल्ला झाला होता. तेव्हापासून डोंगरे यांनी राजन पाटील यांच्याशी काडीमोड घेऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते. या पार्श्वभूमीवर राजन पाटील यांच्या एकहाती वर्चस्वाला आव्हान मिळत गेले. आता तर उमेश पाटील यांनी अनगरकरांवर तोफ डागायचा नित्यक्रम सुरू केला आहे.
दोन्ही पाटलांमध्ये वरचेवर वाढत जाणारा संघर्ष कोणत्या टोकाला जाणार? यात रक्तरंजित राजकारणापर्यंत मजल जाणार काय, याची सार्वत्रिक शंका व्यक्त होत असतानाच भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही पाटील चांगलेच इरेला पेटले होते. राजन पाटील यांनी पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना सोबत घेऊन कोल्हापूरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या ताब्यातून भीमा साखर कारखाना खेचून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु एकेकाळचे राजन पाटील यांचेच अनुयायी राहिलेल्या उमेश पाटील यांच्यासह माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मानाजी माने, विजय डोंगरे आदींची महाडिक यांनी एकत्र मोट बांधली. यातून विशेषतः राजन पाटील यांचे आव्हान मोडीत काढण्यात महाडिक सहजपणे यशस्वी झाले. तर आम्हा पाटलांची पोरं लग्न होण्याअगोदर मुलं जन्माला घालतात, पाटलांची पोरं वयाच्या सतराव्या वर्षी खुनाचे आरोप अंगावर घेऊन तुरुंगात जाऊन आली आहेत, असा अभिमानाने उल्लेख केल्यामुळे राजन पाटील अडचणीत आले. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे चांगलेच भांडवल करून महाडिक व इतर मंडळींना त्यांच्यावर तुटून पडण्याची आयतीच संधी मिळाली.
हेही वाचा: रविकांत तुपकर : लढवय्या शेतकरी नेता
राजन पाटील यांची राजकीय ताकद उखडून टाकण्यासाठी महाडिक यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने राजकीय व्यूहरचना आखली आहे. त्याचे दृश्य परिणाम आगामी विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील, असे वाटते. सध्या अडचणीत असलेल्या राजन पाटील व त्यांचे पुत्र आपल्या शत्रूंचे आव्हान कसे परतावून लावणार, याचीही उत्सुकता आहे. राजन पाटील यांनी उमेश पाटील यांना आगामी कोणतीही निवडणूक कोठेही लढून दाखवावी, असे आव्हान दिले आहे. तर उमेश पाटील यांनीही प्रत्युत्तर देताना, आपण नरखेड सोडतो, राजन पाटील यांनी अनगर सोडावे आणि कोठेही निवडणूक लढण्यास तयारी असल्याचे प्रतिआव्हान दिले आहे.
हेही वाचा: नागपूर विद्यापीठातील निवडणुकीत काँग्रेसमधील घरभेदी कोण?
अलिकडे काही वर्षांपासून राजन पाटील व त्यांच्या कुटुंबीयांवर त्यांच्या नक्षत्र डिस्टिलरी प्रकल्पाशी संबंधित सुमारे शंभर कोटींचा शासकीय अबकारी कर चुकविल्याप्रकरणी झालेल्या फौजदारी कारवाईमुळे अडचणीत आहेत. यातच राष्ट्रवादीअंतर्गत होणाऱ्या साठमारीच्या राजकारणात त्यांची चांगलीच घुसमट होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजपशी संपर्क वाढत असून ते कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे मानले जात असताना त्यांची भाजप प्रवेशाची वाट खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अडविली जाणार किंवा कसे, याचीही प्रश्नार्थक चर्चा मोहोळ परिसरात ऐकायला मिळते.