महायुती सरकारमध्ये तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय असल्याची ग्वाही सत्ताधाऱ्यांकडून दिली जात असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार परस्परांवर कुरघोड्याच अधिक करताना दिसतात. आमदार नवाब मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठिल्याने वाद झाला. फडणवीस यांना अजित पवार यांना खासगीत सांगता आले असते, असे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. फडवणीस यांच्या पत्रप्रपंचामुळे महायुतीतील अंतर्गत कुरबुरी चव्हाट्यावर आल्या.
नवाब मलिक यांच्या विरोधात पत्र पाठवून फडणवीस यांनी स्वत:ची प्रतिमा उंचविण्याचा प्रयत्न केला पण विरोधकांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावरून भाजपला घेरल्याने फडणवीस व भाजपची चांगलीच पंचाईत झाली. या साऱ्या घडामोडींमध्ये फडणवीस आणि अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये योग्य समन्वय नाही किंवा अजितदादांचे पंख छाटण्याचा भाजपडून प्रयत्न झाल्याचा संदेश गेला आहे.
हेही वाचा – वर्धा : चाईल्ड पोर्नोग्राफी! टेलिग्राम चॅनलवर प्रसारण करणाऱ्या विकृतास अटक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही यापूर्वी कुरघोडीचे राजकारण बघायला मिळाले. ‘देशात मोदी, राज्यात शिंदे’ या जाहीरातीच्या माध्यमातून शिंदे यांनी आपणच अधिक लोकप्रिय असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. सर्व वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत शिंदे यांना २६.१ टक्के तर फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांची पसंती असल्याची आकडेवारी प्रसिद्द करून शिंदे यांनी फडणवीस यांच्यापेक्षा आपण अधिक लोकप्रिय असल्याचे लोकांसमोर आणले होते. शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या कुरघोडीची बरीच चर्चा झाली होती. भाजपने तर शिंदे यांच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. त्याआधी कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा करून भाजपने मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांना थेट लक्ष्य केले होते. कल्याणमध्ये भाजपने फारच आक्रमक भूमिका घेतल्याने संतप्त झालेल्या मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्यापर्यंत भाषा केली होती. मुख्यमंत्री शिंदे व भाजपमध्ये या दोन घटनांवरून परस्परांवर कुरघोडी करण्याचाच प्रयत्न झाला होता.
अजित पवार यांचा महायुतीमध्ये झालेला समावेश मुख्यमंत्री शिंदे यांना फारसा रुचलेला नसावा. कारण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना चांगली खाती देण्यावरून शिंदे फारसे उत्साही नव्हते. अजित पवार समर्थक मंत्र्यांना चांगली खाती देताना शिंदे यांच्या गटाकडील काही खाती काढून घेण्यात आली होती. अजित पवार यांचे पंख छाटण्याच्या उद्देशानेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी फाईलींच्या प्रवासाचा आदेश जारी केला होता. अजित पवार यांच्या वित्त विभागाशी संबंधित महत्त्वाच्या फाईली किंवा प्रकरणे आधी फडणवीस यांच्याकडे व नंतर मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा आदेश काढण्यात आला होता. वास्तविक हा अजित पवार यांच्या खात्यामध्ये सरळसरळ हस्तक्षेपच मानला जातो.
एकूणच मुख्यमंत्री शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने फडणवीस हे सरकारचा सारा कारभार आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न करतात. या कुरघोडीच्या राजकारणावर विरोधी पक्ष पाहिजे तसे आक्रमकपणे तुटून पडत नाहीत.