पिंपरी : आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्यात असून निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सत्तेत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात शहराच्या विकासावरुन श्रेयवाद सुरु झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही पक्षांनी शहरभर केलेल्या फलकबाजीतून श्रेयवाद दिसून आला. भाजपने ‘पिंपरी-चिंचवडच्या शास्वत विकासाचे देवेंद्रपर्व, २०१४ पासून निरंतर विश्वास’ असे तर राष्ट्रवादीने ‘आदेश देतो नाही, देतो म्हणजे देतोच, तत्पर कृती, अजितनिती’…अशी फलकबाजी केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. महापालिका निवडणुकीत देवेंद्रपर्व चालणार की अजितनीती वरचढ ठरणार, हे पाहणे औत्त्सुक्याचे ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एके काळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेवर त्यांच्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांनासोबत घेऊन सन २०१७ मध्ये भाजपचे कमळ फुलविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना राजकीय पाठबळ दिले. त्यामुळे एकेकाळी कट्टर समर्थक असलेल्या लांडगे आणि जगताप यांनी अजित पवार यांनाच अस्मान दाखविले. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणली. पाच वर्षे दोघांनी महापालिकेचा कारभार पाहिला. पुढे सन २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना लक्ष्मण जगताप यांचे अजित पवार यांच्याशी काहीसे जुळले. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे अजित पवारांसोबतचे राजकीय वैर वाढतच गेले. अजित पवार हे भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले तरी त्यात काही फरक पडला नाही. त्याउलट आमदार लांडगे यांची पवारांविरोधातील धार तीव्र होताना दिसून येते.
पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे भाजपचे चार आमदार आहेत. चिंचवडचे आमदार शंकर जगताप हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. अमित गोरखे आणि उमा खापरे यांना पक्षाने विधानपरिषदेवर घेतले आहे. तर, एकदा अपक्ष आणि दोनदा कमळवार निवडून आलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. शहर भाजपमध्ये ते वरिष्ठ आहेत. त्यामुळे शहर भाजपचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर पुन्हा कमळ फुलविणे हे आमदार लांडगे यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पिंपरी महापालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्र लढण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते.
शहरात भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष ताकदवान आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षातच लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यातच दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जोरदार फलकबाजी केली. भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडच्या शास्वत विकासाचे देवेंद्रपर्व, २०१४ पासून निरंतर विश्वास असा मजकूर आणि शहरातील विकास कामांची छायाचित्रे फलकांवर टाकली आहेत. शहरभर फलकबाजी केली आहे. तर, राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या फलकांवर ‘शब्द देतो नाही, पाळतो म्हणजे पाळतोच’, ‘आदेश देतो नाही….देतो म्हणजे देतोच, तत्पर कृती अजितनिती’, ‘अजितदादा म्हणजे शब्दाला मान आणि कृतीतून प्रेरणा’ असे मजकूर असलेले फलक शहरभर झळकविले. यातून पवार यांनी शहरात दिलेल्या आश्वासनांचे प्रत्येक निर्णयामध्ये रुपांतर झाल्याचा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही पक्षांमध्ये शहरातील विकासावरुन श्रेयवाद रंगल्याचे फलकबाजीतून दिसून आले.