Congress district presidents list हरियाणा काँग्रेसने आपली संघटनात्मक व्यवस्था सुधारण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. पक्षाने तब्बल दहा वर्षांहून अधिक काळानंतर मंगळवारी रात्री ३२ जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी जाहीर केली. ही पक्षाची जिल्हास्तरावरील पहिली संघटनात्मक पुनर्रचना आहे. या नियुक्त्यांची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केली. यापूर्वी जून आणि जुलैमध्ये या घोषणा दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. हरियाणातील या बदलांमागील कारण काय? जिल्हाध्यक्षांच्या यादीत कोणकोणत्या नावांचा समावेश? जाणून घेऊयात.
३२ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले
- हरियाणा काँग्रेसने ३२ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले आहेत. या नियुक्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसने दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
- एक गट माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील आणि दुसरा सिरसाच्या खासदार कुमारी सेलजा यांच्या नेतृत्वाखालील आहे.
- पक्षाने आपल्या ‘जाट-समर्थक’ प्रतिमेला दूर सारून जातीय समीकरणातही समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच ग्रामीण आणि शहरी भागांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
- हुड्डा म्हणाले, “सर्व नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. नवीन जिल्हाप्रमुख हे काँग्रेसला पुन्हा एकदा नवसंजीवनी देऊन पक्ष मजबूत करतील.”
- नवीन जिल्हाध्यक्षांपैकी सुमारे १५ जण हुड्डा यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जात आहे, तर १२ जण सेलजा यांच्या जवळचे मानले जात आहेत.
माजी मुख्यमंत्र्यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आणि सेलजा यांच्या जवळचे मानले जाणारे शमशेर सिंह गोगी म्हणाले की, या नियुक्त्या केवळ गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या कामगिरीच्या आधारावर नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते तळागळात पक्षाला बळ देतील. आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि एकत्र काम करू.”
ओबीसी नेत्यांना प्राधान्य
ओबीसी समाजाचे असलेले मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना टक्कर देण्यासाठी पक्षाने १० ओबीसी नेत्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तर इतर सहा जाट, पाच अनुसूचित जाती (SC) आणि पाच ब्राह्मण समाजाचे आहेत. पंजाबी, राजपूत, मुस्लीम आणि शीख समाजातील प्रत्येकी एकाला संधी देण्यात आली आहे. अंबालासारख्या शहरांमध्ये पक्षाने तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यात शहर, ग्रामीण आणि निम-शहरी अशा स्वरूपाने नियुक्ती करण्यात आली आहे, तर नऊ जिल्ह्यांमध्ये दोन जिल्हाध्यक्ष (शहरी आणि ग्रामीण) निवडण्यात आले आहेत.
गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले तीन काँग्रेस उमेदवार यांचीही निवड झाली आहे. त्यात परविंदर परी (अंबाला कँट), अनिरुद्ध चौधरी (भिवानी ग्रामीण) आणि वर्धन यादव (गुरुग्राम ग्रामीण) यांच्या नावांचा समावेश आहे. परी हे अंबाला कँट मतदारसंघातून पराभूत झाले होते, चौधरी तोशाम मतदारसंघातून पराभूत झाले होते आणि यादव यांचा बादशाहपूर मतदारसंघात पराभव झाला होता.
इतर नेत्यांमध्ये पवन अग्रवाल (अंबाला शहर), दुष्यंत चौहान (अंबाला ग्रामीण), प्रदीप गुलिया (भिवानी शहरी), सुशील धनक (चरखी दादरी), बलजीत कौशिक (फरीदाबाद), अरविंद शर्मा (फतेहाबाद), पंकज डावर (गुरुग्राम शहरी), ब्रिज लाल खोवल (हिसार ग्रामीण), बजरंग दास गर्ग (हिसार शहरी), संजय यादव (झज्जर), ऋषी पाल (जींद), रामचंद गुर्जर (कैथल), राजेश वैद्य (कर्नाल ग्रामीण), पराग गाबा (कर्नाल शहरी), मेवा सिंग (कुरुक्षेत्र), सत्यवीर यादव (महेंद्रगड), शाहिदा खान (मेवात, नूह), नेत्रपाल अधाना (पलवल), संजय चौहान (पंचकुला), रमेश मलिक (पाणीपत ग्रामीण), सुभाष चंद चावरी (रेवाडी ग्रामीण), प्रवीण चौधरी (रेवाडी शहरी), बलवान सिंग रंगा (रोहतक ग्रामीण), कुलदीप सिंह (रोहतक शहरी), संतोष बेनिवाल (सिरसा), संजीव कुमार दहिया (सोनीपत ग्रामीण), कमल देवान (सोनीपत शहरी), नर पाल सिंह (यमुनानग) आणि देवेंद्र सिंग (यमुनानग) यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे संघटन सृजन अभियान
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चंदीगडमध्ये पक्षातील दिग्गज नेत्यांची भेट घेतल्यानंतर दोन महिन्यांनी या नियुक्त्या झाल्या आहेत. पक्षाच्या देशव्यापी ‘संघटन सृजन अभियान’चा एक भाग म्हणून ही बैठक घेण्यात आली होती. एआयसीसी हरियाणा प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी ६९ निरीक्षकांची यादी जाहीर केली. त्यांना राज्यभरात पक्षाचे संघटनात्मक जाळे तयार करण्याचे काम देण्यात आले होते. २०१४ मध्ये भाजपाच्या हातून सत्ता गमावल्यानंतर, पक्षाच्या राज्य युनिटमध्ये सतत मतभेद दिसून आले आहेत आणि गेल्या सहा वर्षांत पाच एआयसीसी प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ भाजपा नेते आणि मंत्री अनिल विज म्हणाले की, फार काही बदल झाल्याचे दिसत नाही. काँग्रेसमधील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती प्रक्रियेची तुलना तूप वितरणाच्या एजन्सी अधिकारांशी केली. विज म्हणाले, “लोकशाही पक्षांमध्ये पहिले गट स्तरावर, नंतर जिल्हा, राज्य आणि अखेर राष्ट्रीय स्तरावर निवडणुका होतात. मात्र, काँग्रेसमध्ये ही प्रक्रिया पहिले राष्ट्रीय (तूप) वितरक, नंतर राज्यस्तरीय वितरक आणि शेवटी जिल्हास्तरीय वितरक नेमण्यापासून सुरू होते. आता त्यांनी आपले जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. ते आता स्थानिक पातळीवर पदाधिकारी नेमतील,” असेही ते म्हणाले.