माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे छायाचित्र हटवून त्याजागी सावरकरांचे छायाचित्र अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त छापण्यात येणाऱ्या सरकारी जाहिरातींसाठी घेतल्याने भाजपाचे सावरकर प्रेम उफाळून आल्याचे दिसले.

मैसूर येथे भाजपा डळमळीत झाली असल्याने तिथे वीर सावरकर रथ यात्रा २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी घेतला. आता गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांत वीर सावकरकरांच्या विचारांवर आधारित देखावे करण्याच्या विचारावर भाजपाचा शिक्कामोर्तब झाला आहे. पक्षाचा अशा निर्णयांवर कॉँग्रेससह मुसलमान समर्थक सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाकडून टीकास्त्र सोडण्यात येते.

अलीकडेच या मुद्यावरून वातावरण तापल्याचे स्पष्ट होते. स्वातंत्र्यदिनी स्थानिक शहर प्रशासनाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र असलेले पोस्टर सर्वत्र लावल्याने सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाकडून विरोध झाला. सावरकरांचे चित्र असलेली पोस्टर काढून त्याजागी १८ व्या शतकातील मैसूरचा वाघ अशी मान्यता असलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील योद्धा म्हणून टिपू सुलतानचे चित्र लावण्यावरून चांगलेच वादंग उठले होते. भाजपा प्रचाराचा धडाका लावण्यासाठी आता सावरकरांना मुख्य राजकीय ट्रिगर म्हणून वापरत आहे. सिद्धरामय्या यांनी शिवमोग्गा येथील घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त केली की सावरकरांचा बॅनर “मुस्लीम बहुल भागात” का लावला.

सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी मांसाहारावरून भाजपला घेरले. यावर बोलताना बोम्मई म्हणाले की, सिद्धरामय्या यांनी गोंधळात टाकणारी विधाने केली. ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला. मुसलमान वस्ती असलेल्या भागात सावरकरांचे चित्र असलेले पोस्टर लावू नका असे आम्ही सांगितले होते का? येडीयुरप्पा मैसुरूत म्हणाले, “वीर सावरकर फाउंडेशनने आयोजित केलेली रथयात्रा ही सावरकर, त्यांची देशभक्ती आणि संघर्ष याविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना (सावरकर) वीर म्हणून संबोधले होते, पण कर्नाटकात त्यांच्याविरोधात सुरू असलेली मोहीम योग्य नाही.

सिद्धरामय्यांनी सावरकरांसारख्या क्रांतिकारी आदर्शाविषयी बोलताना विचार करावा असा सल्ला माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. “सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाची दखल घेत इंदिरा गांधी यांनी सावरकरांचे टपाल तिकीट प्रकाशित केले होते. कॉँग्रेसने कायमच सावकरांचे कौतुक केले आहे. मात्र सिद्धरामय्यांच्या हिंदूविरोधी कॉँग्रेसला सावरकरांची भीती वाटते,” असे राज्य भाजपा अध्यक्ष नलीन कुमार कटील म्हणाले.