काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज सकाळी पंजाब येथे पोहोचली. यावेळी गुरुद्वारा फतेहगड साहिब येथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. “भाजपा द्वेष पसरवित आहे. मात्र भारताला बंधुता, ऐक्य आणि आदर प्रिय आहे, म्हणूनच भारत जोडो यात्रा यशस्वी होत आहे”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला. “मी या यात्रेपासून खूप काही शिकलो. यात्रेदरम्यान शेतकरी, दुकानदार, मजूर, बेरोजगार युवक यांच्याशी संवाद साधला. द्वेष, हिंसा, बेरोजगारी, महागाई हेच आजच्याघडीचे भारतातील सर्वात मोठे मुद्दे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंगळवारी हरियाणा राज्यातली यात्रा पूर्ण करत पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्णमंदिराला भेट दिली. आज सकाळी जेव्हा राहुल गांधी गुरुद्वारा फतेहगड साहिब येथे दर्शन घेण्यासाठी आले तेव्हा त्यांनी पगडी आणि टीशर्ट घातले होते. राहुल गांधी यांचे टीशर्टवरही अनेक चर्चा झाल्या आहेत. पंजाबमध्ये भारत जोडो यात्रेचा दहा दिवसांचा दौरा आहे. फतेहगड पासून सुरुवात होऊन मंडी गोविंदगड, खन्ना, साहनेवाल, लुधियाना, गोराया, फगडवाडा, जालंधर, दसुआ आणि मुकेरिया या ठिकाणावरुन यात्रा पुढे जाईल. यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि इतर नेते उपस्थित आहेत. १९ जानेवारी रोजी यात्रा पठाणकोट येथे पोहोचणार असून तिथून जम्मू आणि काश्मीरकेड कूच केले जाईल.

भाजपा-संघ देशाची विभागणी करतोय

पंजाबमध्ये पाऊल ठेवल्यानंतर राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपा आणि संघावर टीका केली. “भाजपा आणि आरएसएसचे लोक देशाची विभागणी करत आहेत. हे लोक एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधात, एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात, एका भाषेला दुसऱ्या भाषेविरोधात भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. यांनी देशाचे वातावरण खराब केले आहे. त्यासाठीच देशाला एक नवा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जो मार्ग एकता, बंधुता, प्रेमाचा असेल. त्यासाठीच भारत जोडो यात्रा सुरु करण्यात आली आहे.”, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही बोलायला नाही ऐकायला आलो आहोत

भारत जोडो यात्रा यशस्वी झाली असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, आम्ही बोलायला नाही तर तुमचे ऐकायला आलो आहोत. आम्ही सकाळी ६ वाजता उठतो, रोज २५ किमी चालतो. रोज सहा ते सात तास लोकांचे म्हणणे ऐकून घेत आहोत. त्यानंतरच दहा ते पंधरा मिनिटे आमचे म्हणणे मांडत आहोत. या यात्रेचा प्रमुख उद्देशच लोकांचे म्हणणे ऐकणे हा आहे.