पुणे : राज्यात काँग्रेसची पडझड होत असताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी २६४ नेत्यांची जम्बो प्रदेश कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची व्यूहरचना पुण्यात आखली जाणार आहे. पुण्यात ११ आणि १२ ऑगस्ट रोजी प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार असून, त्या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीबरोबरच पक्षाला उर्जितावस्था आणण्यासाठी पराभवाचे आत्मपरीक्षण आणि भविष्यातील गळती रोखण्यासाठी आत्मचिंतन केले जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी नुकतीच जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, १०८ सरचिटणीस, ९५ चिटणीस, एक खजिनदार, पाच प्रवक्ते आहेत. या कार्यकारिणीत पुण्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत. ११ आणि १२ ऑगस्ट रोजी पुण्यात सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील एका सिसॉर्टमध्ये या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या नियोजनाची जबाबदारी ही पुण्यावर सोपविण्यात आली आहे.

या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढताना काँग्रेसला अधिक जागा मिळण्यासाठी कोणती रणनीती आखायची, महाविकास आघाडीसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असावा, कोणत्या जागांवर अधिक लक्ष केंद्रित करायचे, यावर चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला प्रमुख नेत्यांकडून मार्गदर्शन आणि सूचना दिल्या जाणार आहेत.

पक्षाची पडझड रोखण्यावर या बैठकीत चिंतन केले जाणार आहे. सदस्य नोंदणी प्रभावीपणे करून तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी नियोजन करणे, बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांना अधिक अधिकार देऊन त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे, यावरही बैठकीत ऊहापोह केला जाणार आहे. कोणत्या भागात पक्षाला यश मिळेल, यासाठी निवडणूकपूर्व सर्वेक्षण करून उमेदवारांची निवड करण्याबाबतही विचारमंथन होणार आहे. पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा वापर, मतदारांशी संवाद साधण्यासाठी प्रचार यात्रा किंवा अन्य मार्गांचा अवलंब करण्याबाबत या बैठकीत नियोजन केले जाणार आहे.

पुणे जिल्हाध्यक्षाची निवड

पुरंदर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे भाजपमध्ये गेल्याने हे पद रिक्त आहे. या पदावर कोणाची निवड करायची, याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. या पदासाठी श्रीरंग चव्हाण, लहु निवंगुणे आणि माजी खासदार अशोक मोहोळ यांचे पुत्र संग्राम मोहोळ यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी कोणाला संधी द्यायची, हे बैठकीत निश्चित होणार आहे.

पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात ११ आणि १२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. या बैठकीला वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती असणार आहे. त्यामध्ये आगामी काळातील नियोजनावर चर्चा केली जाणार आहे. गोपाळ तिवारी, वरिष्ठ राज्य प्रवक्ते, काँग्रेस</strong>