चंद्रशेखर बोबडे, प्रतिनिधी

नागपूर : एकाच मुद्यावर दोन वेगवेगळ्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयांमुळे एका राजकीय पक्षाच्या महिला उमेदवाराची निवडणूक लढवण्याची संधी हिरावली गेली तर दुसऱ्या महिला उमेदवाची निवडणूक लढण्याची दारे उघडी झाली. हे दोन्ही निर्णय भाजपच्या पथ्थ्यावर पडणारे ठरले आहेत. हा मुद्या आहे जात प्रमाणपत्राचा आणि उमेदवार आहेत काँग्रेसच्या रश्मी बर्वे (रामटेक) आणि भाजपच्या नवीनत राणा (अमरावती). बुधवारी नागपूरमध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आणि दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्रा संदर्भात निकाल दिले. एक निर्णय रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या सदंर्भातील होता.तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या संदर्भातील होता.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला. मात्र त्यावर आक्षेप घेतल्यावर चौकशीसाठी सरकारी यंत्रणा इतकी तत्पर्तेने वागली की एक दिवसात चौकशी व अन्य प्रक्रिया पार पाडून जात पडताळणी समितीने त्यांचा अर्ज रद्द केला. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्जही बाद झाला. त्यांनी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

हेही वाचा >>> घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

दुसरे प्रकरण अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे आहे. २०१९ मध्ये अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्यावर त्यांचे २०२१ मध्ये जात प्रमाणपत्र रद्द झाले होते. त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उर्वरित काळ त्यांची खासदारकी कायम राहीली. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अमरावतीची उमेदवारी देण्यात आली.

या दोन्ही प्रकरणांचे निकाल गुरूवारी लागले. रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा जात पडताळणी समितीचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द ठरवला. पण निवडणूक प्रक्रिया पुढे गेल्याने व त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिल्याने बर्वे यांना न्यायालयाने दिलेल्या दिलासाचा काहीही उपयोग झाला नाही, त्या रिंगणाबाहेर फेकल्या गेल्या.

हेही वाचा >>> जम्मू काश्मीर: ओमर अब्दुल्ला मेहबूबा मुफ्तींवर का संतापले? पीडीपी जम्मू काश्मीरमध्ये पाच जागांवर लढणार

राणा यांच्या प्रकरणावरही सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे राणा यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला, त्यांनी अर्जही भरला.

राजकीय अंगाने या दोन्ही प्रकरणाकडे पाहिले तर भाजपचा याच्याशी संबंध येतो. नवनीत राणा या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सेना -भाजप युतीच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आल्या. पण निवडून येताच त्यांनी केंद्रात मोदींना समर्थन दिले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले होते. त्यांची भाजपशी जवळिक वाढली होती. २०२१ मध्ये जात प्रमाणपत्र रद्द होऊनही त्यांचे लोकसभा सदस्यत्व अबाधित राहिले. रश्मी बर्वे या काँग्रेसच्या. भाजपविरोधात लढून त्या जि.प.मध्ये निवडून आल्या. रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आले. त्याच्या चौकशीसाठी सरकारी यंत्रणा तत्पर्तेने हलली. रामटेकमध्ये भाजपने आयात केलेला उमेदवार शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहे हे येथे उल्लेखनीय..