केरळच्या एका दलित रॅपरविरोधात भाजपा नेत्याने तक्रार दाखल केली आहे. केरळमध्ये निवडणुका तोंडावर असताना तेथील राजकारण दलित रॅपरभोवती फिरत आहे. त्याला काही दिवसांपूर्वी गांजा प्रकरणातही अटक करण्यात आली होती; ज्यामुळे तो चर्चेत आला होता. मात्र, आता त्याच्यावर आपल्या रॅपमध्ये पंतप्रधान मोदींची बदनामी केल्याचा, तसेच जातीवर आधारित विभाजनाला प्रोत्साहन दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. असे असले तरी केरळमधील काही पक्ष भाजपा आणि संघाच्या विरोधात जाऊन त्याला पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. नेमके प्रकरण काय? रॅपर वेदान कोण आहे? त्याने आपल्या गाण्यात पंतप्रधान मोदींविषयी काय म्हटले? त्याविषयी जाणून घेऊ…
रॅपरविरोधात तक्रार दाखल
पलक्कड येथे डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ)च्या सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वेदान स्टार ठरला होता. त्या कार्यक्रमात वेदानसाठी गर्दी जमली होती. गर्दीने कार्यक्रमस्थळाचे नुकसान केल्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्या घटनेच्या काही दिवसांनंतर स्थानिक भाजपा नगरसेवकाने रॅपर-गीतकाराविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली. त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी केल्याचा आणि त्याच्या गाण्याद्वारे जाती-आधारित विभाजनाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला.
लैंगिक गैरवर्तनाचा आरोप
वेदान वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. वेदानला गांजा प्रकरणातदेखील अटक करण्यात आली होती. त्याच्यासह इतर साथीदारांकडून नऊ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. त्याने घातलेल्या बिबट्याच्या दाताच्या पेंडंटमुळेदेखील त्याच्याविरुद्ध आणखी एक खटला सुरू झाला. जामिनावर सुटका झाल्यानंतर स्वतःच्या सवयी सुधारण्याचे आश्वासन वेदानने दिले. २०२१ मध्ये त्याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी सोशल मीडियावर त्याने एक माफीनामा पोस्ट केला होता. या माफीनाम्यात त्याने लिहिले होते, “तुम्हाला, माझ्या महिला मैत्रिणींना आणि भागीदारांना मैत्रीने भेटताना तुमच्याशी केलेल्या वागणुकीतील त्रुटींकडे मी मागे वळून पाहतो तेव्हा मला आत्मतिरस्कार आणि पश्चात्ताप होतो.”
पलक्कड नगरपालिकेतील भाजप नगरसेवक व्ही. एस. मिनिमोल यांनी वेदानविरुद्ध तक्रार दाखल केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न हिंदू ऐक्यवेदीच्या नेत्या के. पी. शशिकला यांनीदेखील वेदानवर अशाच आशयाचे आरोप केले आहेत. वेदानच्या अयोग्य पोशाख घातलेल्या कृत्यांमुळे समाजाचा अपमान होत असल्याचे आणि अनुसूचित जाती/जमातींसाठी असणाऱ्या संगीताच्या प्रासंगिकतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वेदानने आपल्या गाण्यात काय लिहिले?
हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये त्याच्या गाण्याने संताप वाढवला आहे. त्याने ‘व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस’ या गाण्यात लिहिले, “नकली राष्ट्रवादींच्या देशात श्रद्धा आणि जात पीडा आहेत / इथे खरा नेता नाही, फक्त करांचे ओझे आहे, जे मिटवले जाऊ शकत नाही. अर्धे राष्ट्र तलवारी चालवणाऱ्यांच्या हातात आहे; पण एक शब्द बोलल्यास ते तुम्हाला राष्ट्रविरोधी, कट्टरपंथी ठरवतील.” संघाच्या मल्याळम मुखपत्र केसरीचे मुख्य संपादक एन. आर. मधु यांनी अलीकडेच वेदानवर टीका केली. त्यांनी म्हटले की, तो जिहादींच्या हातातील एक शस्त्र झाला आहे. त्याला जातीय दडपशाहीविरुद्ध लढणारा म्हणणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. “जातीय दडपशाहीला विरोध करण्याच्या नावाखाली तो समाजात तेढ निर्माण करीत आहे,” असेही त्यांनी म्हटले.
मल्याळम वृत्तवाहिनी रिपोर्टरला दिलेल्या अलीकडच्या मुलाखतीत मधु म्हणाले की, वेदानला गोपनीय हेतू असलेल्या लोकांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. ते म्हणाले की, त्याला प्रोत्साहन दिले जात आहे. कारण- तो सीरिया आणि पॅलेस्टाईनबद्दल गातो. त्याने एका कार्यक्रमात स्वतःला पॅलेस्टाईनच्या ध्वजाभोवती गुंडाळले होते आणि त्याला पाठिंबादेखील मिळाला होता. वेदानच्या रोहिंग्यांबद्दल आणि एलटीटीईबद्दलच्या लेखनाविषयीदेखील ते बोलले. मुलाखतीत मधु म्हणाले, “त्याने लंकेत तहानलेल्या वाघांबद्दल (म्हणजेच एलटीटीई अतिरेकी) लिहिले आहे. याचा अर्थ तो सशस्त्र उठावाला प्रोत्साहन देत आहे, असा होत नाही का?”
प्रकरणावर वेदानची प्रतिक्रिया काय?
गुरुवारी पत्रकारांशी बोलताना वेदान म्हणाला की, शशिकला यांनी त्याच्याविरुद्ध केलेले वक्तव्य म्हणजे त्याला अतिरेकी, फुटीरतावादी म्हणून दाखविण्याचा प्रयत्न आहे. “बलात्काराचा अनुसूचित जाती/जमाती समुदायाशी काहीही संबंध नाही,” या शशिकला यांच्या विधानावर वेदान म्हणाला की, संघ परिवारातील लोकशाही आणि अतिरेकी हिंदुत्ववादी राजकारणाचा कोणताही संबंध नाही. शशिकला यांच्या वक्तव्यातून त्यांच्यासारख्या लोकांमध्ये अशी वृत्ती असल्याचे दिसून येते की, अनुसूचित जाती/जमातींनी कलाकार होण्यासारखे वेगळे काही करू नये, असेही तो म्हणाला. “माझ्याकडे शास्त्रीय गाणी गाण्यासाठी आवाज नाही. जर मला गाता आले असते, तर मी ते केले असते. पण, मी फक्त रॅप गाऊ शकतो,” असे त्याने कोची येथे पत्रकारांना सांगितले.
रॅपर वेदान कोण आहे?
वेदानचा जन्म त्रिशूर येथे झाला असून, त्याचे आई-वडील श्रीलंकेतील तमीळ स्थलांतरित व दलित कामगार आहेत. त्याचे खरे नाव हिरन दास मुरली आहे. उपेक्षितांचे मुद्दे मांडत त्यांच्या संगीताच्या बळावर त्याला लोकप्रियता मिळवली आहे. उजव्या विचारसरणीच्या राजकारणाचा निषेध करणारी त्याची गाणी त्याच्या आईच्या निर्वासित ओळखीतून घेण्यात आलेली प्रेरणा असल्याचे लक्षात येते. नाव न सांगण्याच्या अटीवर सीपीआय(एम)च्या एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, वेदानचा पाठिंबा पक्षासाठी बळकटी ठरू शकतो.
वेदानला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध असल्यामुळे त्याला डाव्या पक्षांनीही पाठिंबा दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. वेदान उजवी विचारसरणी, फुटीर राजकारण, इस्लामोफोबिया व जातीच्या दडपशाहीविरोधात गाणे लिहितो आणि गातो. सीपीआय(एम)चे ज्येष्ठ नेते पी. जयराजन यांनी शशिकला यांच्या वेदानविरुद्धच्या वक्तव्यावर ‘जातीय अत्याचार’ अशी टीका केली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी केली आहे.