scorecardresearch

Premium

राजस्थान निवडणूक : नोकऱ्यांत ७५ टक्के आरक्षण, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, दुष्यंत चौटालांची आश्वासनं; २५-३० जागा लढवणार?

जेजेपी पक्ष राजस्थानमध्ये २५ ते ३० जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.

DUSHYANT CHAUTALA
दुष्यंत चौटाला (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हरियाणातील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत जननायक जनता पार्टी (जेजेपी) या पक्षाला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून भाजपाने या पक्षाला सत्तेत सामील करत दुष्यंत चौटाला यांना थेट हरियाणाच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर आता या पक्षाने हरियाणानंतर राजस्थानमध्येही निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी या पक्षाकडून राजस्थानच्या जनतेला आकर्षक आश्वासनं दिली जात आहेत. जेजेपी पक्ष राजस्थानमध्ये २५ ते ३० जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये येत्या नोव्हेंबर-डिसेंबर विधानसभा निवडणूक होणार आहे.

जेजेपी २५ ते ३० जागांवर निवडणूक लढवणार

जेजेपी पक्ष राजस्थानमध्ये २५ ते ३० जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. येथे भाजपाशी युती करण्याची शक्यताही जेजेपी पक्षाकडून पडाताळून पाहिली जात आहे. याबाबत जेजेपी पक्षाचे प्रमुख तथा हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजस्थानमध्ये भाजपाशी युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र सध्यातरी आम्ही २५ ते ३० जागांवर आमचा पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमच्या पक्षांकडे तरुण आकर्षित होत आहेत. हीच आमची सर्वांत मोठी ताकद असणार आहे,” असे दुष्यंत चौटाला म्हणाले.

Viral VIDEO Biker Sets Free Dogs Being Carried In Agra Nagar Nigam Van On Highway In UP
भटक्या कुत्र्यांना महापालिकेने पकडले अन् बाईकस्वाराने केले मुक्त; चालत्या वाहनातून उड्या मारणाऱ्या कुत्र्यांचा Video Viral
Ketan Parekh share market scam,
Money Mantra : केतन पारेख घोटाळा (भाग १)
akola mahayuti news in marathi, akola politics marathi news, akola mahayuti coordination news in marathi
अकोल्यात महायुतीमध्ये समन्वय राखण्याचे आव्हान
bmc administration soon start tender for the work for 400 km roads
रस्त्यांच्या आणखी ४०० किमी कामासाठी लवकरच निविदा; निवडणूकीचा मुहूर्त साधण्याची शक्यता

एकूण २०० जागांसाठी येथे निवडणूक होणार

राजस्थानच्या निवडणुकीत उतरण्यासाठी हा पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेजेपी पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला हे राजस्थानच्या दौऱ्यावर होते. त्यांनी राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांत पक्षकार्यालयांचे उद्घाटन केले. या राज्यात जनाधार वाढेल तसेच काही जागांवर उमेदवारांचा विजय होईल, अशी चौटाला यांना अपेक्षा आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण २०० जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या येथे काँग्रेसचे १०७ तर भाजपाचे ९३ आमदार आहेत.

चौटाला यांच्याकडून वेगवेगळी आश्वासनं

हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत जेजेपी पक्षाने जी आश्वासनं दिली होती, अगदी तीच आश्वासनं हा पक्ष राजस्थानच्या निवडणुकीतही देत आहे. नोकऱ्यांत ७५ टक्के आरक्षण, बेरोजगारी कमी करणे, शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई देणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण, शेतमाल खरेदीसाठी उत्तम व्यवस्था, बाजार समितीत बदल अशा काही आश्वासनांचा यात समावेश आहे.

चौटाला कुटुंबाचा राजस्थानशी खास संबंध

दुष्यंत चौटाला यांचे राजस्थानशी खास नाते आहे. त्यांचे पणजोबा देवीलाल हे देशाचे सहावे उपपंतप्रधान होते. त्यांनी १९८९ साली राजस्थानमधील सिकार तसेच हरियाणातील रोहतक येथून लोकसभेची निवडणूक लढवली होती. देवीलाल यांचे पूर्वज राजस्थानधील बिकानेर येथे राहिलेले आहेत. पुढे त्यांचे पूर्वज हिरियाणातील सिरसा जिल्ह्यात स्थायिक झाले. दरम्यान, जेजेपी या पक्षाने राजस्थानमध्ये भाजपाशी युती करून निवडणूक लढवायची की स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे जायचे, हे अद्याप ठरवलेले नाही. मात्र भाजपा आणि जेजेपी या दोन्ही पक्षांना काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. त्यामुळे येथे भाजपा आणि जेजेपी या पक्षांची युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘पणजोबा देवीलाल यांची जयंती साजरी करणार’

आपल्या दौऱ्यादरम्यान, दुष्यंत चौटाला यांनी राजस्थानच्या जनतेला अनेक आश्वासनं दिली. बिकानेर येथे बोलत असताना राजस्थानमध्ये पणजोबा देवीलाल यांची जयंती साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी झुनझुनू, जयपूर, सिकार, नागपूर, बिकानेर या जिल्ह्यांना काही दिवसांपूर्वी भेट दिलेली आहे. मला येथील लोकांचा खूप प्रतिसाद लाभला. या प्रतिसादामुळे मी भारावलो आहे, अशा भावना चौटाला यांनी व्यक्त केल्या.

‘मुख्यमंत्री किसान होगा’

यासह राजस्थानमधील लोक काँग्रेसला कंटाळले आहेत. यासह राजस्थानमध्ये अमली पदार्थांची तस्करी वाढलेली आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, पेपर लीक प्रकरणामुळे अनेकांचे नुकसान झालेले आहे. येथील जनतेला आता बदल हवा आहे. याच कारणामुळे लोक जेजेपी पक्षाशी जोडले जात आहेत. ‘चाबी का निशान होगा, मुख्यमंत्री किसान होगा’ अशी आमच्या पक्षाची घोषणा आहे. या घोषणेमुळेही बरेच लोक आमच्याकडे आकर्षित होत आहेत, असेही चौटाला म्हणाले. तसेच लवकरच राजस्थानमध्ये आमचे पक्ष खाते उघडणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपा आणि जेजेपी पक्षात युती होणार का?

दरम्यान, जेजेपी पक्षाने एकूण १८ जिल्हे निवडलेले आहेत. या १८ जिल्ह्यांवरच पक्षातर्फे विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळे आगामी कळात राजस्थान निवडणुकीसाठी भाजपा आणि जेजेपी पक्षात युती होणार का? जेजेपी पक्षाच्या येण्याने काँग्रेस पक्षाला काय फटका बसणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dushyant chautala jjp party to contest rajasthan assembly election 2023 prd

First published on: 11-09-2023 at 19:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×