लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारच्या मतदारयादी प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. याबाबत सत्ताधारी पक्षावर आरोप करताना त्यांनी दावा केला की, त्यांच्या हाती अणुबॉम्बसारखे पुरावे लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारे त्यांनी म्हटले की, आयोगाने २०२४ लोकसभा निवडणुकीत बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपासाठी मतांची चोरी केली. दिल्लीत गुरुवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, “बंगळुरू सेंट्रलमधील सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस जिंकली, फक्त महादेवपुरा सोडून. काँग्रेसला ही लोकसभा निवडणूक १ लाख १४ हजार ४६ मतांनी गमवावी लागली होती. मग आम्ही या आकडेवारीचा अभ्यास करायला सुरुवात केली. १ लाख १४ हजार ४६ हा एवढा मोठा आकडा एका मतदारसंघातून कसा आला? ही फार मोठी तफावत आहे. त्यामुळे आम्ही महादेवपुरा मतदारसंघातील तपशील पडताळू लागलो. त्यानंतर आम्हाला असे कळले की १ लाख २५० मतांची चोरी झाली आहे.” एकूण ६.५ लाख मतांपैकी १ लाख २५ मतांची चोरी झाली असा आरोप राहुल गांधींनी केला. “या मतांची पाच वेगवेगळ्या प्रकारे चोरी झाली. डुप्लिकेट मतदार, बनावट पत्ते, एकाच पत्त्यावर मोठ्या संख्येने मतदार, बनावट फोटो आणि पहिल्यांदाच नावनोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म ६चा गैरवापर.”
२००८ मध्ये महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून या जागेवर सलग चार निवडणुकांमध्ये भाजपाने यश मिळवले आहे. बंगळुरू सेंट्रल लोकसभा जागाही भाजपाकडेच राहिली असून काँग्रेस कायम दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. मात्र, बंगळुरू सेंट्रल लोकसभेतील इतर सात मतदारसंघांच्या तुलनेत महादेवपुरामध्ये मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
बंगळुरू सेंट्रलची मतदारसंख्या
महादेवपुरा मतदारसंघाची निर्मिती २००८ च्या मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेत झाली. त्यावेळी २००८ च्या विधानसभा निवडणुकीत इथली मतदारसंख्या २.७५ लाख एवढी होती. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत ही संख्या ६.६ लाखांवर पोहोचली, म्हणजेच एकूण १४० टक्क्यांनी मतदारसंख्येत वाढ झाली. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सर्वज्ञाननगरमध्ये मतदारसंख्या २००८ मधील ३.०५ लाखांवरून २०२४ मध्ये ३.८६ लाख इतकी वाढली, म्हणजेच इथे वाढ केवळ २६.५ टक्के इतकी होती. इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढ याच सुमारास झाली आहे. शांतीनगरमध्ये २५.२ टक्के, सी व्ही रमण नगरमध्ये २३.१ टक्के, शिवाजीनगरमध्ये १९.८ टक्के, राजाजीनगरमध्ये १३.७ टक्के, चामराजपेटमध्ये १२.६ टक्के आणि गांधीनगरमध्ये ३ टक्के एवढी वाढ मतदारसंख्येत झाली.
महादेवपुरा मतदारसंघ अस्तित्वात येण्याआधी २००० सालाच्या सुरुवातीला आयटी क्षेत्रात वाढ झाल्यानंतर बंगळुरूच्या मध्यवर्ती भागात बांधकाम व्यवसायात मात्र घट झाली. गेल्या वीस वर्षांमध्ये नवीन स्थलांतरितांसाठी महादेवपुरा हा परवडणाऱ्या घरांचा आणि सर्व सोईसुविधा भागवणारा परिसर ठरला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेवपुरा हा सर्वात मोठा मतदारसंघ ठरला. त्याची मतदारसंख्या सर्वज्ञाननगरपेक्षा जवळपास दुप्पट आहे. २००८ मध्ये सर्वात अधिक मतदारसंख्या सर्वज्ञाननगर या मतदारसंघाची होती. शहरी मतदारसंघांमध्ये सहसा मतदान टक्केवारी कमी असते. असं असतानाही २००८ ते २०१८ दरम्यानच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महादेवपुरा हा बंगळुरू सेंट्रलमधील सर्वाधिक मतदान टक्केवारी असलेला मतदारसंघ राहिला आहे. २०१३ मध्ये ही टक्केवारी ६१.६ टक्के एवढी होती. २०२३ मध्ये मात्र हा मतदारसंघ चौथ्या क्रमांकावर गेला आणि मतदान टक्केवारी ५५ टक्के इतकी झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेवपुरा ५८ टक्के मतदानासह दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, २०२४ मध्ये ५४ टक्के मतदानासह सहाव्या क्रमांकावर गेला. तरीही २००८ पासून महादेवपुरामध्ये प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक प्रत्यक्ष मतदार राहिले आहेत.
महादेवपुरा मतदारसंघातील लोकसभा, विधानसभा निवडणुका
विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये महादेवपुरा मतदारसंघावर आणि बंगळुरू सेंट्रलमध्ये भाजपाचेच वर्चस्व राहिलेले आहे. २००९ पासून भाजपाचे पी सी मोहन यांनी बंगळुरू सेंट्रल लोकसभा जागा सलग चार वेळा जिंकली. महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातही २००९ ते २०२४ या सर्व लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा आघाडीवर राहिली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली. काँग्रेस दोन आणि जनता दलाने एका मतदारसंघात विजय मिळवला. २०१४ मध्ये भाजपाने पुन्हा पाच जागा आणि काँग्रेसने तीन जागा जिंकल्या. २०१९ आणि २०२४ मध्ये भाजपा आणि काँग्रेस प्रत्येकी चार चार जागांवर आघाडीवर होते.
मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये बंगळुरू सेंट्रलमधील अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला महादेवपुरा हा एकमेव मतदारसंघ आहे. इथे भाजपाच्या मतांची टक्केवारी प्रत्येक निवडणुकीगणिक वाढत गेली आहे. २००९ मधील ४५.६ टक्क्यांवरून २०२४ मध्ये ६४.७ टक्क्यांपर्यंत इतकी वाढत गेली. इतर सर्व मतदारसंघांमध्ये भाजपाच्या मतांचा टक्का वर-खाली होत राहिला.
काँग्रेसने मात्र गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये बंगळुरू सेंट्रलमधील चार मतदारसंघांमध्ये मतांचा टक्का वाढवला. यापैकी तीन मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम लोकसंख्या आहे. चामराजपेटमध्ये ४३.८ टक्के, शिवाजीनगरमध्ये ३८.३ टक्के आणि सर्वज्ञाननगरमध्ये ३२.१ टक्के इतकी मुस्लीम लोकसंख्या आहे. ही आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार आहे. महादेवपुरामध्ये काँग्रेसचा मतांचा टक्का २००९ ते २०१४ दरम्यान घटला. २०१९ मध्ये त्यात किंचित वाढ झाली आणि २०२४ मध्ये आणखी कमी झाली.
महादेवपुरा विधानसभा जागा २००८पासून भाजपाने सलग चार वेळा जिंकली. २००८मध्ये माजी राज्य मंत्री अरविंद लिम्बावली, २०१३ आणि २०१८ मध्ये देखील लिम्बावली हेच विजयी ठरले आणि २०२३मध्ये त्यांच्या पत्नी मंजुळा एस यांनी विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकांमध्ये महादेवपुरामध्ये भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत चढ-उतार झाला. २०२३मध्ये पक्षाची सर्वाधिक मतांची टक्केवारी ५४.३ इतकी होती. २०२३ मध्ये भाजपाला सर्वाधि ४४ हजार ५०१ मतांची आघाडी मिळाली. काँग्रेस कायम दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर २०१३ मध्ये पक्षाची सर्वाधिक मतांची टक्केवारी ४५.९ इतकी होती.