Election Commission controversy गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतांच्या चोरीचा आरोप केला. या आरोपांना उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाने रविवारी (१७ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. मात्र, इंडिया आघाडीतील पक्षांनी सोमवारी निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी म्हटले की, निवडणूक आयोग निष्पक्ष संस्थेसारखे काम करत नसून ते पक्षपाती अधिकाऱ्यांच्या हातात आहे. दरम्यान, भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘मतचोरी’च्या आरोपांवर निवडणूक आयोगाने केलेल्या टिप्पण्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल विरोधकांवर पलटवार केला. भाजपाने म्हटले की, विरोधकांना राजकीय फायद्यासाठी केवळ गोंधळाचे वातावरण हवे आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेबाबत विरोधक काय म्हणाले? भाजपाने नक्की काय प्रत्युत्तर दिले? जाणून घेऊयात.
गौरव गोगोई यांची पत्रकार परिषद
- काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर टीका करत म्हटले, “निवडणूक आयोग पक्षपाती अधिकाऱ्यांच्या हातात आहे, ते विरोधकांनी केलेल्या कोणत्याही आरोपांची चौकशी करत नाहीत.”
- ते पुढे म्हणाले, “निवडणूक आयोगाने कालच्या पत्रकार परिषदेत राजकीय पक्षांवर प्रश्न उपस्थित केले. लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांदरम्यान ७० लाख नवीन मतदार कसे जोडले गेले, यावरही ते शांत होते. हे स्पष्ट आहे की, निवडणूक आयोग निष्पक्ष नसलेल्या अधिकाऱ्यांच्या अधीन आहे,” असे ते म्हणाले.
- एका बैठकीनंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके आणि आरजेडी यांसारख्या आठ प्रमुख विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्ला चढवला.
भाजपाचे संबित पात्रा यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर टीका करत म्हटले की, त्यांनी अशी कोणतीही घटनात्मक संस्था सोडली नाही की ज्यावर त्यांनी टीका केली नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या निकालापासून ते भारतीय लष्करप्रमुखांना गुंड म्हणण्यापर्यंत सर्व काही केले, असे ते म्हणाले. संबित पात्रा म्हणाले, “काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, गांधी कुटुंब आणि त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक घराणेशाहीच्या पक्षाने देशात अशी कोणतीही घटनात्मक संस्था नाही, ज्यावर टीका केली नाही. हे तेच लोक आहेत ज्यांनी राम मंदिराच्या बाजूने निर्णय आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी भारतीय लष्करप्रमुखांनाही गुंड म्हटले आहे, सैन्यावर हल्ला केला आहे. त्यांना वाटते की पंतप्रधानांची खुर्ची म्हणजे त्यांचा जन्मसिद्ध हक्क असलेले सिंहासन आहे. हा वारसा नसून तो सेवेतून कमावला जातो,” असे पात्रा म्हणाले.
विरोधकांनी काय आरोप केले?
विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार भाजपाच्या प्रवक्त्यासारखे काम करत असल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद म्हणजे बाहुल्यांच्या खेळाचे प्रदर्शन, असल्याचे म्हटले. फसव्या मतदार याद्यांवरून निवडणूक आयोगावर कारवाई व्हायला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. महुआ मोइत्रा म्हणाल्या, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी डुप्लिकेट ईपीआयसी मतदार कार्डचा मुद्दा उपस्थित केला, पण तो सोडवला गेला नाही. निवडणूक आयोगाचे काम विरोधकांवर हल्ला करणे नाही.”
समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले की, निवडणूक आयोग असा दावा करत आहे की, विरोधक तथ्यांशिवाय आरोप करत आहेत आणि कोणतीही प्रतिज्ञापत्रे दिली गेली नाहीत. मात्र, त्यांचा दावा चुकीचा आहे. “२०२२ मध्ये १८,००० मतदार वगळल्याबद्दल समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते, परंतु निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही,” असे यादव म्हणाले. ते पुढे म्हणाले, “निवडणूक आयोग म्हणत आहे की, निराधार तक्रारी केल्या जात आहेत हे चुकीचे आहे. उत्तर प्रदेशमध्ये मते कापण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. हे सर्व एका नियोजित पद्धतीने केले जाते आणि निवडणूक आयोग आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो; हा एक गंभीर मुद्दा आहे.”
गोगोई म्हणाले की, “मतदानाचा हक्क हा सामान्य नागरिकाला संविधानाने दिलेला सर्वात महत्त्वाचा हक्क आहे, त्यावर लोकशाही अवलंबून असते. त्याचे संरक्षण करण्यासाठी निवडणूक आयोग ही संस्था आहे. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजकीय पक्षांनी विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही आणि ते त्यांच्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत.” गोगोई पुढे म्हणाले की, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करणे हे त्याचे संवैधानिक कर्तव्य आहे आणि दावा केला की, अधिकारी त्यांच्या आरोपांची चौकशी होऊ देत नाहीत.
ते म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्तांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती. मात्र, त्याउलट त्यांनी राजकीय पक्षांवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यांच्यावर हल्ला केला. निवडणुकांना फक्त तीन महिने शिल्लक असताना, राजकीय पक्षांशी चर्चा न करता एसआयआर इतक्या घाईत का केले जात आहे. एसआयआर जाहीर करण्याची त्यांना घाई का आहे हे त्यांनी सांगायला हवे होते. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते मनोज झा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर टीका करत म्हटले, “काल आम्ही आमच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा शोध घेत होतो, मात्र आम्हाला एक नवीन भाजपा प्रवक्ता सापडला.”
भाजपाने काय प्रत्युत्तर दिले?
भाजपाने म्हटले की, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमुळे विरोधक चिडले आहेत. “निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण विरोधी पक्ष गोंधळला आहे. संबित पात्रा म्हणाले की, काँग्रेस आणि विरोधी पक्षांना देशात अराजकतेचे वातावरण हवे आहे आणि त्यातून राजकीय फायदा मिळवायचा आहे. “काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केलेल्या यात्रांमुळे काहीही होणार नाही. देशातील प्रत्येक गोष्ट चोरणारे आणि धान्याची चोरी करणारे संवैधानिक संस्थेवर चोरीचा आरोप करत आहे, हे निराशाजनक आहे. काल निवडणूक आयोगाने एक पत्रकार परिषद घेतली आणि प्रत्येक मुद्द्यावर उत्तर दिले,” असे त्यांनी पुढे म्हटले.
भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदारांचा अपमान केल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने फटकारले असूनही, बिहारच्या ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’च्या मुद्द्यावरून विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत असे त्या म्हणाल्या. “निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना फटकारले आहे की, त्यांनी लोकांचा आणि मतदारांचा अपमान केला. राहुल गांधी यांनी ज्या मतदारांची नावे घेतली त्यांचा अनादर केला आहे. असे असूनही इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज येथे नाटक केले, त्यामुळे तुम्ही समजू शकता की जर त्यांना सत्ता मिळाली नाही तर ते कोणतेही काम होऊ देणार नाहीत. जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी भ्रष्टाचार केला. आता जेव्हा देश प्रगती करत आहे, तेव्हा ते दुःखी आहेत. जनता हे पाहत आहे आणि म्हणूनच ते कोणतीही निवडणूक जिंकू शकणार नाहीत,” असे रणौत म्हणाल्या.
केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोगाची नोटीस आणण्याचा विरोधकांचा विचार म्हणजे संविधानाचा अपमान आहे. “पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके सादर होणार होती, मात्र सतत गोंधळ सुरूच होता. निवडणूक आयोग वैध मतदाराचे नाव कधीही हटवू शकत नाही. विरोधकांना त्यांना मतदार करून त्यांना भारताचे नागरिक करायचे आहे. असे झाल्यास, लोकशाहीतील निवडणुकांवर परिणाम होईल. ज्यांना मतदानाचा अधिकार नाही ते मतदार झाले तर सामाजिक सलोख्याबरोबरच देशाच्या अंतर्गत सुरक्षेवरही परिणाम होईल,” असे ते म्हणाले.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ म्हणाले, “राहुल गांधी आणि काँग्रेसने खोटे बोलून वारंवार लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी सातत्याने खोटेपणाच्या प्रत्येक मर्यादा ओलांडत आहेत. निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरण आणि तथ्यांनी काँग्रेसचा कट उघड केला आहे, सत्य समोर आले आहे.”