Maharashtra Political Top News Today : महाराष्ट्रात आज दिवसभरात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या अडचणीत मोठी वाढ झाली, तर आमदार अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली, तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कोणीच किंमत देत नसल्याची टीका भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली… आणि ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला असून पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
शिवसेना शिंदे गटाच्या अडचणीत वाढ
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहे. एकीकडे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील प्रस्थापित नेत्याला न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली; तर दुसरीकडे महाड येथील मनसेच्या शहर अध्यक्षाला मारहाण केल्याप्रकरणी शिंदेसेनेच्या सात पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आधीच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून अजित पवार गट आणि शिंदे गटातील वाद विकोपाला गेला आहे. त्यातच निवडणुकांपूर्वी दोन वेगवेगळ्या घटनामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने शिंदे गटांच्या अडचणींमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
उद्धव ठाकरे यांना पुन्हा धक्का
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधीच पक्षांतराला वेग आला असून अनेकांनी तिकिटासाठी पक्षाला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील विक्रोळी, चेंबूर, कांजूरमार्ग, भागातील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित आज ठाण्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. दुसरीकडे, अजित पवार यांच्या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडल्याचे सांगितले जात आहे.
आणखी वाचा : Maharashtra Politics : अजित पवारांची चोहोबाजूने कोंडी; भाजपाला मोठा फायदा? महायुतीमध्ये काय घडतंय?
मिटकरी-ठोबरेंची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
आमदार अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने पक्षांच्या नव्या प्रवक्त्यांची यादीदेखील जाहीर करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे मिटकरी आणि ठोंबरे यांची पक्षाने गच्छंती केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणासह आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षातीलच आमदार व पदाधिकाऱ्यांकडून वादग्रस्त विधान करण्यात येत असल्याने अनेकदा त्यांची कोंडी होत आहे. त्यामुळे पक्षाने कठोर पावले उचलत नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली. यामध्ये प्रवक्ते पदावरून आमदार अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा नारा
मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांना दिली. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. ‘आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही. मुंबई महापालिकेची तिजोरी खाली झाली असून भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला समोरे जाणार आहोत, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : Ajit Pawar : अजित पवारांना नेमकं कोण अडचणीत आणतंय? पवार कुटुंबियांची भूमिका काय?
सुरेश धस यांची धनंजय मुंडेवर टीका
आमदार धनंजय मुंडे हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) अडगळीत पडले असून, त्यांना कोणी किंमत देत नाही, अशी खोचक टीका भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आंतरवालीत जाऊन भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जरांगे यांचे एक साथीदार गंगाधर काळकुटे यांनीही मुंडे यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगे व आपल्यामध्ये दरी पाडण्याचा डाव धनंजय मुंडे यांनी टाकला असून, आपल्याला २५ कोटी रुपये देण्याचा आणि विधान परिषदेवर घेण्याचा प्रस्ताव यापूर्वी दिल्याचा आरोप गंगाधर काळकुटे यांनी पत्रकार बैठक घेऊन केला आहे.
