सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापुरातील पाच माजी नगरसेवकांनी अपेक्षेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा सोलापूरचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीने त्या मुंबईत त्यांच्याच कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तौफिक इस्माईल शेख यांच्यासह सोलापूर महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती इब्राहिम कुरेशी, वाहेदाबी शेख, नूतन गायकवाड आणि तस्लिम शेख या पाच माजी नगरसेवकांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का बसला आहे.
वादग्रस्त प्रतिमा असलेो तौफिक शेख हे मूळचे काँग्रेसचे स्थानिक स्थानिक नेते विष्णुपंत कोठे यांच्या तालमीत तयार झाल्यानंतर त्यांना दोन वेळा महापालिकेत प्रतिनिधित्व करता आले. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी २०१४ साली शेख यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून बाहेर पडत एमआयएमसारख्या नवख्या पक्षात प्रवेश केला होता.
एवढेच नव्हे तर त्या पक्षाकडून त्यांनी काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. त्यानंतर पुढे २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा इच्छुक होते. परंतु त्याच सुमारास शेजारच्या कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात एका महिलेच्या खूनप्रकरणी शेख यांना अटक झाली होती. परिणामी, इकडे एमआयएम पक्षाने सोलापुरात त्यांचे विधानसभेचे तिकीट कापले होते. त्यामुळे त्यांनी त्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पुढे योग्य वेळ येताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
तथापि, अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये फूट पडताच तोफिक शेख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या असता भाजपबरोबर सत्तेत भागीदार झालेल्या अजित पवार यांच्या पक्षात जाण्यास शेख यांच्या विश्वासू सहका-यांनी विरोध केला होता. त्यामुळे शेख यांना शरद पवार यांच्याच राष्ट्रवादी पक्षात थांबावे लागले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून उभे राहून जुगार खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यात त्यांच्या एकूणच प्रतिमेला पुन्हा धक्का बसला होता. या संपूर्ण वाटचालीत त्यांचे बंधू माजी महापौर आरीफ शेख हे काँग्रेस पक्षात कायम आहेत. गेल्या महिन्यात सोलापुरात ज्येष्ठ हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत व्यासपीठावर नेत्यांच्या शेजारी बसायला खुर्ची न मिळाल्याने संतप्त झालेल्या तौफिक शेख यांनी तात्काळ बैठक सोडून बाहेर पडत पक्षाचा राजीनामा दिला होता.
त्याचवेळी त्यांची पुढची वाटचाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत गेलेल्यांमध्ये नूतन गायकवाड यांचा समावेश आहे. त्यांचे पती, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. परंतु त्यांच्या सिध्दार्थ हाउसिंग सोसायटी परिसरात वैभव वाघे या तरूणाच्या हत्येप्रकरणी त्यांच्यासह त्यांची दोन्ही मुले आणि पुतण्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
याशिवाय खंडणीचेही काही गुन्हे एका पाठोपाठ एक दाखल झाले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून गायकवाड पितापुत्रांसह इतर तुरूंगात बंदिस्त आहेत. प्रमोद गायकवाड कुटुंबीयांच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी मेणबत्ती मोर्चाही काढला होता. या पार्श्वभूमीवर गायकवाड पितापुत्र जामिनावर सुटका करून घेण्यासाठी धडपड करीत आहेत. त्या अनुषंगाने गायकवाड यांच्या पत्नी नूतन गायकवाड यांनी तौफिक शेख यांच्या सोबत सत्तेत भागीदार अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे.