राज्यातील पाच टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या (शुक्रवार) सुरुवात होत असली तरी महायुतीत मतदारसंघाचे वाटपच अंतिम झालेले नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीत मुंबईतील उमेदवार काँग्रेसने अद्यापही निश्चित केलेले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मुंबईतील सहा, ठाण्यातील चार आणि नाशिकमधील तीन अशा १३ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारपासून सुरू होत आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३ मेपर्यंत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आला तरी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात १३ मतदारसंघांतील सर्व जागांचे वाटप निश्चित झालेले नाही. परिणामी उमेदवारही जाहीर झालेले नाहीत.

कुठे अडले ?

महायुतीत ठाणे, दक्षिण मुंबई, नाशिक, पालघर या चार मतदारसंघांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने या जागेवर शिवसेनेचा हक्क असला तरी भाजपने या जागेवर दावा केला आहे. दुसरीकडे, शिंदे यांच्याकडे ठाण्यासाठी तगडा उमेदवार नाही. म्हणून नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या कुटुंबियासाठी ही जागा सोडावी, अशी भाजपची मागणी आहे. या वादात ठाण्याचा तिढा सुटलेला नाही.

हेही वाचा – TMC पेक्षा १ जागा जास्त जिंकलो तरी ममता सरकार पडेल; बंगाल भाजपा प्रमुखांचा दावा

दक्षिण मुंबईत गेल्या वेळी शिवसेनेचे अरविंद सावंत हे विजयी झाले होते. सावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार असून त्यांचा प्रचार केव्हाच सुरू झाला आहे. गेल्या वेळी शिवसेनेने ही जागा जिंकल्याने महायुतीत शिंदे गटाने या जागेवर दावा केला आहे. भाजपचा या जागेवर डोळा होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरविण्याची योजना होती. पण नार्वेकर निवडून येण्याबाबत भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात आढळून आले. यातूनच ही जागा मनसेला सोडण्याची चर्चा सुरू झाली होती. पण राज ठाकरे यांनी मनसे लढणार नसल्याचे जाहीर केले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. पण लोढा हे विकासक असल्याने वेगळी टीका सुरू होण्याची भाजप नेत्यांना भीती वाटते. शिंदे दक्षिण मुंबईची जागा सोडण्यास तयार नाहीत. मिलिदं देवरा यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली असल्याने ते लढण्यास फारसे उत्सुक नाहीत. आमदार यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अर्ज भरण्याचा दिवस आला तरी ही जागा लढणार कोण हे अद्याप निश्चित झालेले नाही.

नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. पण भाजपचा नाशिकसाठी आग्रह होता. शिंदे ही जागा सोडण्यास तयार नाहीत. मग भाजपने छगन भुजबळ यांचे नाव पुढे केले. भुजबळांनी लढण्याची तयारी सुरू केली. पण तीन आठवडे वाट बधून काहीच निर्णय होत नसल्याने अखेर भुजबळांनी माघार घेतली. गोडसे हे आपलीच उमेदवारी पक्की असल्याचे सांगत असले तरी पक्षाने अधिकृतपणे त्यांचे नाव जाहीर केलेले नाही. या साऱ्या गोंधळात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वाजे यांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली. पालघरमध्ये शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत. गावित यांना लढायचे आहे पण त्यांना भाजपची उमेदवारी हवी आहे. शिंदे गट जागा सोडण्यास तयार नाही. या गोंधळात पालघरचाही तिढा सुटू शकलेला नाही.

कल्याणमध्ये शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार असले तरी त्यांची उमेदवारी पक्षाने अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. तशीच वेळ आल्यास श्रीकांत शिंदे यांना ठाण्यातून उभे केले जाऊ शकते, अशी शिवसेनेत चर्चा आहे. पण श्रीकांत शिंदे यांनी आपण कल्याणमधूनच लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा – मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित

वायव्य मुंबईत शिंदे गटाचे गजाजन कीर्तिकर हे खासदार असले तरी प्रकृतीच्या कारणावरून ते लढणार नाहीत. हा मतदारसंघ मिळावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. पण शिंदे गट ही जागा सोडण्यास तयार नाही. चित्रपट अभिनेता गोविंदा यांचे नाव शिंदे गटात चर्चेत होते. पण अद्यापही या मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाही.

पूनम महाजन यांचे भवितव्य अधांतरी

भाजपने मुंबईतील तीनपैकी दोन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली. उत्तर मध्य मुंबईच्या पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा अद्यापही निर्णय झालेला नाही. उमेदवारीबाबत अनिश्चितता असतानाच त्यांनी प्रचारही थांबविला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लढावे, अशी पक्षाची योजना असली तरी स्वत: शेलार यांची तयारी नाही. यामुळे भाजपमध्ये या मतदारसंघाचा तिढा कायम आहे.

काँग्रेसचे उमेदवार रखडले

मुंबईतील उत्तर मध्य आणि उत्तर मुंबई या दोन जागा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. यापैकी उत्तर मुंबईत काँग्रेस फारशी आग्रही दिसत नाही. काँग्रेसला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ हवा होता, पण शिवसेना ठाकरे गटाने ही जागा सोडण्यास नकार दिला. उत्तर मध्य मुंबईत भाई जगताप, सुरेश शेट्टी, नसिम खान, राज बब्बर अशी नावे चर्चेत आहेत. पण अद्याप पक्षाला उमेदवार निश्चित करता आलेला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Filling of candidature form in mumbai thane will start from tomorrow still constituencies candidates not decided print politics news ssb
Show comments