“मी कॉंग्रेस सोडल्यावर माझी विश्वासार्हता संपवण्याचा प्रयत्न केला गेला. तिने कॉंग्रेस पक्षाला ८ कोटी रूपयांचा गंडा घातला आणि पळून गेली अश्या प्रकारच्या बातम्या खास कन्नड वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आल्या. मी पळून गेले नाही तर मी माझ्या वैयक्तिक कारणांनी राजीनामा दिला. फक्त गप्प बसणे ही माझी चुक आहे”. या ट्वीटमुळे अत्यंत वेगाने पुढे येउन तितक्याच वेगाने सक्रिय राजकारणातून गायब झालेल्या कॉंग्रेसच्या माजी सोशल मीडिया प्रमुख आणि अभिनेत्री दिव्या स्पंदना ‘रम्या’ या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री अश्वथनारायण यांनी पोलिस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याची चौकशी सार्वजनिक व्यासपीठावर करण्यापासून संरक्षण मागून घेतले आणि काँग्रेस नेते एम.बी. पाटील यांची भेट घेतली होती, या कॉंग्रसचे प्रदेक्षाध्यक्ष डी. शिवकुमार यांच्या विधानावर स्पंदनाने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर या वादाला सुरवात झाली.

दुस-या दिवशी स्पंदनाने शिवकुमार यांच्यावर टीका करणारं ट्वीट केलं होतं त्यात ती म्हणाली होती की ” वेगवेगळ्या पक्षातील लोक एकमेकांना भेटतात, सोबत कार्यक्रमाला जातात, दुस-या पक्षातील नेत्याच्या कुटुंबात लग्नही करतात. डी. शिवकुमार हे कट्टर कॉंग्रेसी असुन एस.बी पाटलांविषयी असं वक्तव्य करतात याचं मला आश्चर्य वाटतं.

याच ट्वीटच्या पार्श्वभुमीवर स्पंदनाला ट्रोल केल्याचं तिनं म्हटलं आहे. याचे फोटो सोशल मीडियावर प्रकाशित करत स्पंदनानं आरोप केला आहे की “कॉंग्रेस कार्यालयानंच सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मला ट्रोल करायला सांगितलं आहे” शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस कार्यालय असा उल्लेख तिने आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. एआयसीसीचे सरचिटणीस के. वेणूगोपाल यांना तीने ट्वीटद्वारे विनंती केली आहे की जेव्हा तुम्ही कर्नाटकात याल तेव्हा मीडिया समोर तुमची भूमिका स्पष्ट करा. त्यामुळे मला या चुकीच्या आरोपासह आणि ट्रोलिंगसह जगावे लागणार नाही.

स्पंदनाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर टाकले आहेत. यात अनेक जण तिच्या पक्ष निष्ठेवर आणि पक्षात केलेल्या प्रवेशाबाबत टीका करत आहेत. अभिनेत्री असणा-या स्पंदना यांनी २०१२ मध्ये युवक कॉंग्रेसच्या माध्यामातून राजकारणात प्रवेश केला होता. २०१३ मध्ये स्पंदना मंड्या लोकसभा मतदार संघाची पोट निवडणुक जिंकली मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत स्पंदनाला पराभावचा सामना करावा लागला होता.

कॉंग्रेसनं स्पंदनाला पक्षाच्या सोशल मिडीया टीमची राष्ट्रीय प्रमुख बनवल्याने ती अचानक प्रकाश झोतात आली होती. या विभागाचं काम तिनं स्वता:च्या हुशारीने आणि उत्साहाने चोखपणे केलं होतं. स्पंदानाचा समावेश टीम राहुल गांधीमध्ये होत होता. त्यानंतर स्पंदनानं अचानक कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा झालेल्या पराभवानंतर तिने अचानक तिची सर्व सोशल मिडीया अकाउंट्स बंद केली. मात्र २०१९ च्या निवडणुकांच्या निकाला आधिच हा निर्णय घेतला होता असं तिने सांगीतलं. सध्या स्पंदना राजकारणात सक्रिय नसली तरी सोशल मिडीयावर सक्रिय आहे. कॉंग्रेसमधील एका नेत्याच्या म्हणण्यानुसार कॉंग्रेसमधील गटातटाचं राजकारण चव्हाट्यावर आलं आहे.