सांंगली : सांगलीतील जागावाटपाचा घोळ होण्यास जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप होत असतानाच जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व गट एकत्र आले, काँग्रेस एकसंघ होत आहे हे न पाहवल्याने कोणाची तरी दृष्ट लागली. ही दृष्ट उतरविण्यासाठी यापुढील काळात आपण बांधील आहोत, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देणे तर याचा वचपा काढल्याविना आपण गप्प बसणार नाही हे आमदार विश्वजित कदम यांचे वक्तव्य म्हणजे काँग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्यात आल्याचे मानले जात आहे.
सांगलीत नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम आदींच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सांगली मतदार संघातून विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत असल्याने काँग्रेस पक्षाकडून कारवाई होणे अपेक्षित असताना ही कारवाई टाळण्यात आली. त्यांच्यावर कारवाईची आग्रही मागणी शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी केली असतानाही गुरूवारी झालेल्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारवाईचे अधिकार दिल्लीत असून त्यांच्या आदेशाने पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगत वेळ मारून नेली. यामुळे अप्रत्यक्ष सांगलीतील बंडखोरीला एकप्रकारे बळ देण्याचा प्रयत्न यामागेे नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.
हेही वाचा : राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघात जंगली प्राण्यांचा उच्छाद
सांगलीच्या जागेसाठी अखेरपर्यंत काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम आग्रही होते. याची तयारी त्यांनी गेल्या दोन वर्षापासून चालवली होती. विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा उमेदवारीसाठी होणारी चढाओढ टाळण्यासाठी सांगलीत असलेली गटा-तटाची काँग्रेस लोकसभेच्या निमित्ताने एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले. लोकसभेसाठी विशाल पाटील आणि विधानसभेसाठी पलूस-कडेगावमध्ये डॉ. कदम, जतसाठी विक्रमसिंह सावंत आणि सांगलीसाठी पृथ्वीराज पाटील अशी वाटणीही झाली. या दिशेने तयारी चालू असताना गेल्या एक महिन्यापासून सांगलीच्या लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू झाला.
हेही वाचा : हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?
यामुळे सांगलीच्या जागेचा तिढा हा शिवसेनेच्या भूमिकेमुळे घडला नसून यामागे जी शक्ती आहे त्या शक्तीचा सामना करण्याची मानसिकता काँग्रेसने तयार केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करताना काँग्रेस नेत्यांचा अपेक्षित जोरही दिसून आला नाही. उलट विशाल पाटलांबाबत काय भूमिका हे अधांतरी ठेवून मेळाव्याचे सूप वाजले. यामुळे मविआतील बंडखोरीला काँग्रेस नेत्यांचे पाठबळ आहे का अशी शंका व्यक्त होत आहे. केंद्रातील भाजपचे सरकार घालवले पाहिजे हे सोंगत असताना मविआचा उमेदवार विजयी होण्यासाठी बंडखोरीवर काय उपाय हे सांगण्यात आले नाही. मत विभाजन टाळले तरच भाजपचा पराभव होउ शकतो हे साधे गणित असताना विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारे एकही वाक्यही काँग्रेसच्या नेत्यांनी या मेळाव्यात उच्चारण्याचे टाळले. सांगलीतील स्थितीचा अहवाल पक्ष श्रेष्ठींना पाठवला जाईल. त्यांच्याकडून जसे आदेश येतील तशी कारवाई केली जाईल असे पटोले यांनी पत्रकारांनी विचारले म्हणून सांगितले. जरी अहवाल पाठवला असला तरी नाण्याची दुसरी बाजू ऐकण्यासाठी खुलासा करण्यासही विशाल पाटील यांना वेळ दिला जाईल, त्यांचा खुलासा प्राप्त होण्यास किमान सात दिवस द्यावे लागतील, त्यानंतर कारवाई म्हणजे वरातीमागून घोडे असाच एकंदरित प्रकार दिसत असल्याने बंडखोरीला पाठबळ कोणाचे याचे उत्तर यात दडले आहे का?