Abhinav Bharat organization मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने गुरुवारी (३१ जुलै) निकाल दिला. या खटल्यातून भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही जणांची निर्दोष सुटका झाली. या खटल्यात अभिनव भारत संघटनेच्या सद्स्यांवर आरोप करण्यात आला होता. १९०४ मध्ये स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा देण्यासाठी ही संघटना स्थापन केली होती. स्वातंत्र्योत्तर भारतात ही संघटना पुनरुज्जीवित करण्यात आली होती. त्यानंतर ही संघटना २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणादरम्यान चर्चेत आली होती. त्यावेळी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह काही सदस्यांवर मालेगाव बॉम्बस्फोटाचे सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला होता. नेमकी ही संघटना काय आहे? या संघटनेवर काय आरोप करण्यात आले होते? जाणून घेऊयात.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर अभिनव संघटनेची प्रतिक्रिया
मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी सुटका केली. अभिनव भारत संघटनेचे प्रमुख असल्याचा दावा करणारे पुण्याचे रहिवासी मिलिंद जोशीराव या निकालावर म्हणाले की, या संघटनेवर खोटे आरोप लावले गेले आणि ‘भगवा दहशतवाद’ असे शब्द प्रचलित करण्यात आले. “हा निकाल दर्शवतो की अभिनव भारत आणि बॉम्बस्फोटात अटक झालेल्या हिंदूंच्या विरोधात केलेले सर्व आरोप खोटे होते,” असे म्हणत त्यांनी या निकालाचे स्वागत केले.
काय आहे अभिनव भारत संघटना?
- स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्ववादी विचारवंतही होते, त्यांनी १९५२ मध्ये अभिनव भारत ही संघटना विसर्जित केली होती.
- स्वतंत्र भारतात सशस्त्र लढ्याची गरज नाही असे सांगून त्यांनी तरुणांना देशाची सेवा करण्यासाठी संरक्षण दलात सामील होण्याचे आवाहन केले होते.
- २००६ मध्ये, त्यांचे भाऊ नारायण यांच्या पुत्रवधू हिमानी सावरकर यांनी काही इतिहासकार, विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने रायगडमध्ये या संघटनेचे पुनरुज्जीवन केले.
- या संघटनेच्या अध्यक्षा असलेल्या हिमानी या महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांचे मोठे बंधू गोपाळ गोडसे यांच्या कन्या आहेत.
हिमानी यांच्या म्हणण्यानुसार, ९ फेब्रुवारी २००७ रोजी अभिनव भारतची ट्रस्ट म्हणून नोंदणी झाली. तरुणांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे, सामाजिक प्रश्नांवर जागरूकता वाढवणे आणि हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाबद्दल त्यांना माहिती देणे, यासाठी ही संघटना पुनरुज्जीवित करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील महाविद्यालये, सार्वजनिक व्यासपीठांवर व्याख्याने, चर्चा आणि परिसंवादांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्याचे संघटनेचे ध्येय होते.
अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांवर काय आरोप झाले?
मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या तपासकर्त्यांनुसार, अभिनव भारत एक ‘संघटित गुन्हेगारी टोळी (organised crime syndicate) असल्याचे सांगण्यात आले होते. या संघटनेचे सदस्य २००३ पासून सक्रिय होते. पुरोहित यांच्यावर या हल्ल्यासाठी काश्मीरमधून स्फोटके मिळवण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी संघटनेच्या पुनरुज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही म्हटले गेले. तपासकर्त्यांनी असाही दावा केला होता की, अभिनव भारतला भारताचे रूपांतर हिंदू राष्ट्र म्हणजेच ‘आर्यवर्त’मध्ये करायचे होते. त्यांचे सदस्य संविधानावर असंतुष्ट होते. हिंदू राष्ट्राला विरोध करणाऱ्या लोकांना संपवण्यासाठी संघटनेतील लोकांना गनिमी काव्याचे प्रशिक्षण देण्याचाही त्यांच्यावर आरोप होता. “समाजासाठी रचनात्मक कार्य करणाऱ्या संघटनेला अशा प्रकारे त्रास दिला गेला हे दुर्दैवी आहे,” असे पुरोहित यांनी निकालानंतर सांगितले.
महाराष्ट्र एटीएसच्या आरोपपत्रानुसार, हिमानी यांनी आपल्या जबाबात म्हटले होते की, पुरोहित यांनी भोपाळमध्ये एका बैठकीत मुस्लिमांवर सूड घेण्यासाठी मालेगावच्या जागेवर चर्चा केली होती. मात्र, जानेवारी २००९ मध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना त्यांनी तपासणीदरम्यान अशा प्रकारचा कोणताही उल्लेख केला नसल्याचे म्हटले होते. २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा सत्याकी सावरकर म्हणाले की, भगव्या दहशतवादाची खोटी कथा पसरवल्या गेल्यामुळे या प्रकरणात माझ्या आईला खूप त्रास झाला. अभिनव भारतचे निर्दोष मुक्त झालेले आणखी एक सदस्य अजय राहीरकर हे २००८ मध्ये त्यांच्या अटकेच्या वेळी संघटनेचे कोषाध्यक्ष होते.
तपासकर्त्यांनी दावा केला होता की, पुण्यातल्या एरंडवणे येथील राहीरकर यांचे घर अभिनव भारतचे मुख्य कार्यालय होते. मात्र, राहीरकर यांचे वकील नितीन आपटे यांनी सांगितले की, ही संस्था एक नोंदणीकृत ट्रस्ट आहे आणि सरकारने तिच्यावर बंदी घातलेली नाही. मिलिंद जोशीराव म्हणाले की, अभिनव भारतला एक अतिरेकी संघटना ठरवून तिचे दस्तऐवज जप्त केले गेले असले तरी तिने राष्ट्रहितासाठी काम करणे सुरूच ठेवले.
सत्याकी सावरकर यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हटले, “मालेगाव येथे झालेल्या बॉम्ब स्फोटासंदर्भात जो अभियोग सुरू होता त्याचा निर्णय आज लागला. सन्माननीय न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाचा निर्णय सहर्ष स्वीकारत आहोत. अभिनव भारतच्या आणि सर्व निरपराध कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या मंडळींचे मनःपूर्वक अभिनंदन.” ते पुढे म्हणाले, “‘भगवा दहशतवाद’, ‘हिंदू आतंकवाद’ हे केवळ शब्दांचे बुडबुडेच होते, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले.”