जळगाव : उन्मेश पाटील यांना पक्षाने संसदीय मंडळाच्या निकषांत न बसल्यामुळे उमेदवारी नाकारली. त्यांनी पक्षाशी एकनिष्ठतेचा दाखला दिला असतानाही ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी आणखी थोडी वाट बघायला हवी होती. आपण किती मोठी चूक केली, हे आगामी काळात त्यांना कळेल, असा सूचक इशारा भाजपचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. भाजपचे खासदार उन्मेश पाटील आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष तथा विधानसभा क्षेत्रप्रमुख करण पवार यांनी बुधवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपमध्ये दोघांना पुढे मोठे भवितव्य होते. मात्र, त्यांनी खूप घाई केली, अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा >>> घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

पक्षात आल्यानंतर दोनच महिन्यांत उन्मेष पाटील यांना आमदारकी मिळाली. त्यानंतर खासदारकी मिळाली. आता पक्ष सोडला म्हणून ते काहीही बोलू शकतात. केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी का नाकारली, याची कारणे पाटील यांना माहिती आहेत. आपले काय चुकले, याचे पाटील यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपल्या चुका लपविण्यासाठी कोणावरही काहीही आरोप करायचे. त्यांची देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलण्याची तेवढी पात्रता आहे का ? त्यांना भाजपमध्ये कोणीच डावलले नव्हते. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. आपले आणि त्यांचे बोलणेही झालेले नाही. त्यांनीही संपर्क साधलेला नाही. याच्यावर नाराज आहे, त्याच्यावर नाराज आहे, हे कारण इथे नको, असे मंत्री महाजन यांनी नमूद करीत यंदाच्या निवडणुकीत गेल्यावेळपेक्षा अधिक मताधिक्क्याने आमचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. आता घोडा मैदान समोर आहे.

हेही वाचा >>> जम्मू काश्मीर: ओमर अब्दुल्ला मेहबूबा मुफ्तींवर का संतापले? पीडीपी जम्मू काश्मीरमध्ये पाच जागांवर लढणार

आता लढा आणि निवडून दाखवाच. किती लोक तुमच्या पाठीशी उभे आहेत, ते आगामी काळात कळेलच, असेही मंत्री महाजन यांनी नमूद केले. खडसे पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चांच्या मुद्यावरही मंत्री महाजन यांनी मत व्यक्त केले. ज्या पक्षाने आपल्याला आमदार केले, त्याच पक्षाला विश्‍वासात घेऊन दुसर्‍या पक्षात जाईल, असे खडसेंचे म्हणणे योग्य आहे का, असा टोला हाणला. त्यांचे नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांच्याशी चांगले संबंध आहेत, तर एवढे वाईट दिवस त्यांच्यावर का आले, असा सवाल करीत महाजन यांनी खडसेंना डिवचले.