आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने रविवारी (२४ मार्च) उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत अनेक प्रसिद्ध नावांचा समावेश आहे. कंगना रणौत, अरुण गोविल या सिनेकलाकारांचीही उमेदवारी भाजपाने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे गोव्यात पहिल्यांदाच भाजपाने एका महिलेला उमेदवारी दिली आहे. दक्षिण गोवा मतदारसंघातून गोव्यातील प्रमुख व्यावसायिक कुटुंबातील सदस्य उद्योजिका पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोव्यात भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या त्या पहिल्या महिला उमेदवार आहेत.

निवडणूक रोख्यांचे कनेक्शन

डेम्पो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ​​कार्यकारी संचालक व डेम्पो चॅरिटीज ट्रस्टच्या विश्वस्त पल्लवी डेम्पो या त्यांच्या व्यवसायातील मीडिया आणि रिअल इस्टेट विभाग हाताळतात. डेम्पो ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष श्रीनिवास डेम्पो यांच्या त्या पत्नी आहेत. रिअल इस्टेट, अन्न प्रक्रिया, जहाजबांधणी, वृत्तपत्र प्रकाशन व कॅलक्लाइंड पेट्रोलियम कोक व्यवसायांमध्ये डेम्पो समूह कार्यरत आहे. यापूर्वी त्यांचा खाण व्यवसायही होता.

विशेष म्हणजे अलीकडे जाहीर झालेल्या निवडणूक रोख्यांच्या माहितीत असे दिसून आले की, श्रीनिवास डेम्पो यांनी जानेवारी २०२२ मध्ये १.२५ कोटी किमतीचे निवडणूक रोखे खरेदी केले होते. हे निवडणूक रोखे गोव्यात विधानसभा निवडणूक होण्याच्या एक महिना आधी खरेदी करण्यात आले होते. त्यातील ५० लाख रुपयांचे रोखे भाजपाने परत केले. डेम्पो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, गोवा कार्बन लिमिटेड, देवश्री निर्माण एलएलपी, नवहिंद पेपर्स अॅण्ड पब्लिकेशन्ससह समूहाच्या उपकंपन्यांनी २०१९ ते २०२४ दरम्यान १.१ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले आहेत. त्यातील ५० लाख रुपयांचा वापर भाजपाने केला आहे.

रविवारी उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत पल्लवी डेम्पो यांनी पणजी येथील पक्ष कार्यालयात औपचारिकपणे भाजपामध्ये प्रवेश केला. “पंतप्रधान प्रत्येकाला धर्म, जात, पंथ यांची पर्वा न करता, सक्षम करीत आले आहेत. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी दिली आहे. माझे नाव सुचविल्याबद्दल मी पक्षाची आभारी आहे,” असे पल्लवी डेम्पो म्हणाल्या. राजकारणात येण्याच्या निर्णयावर त्या म्हणाल्या, “व्यक्ती कधीही सुरुवात करू शकते. माझा भाजपाच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास आहे.”

काँग्रेसचा बालेकिल्ल्यात पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी

पल्लवी यांनी पार्वतीबाई चौघुले कॉलेजमधून रसायनशास्त्राची पदवी मिळविली आहे. त्यासह पुण्यातील एमआयटी कॉलेजमधून व्यवसाय व्यवस्थापन (एमबीए) मध्ये त्या पदव्युत्तर पदवीधर आहेत. दक्षिण गोव्यातील जागेवर सध्या काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्डिन्हा प्रतिनिधित्व करीत आहेत. दक्षिण गोव्यात २० विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकसंख्या आहे. हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसने तब्बल १० वेळा ही जागा जिंकली आहे; तर भाजपाने १९९९ व २०१४ मध्ये केवळ दोनदाच ही जागा जिंकली आहे.

दक्षिण गोव्यातील जागेसाठी राज्यातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना माजी खासदार नरेंद्र सवाईकर व माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ‘बाबू’ कवळेकर यांचे नाव सुचविले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींना राज्यातील नेत्यांना महिला उमेदवारांचे नाव सुचवण्यास सांगितले. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि सभापती रमेश तवडकर यांनी पूर्वीच या शर्यतीतून माघार घेतली होती आणि निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे कळविले होते.

इतिहास रचण्याची संधी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, “ही इतिहास रचण्याची संधी आहे. मी सर्व महिलांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. आपण दक्षिण गोव्याची जागा ६०,००० मतांच्या फरकाने जिंकू.” ते पुढे म्हणाले, “शिक्षण, क्रीडा आणि इतर क्षेत्रांत डेम्पो कुटुंबाने गोव्यातील लोकांची आणि समाजाची शतकाहून अधिक काळ सेवा केली आहे. मला खात्री आहे की, त्या गोव्यातील लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद यांच्या जोरावर सेवेचा हा वारसा पुढे चालवतील.”

काँग्रेसची टीका

दरम्यान, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी भाजपावर बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देऊन स्वतःच्या पक्षकार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल टीका केली. “आजच भाजपामध्ये दाखल झालेल्या व्यक्तीला त्यांनी तिकीट दिले आहे. त्यामुळे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमधून त्यांना उमेदवार मिळू शकला नाही, हे दुर्दैव आहे. दक्षिण गोव्याची जागा काँग्रेस जिंकेल,” असे गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

हेही वाचा : लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

गोव्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. गोव्यात एकूण ११.७२ लाख नोंदणीकृत मतदार आहेत. त्यापैकी ५.७८ लाख उत्तर गोव्यात; तर ५.९३ लाख मतदार दक्षिण गोव्यात आहेत.