गुजरातमध्ये जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष निवडीवरून जिग्नेश मेवाणी यांनी एक सूचक मात्र निराशाजनक वक्तव्य केलं आहे. “आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे शादी का घोडा शर्यतीतल्या घोड्याला निवडत आहे, म्हणजेच अनुभवी लोक तज्ज्ञांना निवडत आहेत”, असे निराशाजनक मत वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे एआयसीसी अधिवेशन १० दिवसांपूर्वी गुजरातमध्ये सुरू झाले. काँग्रेसने जाहीर केलेल्या भव्य पुनर्बांधणी योजनेचा भाग म्हणून हे अधिवेशन सुरू आहे. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मेवाणी हे अरवली जिल्हा काँग्रेस समितीचे सध्याचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासारखे चार प्रदेश काँग्रेस समितीचे निरीक्षक, एक एआयसीसी निरीक्षक यांच्यासह सहा जणांचे पॅनेल ठरवण्यात येणार आहे. यामधून संबंधित जिल्हा काँग्रेस समिती प्रमुखांची निवड करायची आहे.

अंतिम मंजुरी हाय कमांडच्या निर्णयावर अवलंबून

गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष ३० वर्षांपासून सत्तेत नाही. २०१७ पासून त्यांचे बरेच नेते भाजपाकडे जात आहेत आणि इथले ४१ जिल्हे आहेत जे काँग्रेससाठी एक मोठा डोंगर असल्याचे दिसत आहे. १६ एप्रिलला राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अरवली जिल्ह्यातील मोडासा इथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी “भाजपा आणि आरएसएस यांना राष्ट्रीय पातळीवर पराभूत करण्याचा मार्ग गुजरातमधून जातो. त्यांचा पक्षच त्यांना वैचारिक रूपात हरवण्यासाठी सक्षम आहे”, असे राहुल गांधी म्हणाले होते. प्रत्येक जिल्ह्यासाठी सहा नावांचा पॅनल १० मेपर्यंत तयार करण्यात येणार आहे. आधीपासूनच काँग्रेस प्रदेश काँग्रेस समिती निरीक्षकांवरून स्वत: संभ्रमात आहे. १८३ जणांपैकी किमान सहा-सात जणांना बदलावे लागले; कारण त्यांना हे लक्षात आले की ते स्वत: जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यामुळे नवीन निरीक्षक निवडण्यासाठी ते पॅनलचा भाग होऊ शकत नाही. त्यानंतर अहमदाबाद जिल्हा युनिटच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत एक विद्यमान आमदार आणि माजी आमदार भाजपासोबत असल्याचे उघड आरोप करण्यात आले. गेल्यावर्षी जुलैपासून या संदर्भातील दावे सुरू असल्याने हे अपेक्षित असायला हवे होते, असे काँग्रेसमधील काही सूत्रांनी कबूलही केले.

अहमदाबाद शहर जिल्हा समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार हिम्मतसिंह पटेल यांना निरीक्षक म्हणून वगळण्यात आले आहे. तसंच त्यांना भाजपाशी संबंध असल्याच्या आरोपांनाही सामोरं जावं लागत आहे. “पुरावे कुठे आहेत? भाजपाशी संबंध असते तर मी २३ वर्षांनी विधानसभा निवडणूक जिंकलो असतो का? आम्ही निर्णय घेणारे नाही, मी तिकीट वाटप करत नाही. आम्ही धरण्यावर बसणारे आहोत. शिवाय माझ्यावर इतके खटले सुरू आहेत की माझा पासपोर्टही पोलिसांकडेच आहे,” असे पटेल यांनी म्हटले आहे. २०१७ मध्ये पटेल अहमदाबाद पूर्वेतून निवडून आले होते. शनिवारी अहमदाबाद शहर युवक काँग्रेस विशाल सिंग गुर्जर आणि एका युवा नेत्यामध्ये एआयसीसी निरीक्षक बी. के. हरिप्रसाद यांच्या उपस्थितीत शा‍ब्दिक चकमक झाली. यावरून गुर्जर यांना निलंबितही करण्यात आले होते. काही निरीक्षकांच्या निवडीसंदर्भात असलेल्या मतभेदामुळेच मेवाणी यांच्या मनात नाराजी आहे. २०२२च्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे एकूण १७ आमदारांपैकी ४ आमदार भाजपाच्या गोट्यात सामील झाले आहेत, त्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.

द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मेवाणी यांनी सांगितले की, “भाजपा जिल्हा काँग्रेस समितीच्या निवडीत सहभागी आहे याबाबत आश्चर्य नाही. आम्हाला वाटते की, तडजोड केलेल्या लोकांना जितक्या लवकर काढून टाकले जाईल तितके चांगले. निवड प्रक्रिया एआयसीसी आणि राहुल गांधींच्या मनात असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. यामध्ये एआयसीसीची चूक नाही, तर काँग्रेसचे गुजरातमधील नेतृत्व याला जबाबदार आहे.” जुनागढ जिल्ह्यातील प्रदेश काँग्रेस समिती निरीक्षक असलेले माजी आमदार भरत मकवाना हेदेखील तक्रारी आणि पक्षपाताच्या दाव्यांबाबत बोलतात. “एकंदर प्रतिसाद चांगला आहे, काँग्रेस कायमच एका चळवळीप्रमाणे आहे. भाजपाकडे चांगली यंत्रणा आणि भरपूर पैसा आहे”, असे मकवाना यावेळी म्हणाले.

गुजरात काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार शक्तीसिंह गोहिल यांनी सांगितले की, “कोणाकडे जर दुसऱ्या पक्षाशी संबंध असल्याचा पुरावा असेल तर त्यांनी पुढे यावं. कोणी पक्षपातीपणा केला आहे पाहण्यासाठी काही एक्स-रे नाही; कोणाशी राजकीय वैर असलेले असे म्हणू शकतात. मात्र, योग्य माहितीशिवाय आपण कारवाई करू शकत नाही.” विद्यमान जिल्हा काँग्रेस समिती प्रमुखांना निरीक्षक म्हणून निवडण्यात आल्याची अडचण गोहिल यांनी सांगितली. “अनेक नेत्यांनी निरीक्षक होण्यात फारसा रस दाखवला नाही. तसंच ही प्रक्रिया दीर्घकालीन आहे. आम्ही फक्त जिल्हा काँग्रेस समितीसाठी अध्यक्ष निवडत नाही आहोत, तर इतर पदांसाठी एक गटही तयार करत आहोत”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहमदाबादमधील काँग्रेसच्या एका नेत्याने याला दुजोरा दिला आहे. “एका राजकीय पक्षाने नेहमीच व्यस्त असलं पाहिजे. इतक्या वर्षांत आमच्या पक्षात नियमित कामं झाली नाहीत. भाजपामध्ये मात्र याउलट परिस्थिती आहे. किमान ही प्रक्रिया रंगीत तालीम म्हणून तरी उपयोगी पडेल”, असे ते म्हणाले.
वाव आणि विस्वदरच्या रिक्त विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्यावर या प्रक्रियेचा परिणाम दिसून येईल. वाव काँग्रेसच्या आमदार गेनीबेन ठाकोर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला. त्या पक्षाच्या गुजरातमधील एकमेव खासदार आहेत. विस्वदरची जागा आम आदमी पक्षाच्या भपेंद्र भयांनी जिंकली, त्यांनी भाजपामध्ये जाण्यासाठी राजीनामा दिला. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत अपयश हाती आलेले गोपाल इटालिया यांना आपने विस्वादरचे उमेदवार म्हणून आधीच घोषित केले आहे. विस्वादर हे जुनागढ जिल्ह्यात येते. “आम्ही निश्चितच सहा जणांच्या पॅनलमधून उमेदवार निवडू, ही लढत त्रिपक्षीय असेल”, असे मकवाना यांनी सांगितले आहे.