गुजरातमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काल गुजरातमधील काडी आणि विसावदर पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. या निवडणुकीत काँग्रेस विजयापासून दूर राहिली. या निकालाच्या काही तासांनंतरच गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने चर्चाना उधाण आले आहे. त्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर चार तासांतच राजीनाम्याची घोषणा केली, ज्यामुळे खळबळ उडाली. काँग्रेस नेतृत्वाने तातडीने औपचारिक निवड होईपर्यंत अंतरिम राज्य प्रमुख म्हणून दानिलिमडा येथील आमदार शैलेश परमार यांची नियुक्ती केली आहे. नक्की काय घडले? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा का दिला? त्याविषयी जाणून घेऊ…

शक्तिसिंह गोहिल काय म्हणाले?

  • निवडणूक निकालावर शक्तिसिंह गोहिल म्हणाले, “पोटनिवडणुकीत दोन्ही जागा जिंकू न शकल्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो. मी माझा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्षांकडे सोपवला आहे.”
  • ते पुढे म्हणाले, “आम्ही ३० वर्षांपासून सत्तेत नसलो तरी आमच्या कार्यकर्त्यांनी वचनबद्धता दाखवली आहे. मी कठोर परिश्रम केले आहेत आणि नेहमीच माझ्या पक्षाला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे.”
  • मी आता काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता म्हणून काम करेन, असे ते म्हणाले.
  • “काँग्रेसमध्ये नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची परंपरा आहे. जर आपण दोन जागांपैकी किमान एक जागा जिंकली असती, तर परिस्थिती वेगळी असती,” असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शक्तिसिंह गोहिल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने चर्चाना उधाण आले आहे. (छायाचित्र-पीटीआय)

शक्तिसिंह गोहिल त्यांच्या वक्तृत्व, बुद्धिमत्ता आणि धोरणाची सखोल समज यांसाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. गुजरात काँग्रेसमधील अलीकडच्या संघटनात्मक बदलांवर त्यांनी म्हटले, “जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती तळागाळातील कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून करण्यात आली होती. ही निवड शक्तिसिंह गोहिल यांच्या जवळचे कोण आहे यावरून नव्हे, तर पक्षाचा दृष्टिकोन पुढे नेणार यावरून करण्यात आली होती.” काँग्रेसने २१ जून रोजी आपल्या शहर आणि जिल्हाध्यक्षांची घोषणा केली होती. अंतर्गत मतभेदांमुळे पोटनिवडणुकांमध्ये पक्षाची निराशाजनक कामगिरी दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. नवनियुक्त जिल्हा नेतृत्वात १० माजी आमदार आणि एका माजी खासदाराचा समावेश आहे.

कोण आहेत शक्तिसिंह गोहिल?

शक्तिसिंह गोहिल हे लिमडा राज्याचे (हनुभान) सहावे राजा हरिश्चंद्र रणजितसिंह गोहिल यांचे पुत्र आहेत. शक्तिसिंह स्वतः लिमडा येथील दरबार साहिब आहेत. ते एका राजघराण्यातून येतात. त्यांचे आजोबा रणजितसिंहजी १९६७ मध्ये गढडा मतदारसंघातून आमदार होते. शक्तिसिंह गोहिल यांचा जन्म ४ एप्रिल १९६० रोजी भावनगरच्या उमराळा तालुक्यातील लिमडा गावात झाला. त्यांनी सुरेंद्रनगरमधील सरकारी प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर त्यांनी सोनगड येथील आर्य समाज गुरुकुलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी भावनगरमधील सर पी. पी. इन्स्टिट्यूटमधून रसायनशास्त्रात पदवी मिळवली. त्यांनी राजकोटमधील सौराष्ट्र विद्यापीठातून एलएलबी, पत्रकारितेत पदविका आणि नंतर एलएलएमचे शिक्षण पूर्ण केले.

गेल्या काही वर्षांत त्यांनी जिल्हा पंचायतीसाठी राजकीयदृष्ट्या दोन निवडणुकाही लढवल्या. शक्तिसिंह गोहिल १९८६ मध्ये भावनगर जिल्हा युवक काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते आणि ते १९८९ मध्ये गुजरात राज्य युवक काँग्रेसचे सरचिटणीसदेखील राहिले आहेत. त्यानंतर शक्तिसिंह गोहिल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या आणि भावनगर जिल्हा पंचायतीचे ते उपाध्यक्ष झाले. १९९० मध्ये ते काँग्रेस समितीचे सदस्य झाले आणि त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसमध्ये असे फार कमी नेते आहेत की, ज्यांना तांत्रिक बाबींचीही जाण आहे आणि भाषेवर प्रभुत्व आहे. शक्तिसिंह गोहिल त्यांच्यापैकीच एक आहेत. गुजरात मंत्रिमंडळाच्या इतिहासात वयाच्या ३२ व्या वर्षी मंत्रिपद भूषविणारे सर्वांत तरुण नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १९९१ ते १९९५ पर्यंत त्यांनी शिक्षण, आरोग्य व वित्त ही खाती सांभाळली. सखोल वाचन आणि अभ्यास असलेला नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे. ते १९९०-९५, १९९५-९८, २००७-२०१२, २०१४ आणि २०१७ ते २०२० असे पाच वेळा आमदार राहिले आहेत. तर, २०२० मध्ये ते राज्यसभेचे खासदार झाले.