Rahul Gandhi voter fraud गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी मतचोरीबाबत निवडणूक आयोग आणि भाजपावर आरोप केले होते. त्यावरून सध्या देशाचे राजकारण चांगलेच तापले आहे. लोकनीतीच्या संचालकांनी डेटा चुकीचा आहे सांगत पोस्ट डिलिट केल्याने याप्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) मधील ‘लोकनीती’चे संचालक संजय कुमार यांनी महाराष्ट्रातील चार मतदारसंघांमध्ये मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात अनियमितता दर्शवणारी सोशल मीडिया पोस्ट डिलीट केली आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या आकडेवारीवरूनच काँग्रेसने मतचोरीचा मुद्दा उचलून धरला होता. नेमकं प्रकरण काय? संजय कुमार यांनी नक्की काय म्हटले? ही पोस्ट डिलीट झाल्याने राहुल गांधी अडचणीत कसे सापडले? जाणून घेऊयात…
संजय कुमार यांनी मागितली माफी
- डेटातील चुकीबद्दल संजय कुमार यांनी माफी मागितल्याने मतदार यादी, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि संशोधनाच्या विश्वासार्हतेवर राजकीय वादविवाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- सोमवारी (१८ ऑगस्ट) कुमार यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली की, नाशिक पश्चिम आणि हिंगणा येथे नोंदणीकृत मतदारांची संख्या सुमारे ४५ टक्क्यांनी वाढली, तर रामटेक आणि देवळाली येथे ती जवळपास ४० टक्क्यांनी कमी झाली. हे बदल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान दिसून आले होते.
- त्यांनी मंगळवारी (१९ ऑगस्ट) केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत केलेल्या त्यांच्या मागील पोस्टसाठी माफी मागितली.
- “२०२४ च्या लोकसभा आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकांच्या डेटाची तुलना करताना चूक झाली. आमच्या डेटा टीमने माहिती वाचताना ती चुकीची वाचली. ती पोस्ट काढून टाकली आहे. माझा कोणताही चुकीची माहिती पसरवण्याचा हेतू नव्हता,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
संजय कुमार यांनी काय दावा केला होता?
डिलीट करण्यात आलेल्या दोन पोस्टमध्ये कुमार यांनी दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघात ३.२८ लाख मतदार होते, त्यांची संख्या विधानसभा निवडणुकीत १.५५ लाखने (४७.३८%) वाढून ४.८३ लाख झाली. हिंगणा मतदारसंघातही मतदारांची संख्या ३.१५ लाखांवरून ४.५० लाखांपर्यंत वाढली, म्हणजेच त्यात १.३६ लाख (४३.०८%) मतदारांची भर पडली. इतर दोन मतदारसंघांमध्ये जवळपास ४० टक्के मतदारांची संख्या कमी झाली. रामटेक मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ४.६६ लाख मतदार होते, त्यात विधानसभा निवडणुकीत १.८० लाखांची घट झाली. याच काळात देवळाली मतदारसंघातही ही संख्या ४.५६ लाखांवरून २.८८ लाखांवर येऊन पोहोचली, म्हणजेच त्यात १.६८ लाख मतदारांची घट झाली.
‘न्यूज १८’ने भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत डेटाचे विश्लेषण केले. त्यात असे दिसून आले की, ३० मार्च २०२४ रोजी राज्यात ९.२३ कोटी मतदार होते. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत त्यांची संख्या ९.६३ कोटी झाली. याचाच अर्थ असा की, त्यात ४० लाखांपेक्षा जास्त मतदारांची वाढ झाली. कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी मतदार यादी अंतिम केली जाते. ही प्रक्रिया सहसा निवडणुकीच्या तारखेच्या एक महिना आधी पार पडते. राज्यात लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते २० मे २०२४ दरम्यान पाच टप्प्यांत झाल्या, तर विधानसभा निवडणुका गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाल्या.
‘मतचोरी’ मोहिमेवर परिणाम
या वर्षी फेब्रुवारीपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दावा करत होते की, २०२४ च्या लोकसभा आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान ३९ लाख नवीन मतदार जोडले गेले. कुमार यांनी शेअर केलेला डेटा महाराष्ट्रातील फक्त चार विधानसभा मतदारसंघांशी संबंधित होता आणि काही विरोधी पक्षनेत्यांनी तो सहायक पुरावा म्हणून वापरला होता. CSDS चा डेटा राहुल गांधी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सुरू केलेल्या ‘मतचोरी’ मोहिमेचा थेट आधार नाही, मात्र राज्यातील निवडणूक प्रक्रियेच्या सचोटीबद्दल यावरून चर्चा सुरू झाली आहे.
राहुल गांधींनी या महिन्याच्या सुरुवातीला बंगळुरूच्या एका विधानसभा मतदारसंघातून एक लाख बनावट मतदारांचा तपशील शेअर केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरोधात ‘मतचोरी’ मोहीम अधिकृतपणे सुरू केली. ही मोहीम कुमार यांच्या पोस्ट्सच्या काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. गांधी आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्रसह अनेक राज्यांसाठी मशीन-रीडेबल मतदार यादीची मागणीदेखील केली आहे.
माफीच्या पोस्टवर भाजपा आणि निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया
विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘एक्स’वरील ‘माफी’च्या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी कुमार यांच्या माफीच्या पोस्टला उत्तर देत त्यांच्या पूर्वीच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. “CSDS च्या संजय कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत केलेल्या ट्विटबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा आणि २०२४ च्या विधानसभा डेटाची तुलना करताना चूक झाली. त्यांचे ट्विट आता हटवण्यात आले आहे, पण त्याचा स्क्रीनशॉट इथे आहे. निवडणूक आयोगावर प्रश्न विचारण्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या डेटाचा उल्लेख केला होता,” असे बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भाजपा नेतेदेखील ‘माफी’च्या पोस्टचा वापर ‘मतचोरी’च्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी करत आहेत.
भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर केलेल्या अनेक पोस्ट्समध्ये म्हटले आहे की, ज्या संस्थेच्या डेटावर राहुल गांधींनी महाराष्ट्रातील मतदारांची बदनामी करण्यासाठी भर दिला, त्याच संस्थेने आता त्यांचे आकडे चुकीचे असल्याचे मान्य केले आहे. ते पुढे म्हणाले की, “कॉंग्रेसच्या महाराष्ट्रावरील खोट्या कथानकाला बळ देण्यासाठी CSDS ने पडताळणी न करताच डेटा प्रकाशित केला. हे विश्लेषण नाही, तर फक्त चुकीच्या गोष्टींना पुष्टी देण्याचा एक प्रयत्न आहे.” ते म्हणाले की, “राहुल गांधींनी तात्काळ बिहारमधील आपली ‘घुसपैठिया बचाओ यात्रा’ थांबवावी आणि भारताच्या जनतेची बिनशर्त माफी मागावी.”
राहुल गांधी सध्या आपल्या ‘मतचोरी’ मोहिमेचा भाग म्हणून बिहारमध्ये ‘मतदार अधिकार यात्रा’ आयोजित करत आहेत. ही १६ दिवसांची यात्रा १३०० किलोमीटर अंतर पार करून १ सप्टेंबर रोजी पाटणा येथे संपणार आहे. ही यात्रा २० पेक्षा जास्त जिल्ह्यांपर्यंत पोहोचणार आहे. ‘मतचोरी’च्या आरोपांवरून विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्यातील संघर्ष अजून संपलेला नाही. महाराष्ट्रातील मतदार यादीतील विसंगती आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरील वादविवाद सुरूच राहण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुका जवळ येत आहेत आणि राज्यात एसआयआर मोहीम सुरू असल्याने, मतदार यादीतील विसंगती आणि निवडणूक पारदर्शकता येत्या काळात वादविवादाचा एक प्रमुख मुद्दा होण्याची शक्यता आहे.