अविनाश पाटील
एकनाथ शिंदे यांनी सवतासुभा निर्माण केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार त्यांच्या गोटात गेल्यानंतरही शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक मात्र अजूनही शिवसेनेतच असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात दिसले. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतावेळी शक्तीप्रदर्शन आणि शिंदे गटात गेलेले खासदार हेमंत गोडसे यांच्याविरोधात उत्स्फूर्तपणे दिल्या जाणाऱ्या घोषणांतून सेनेचा हा बालेकिल्ला अजूनतरी शाबुत असल्याचे स्पष्ट झाले.
मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर नाशिक शहराने शिवसेनेला कायमच भक्कमपणे साथ दिली आहे. नाशिक येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिवेशनानंतरच राज्यात प्रथमच सेना-भाजप युतीची सत्ता आली होती, हा इतिहास आहे. आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा करीत एकनाथ शिंदे यांनी वेगळे अस्तित्व निर्माण केल्यानंतर जिल्ह्यातून माजी कृषीमंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर या दोघांच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेले खासदार हेमंत गोडसे यांनीही शिंदे यांना समर्थन दिले. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारीही शिंदे यांना साथ देतील, असे मानले जात होते. परंतु, तसे झाले नाही. एवढेच काय, नाशिक महापालिकेतील सेनेचे नगरसेवकही अजूनतरी ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. त्यामुळेच शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी संवाद यात्रा सुरू केल्यावर आदित्य ठाकरे यांनी भिवंडीनंतर नाशिकला प्राधान्य दिले.
जिल्ह्यात प्रवेश करतानाच इगतपुरी टोल नाक्यावर ग्रामीण भागातील शिवसैनिकांकडून भर पावसात झालेल्या स्वागताने ते भारावल्याचे दिसले. आमदार, खासदार सोडून जात असले तरी सामान्य शिवसैनिक अजूनही सोबत असल्याचे पाहून त्यांचा आत्मविश्वास वाढला.
नाशिक शहरात त्यांचे आगमन झाल्यावर नेहमीप्रमाणेच जल्लोषात त्यांचे स्वागत झाले. त्यानंतर रात्री पावसामुळे मनोहर गार्डन या ठिकाणी मेळावा झाला. मेळाव्यास हजारो शिवसैनिकांची गर्दी होती. उभे राहण्यासही जागा नसल्याने बाहेरही अनेक जण उपस्थित होते. महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणावर होती. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या. मंचावर शिवसेनेचे झाडून सारे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य भाषणासाठी उभे राहताच गर्दीकडून खासदार गोडसेंविरोधात उत्स्फूर्तपणे घोषणाबाजी सुरू झाल्यावर आदित्य यांनीच त्यांना थांबविले. शिवसैनिकांमध्ये सळसळणारे चैतन्य दिसून आल्याने आदित्य यांच्या वक्तृत्वालाही धार आली. बंड, उठाव वगैरे काही नाही, तर ही गद्दारीच असून तुम्हांला हे पटले आहे का, असा प्रश्न विचारल्यावर घोषणाबाजीने सभागृह दणाणून गेले.
पाहा व्हिडीओ –
मिळणाऱ्या प्रतिसादामुळे देहबोली पूर्णपणे बदललेल्या आदित्य यांच्या बोलण्यातील आत्मविश्वास मंचावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनाही भारावून गेला. एक नवीन आदित्य पाहावयास मिळाले, ही त्यापैकी काही पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया बोलकी म्हणावी लागेल. अलीकडेच संजय राऊत यांचाही शहरात मेळावा झाला होता. त्यांच्या मेळाव्यासही गर्दी असली तरी त्यांच्या घोषणाबाजीत उसने अवसानच अधिक होते. या उलट आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात नवीन जोष, नवा उत्साह दिसला.