प्रबोध देशपांडे

अकोला : महात्मा गांधींच्या अहिंसावादी मार्गाला आदर्श मानणाऱ्या काँग्रेस पक्षात चक्क बंदुकीने उडवून देण्याच्या धमकीपर्यंत पदाधिकाऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे. गटाबाजीमुळे अगोदरच विस्कळीत व कमकुवत झालेली अकोला काँग्रेस आपसी वादातच अडकली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला. अंतर्गत वादावादीमुळे पक्ष बेजार झाला आहे. खा. राहुल गांधी ‘प्रेमाची दुकान’ संबोधून ‘भारत जोडो’ची संकल्पना मांडत असले तरी त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी त्याला सुरुंग लावण्याचे काम करीत आहेत. या परिस्थितीत जिल्ह्यात काँग्रेसची चांगलीच वाताहत होत आहे.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या अकोला जिल्ह्यात काँग्रेस तीन दशकांपासून रसातळाला गेली. १९८९ पासून अकोला लोकसभेत काँग्रेसचा खासदार निवडून आलेला नाही, तर २००४ पासून जिल्ह्यातून काँग्रेसची विधानसभेवर देखील पाटी कोरीच. जिल्ह्यात काँग्रेसपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान आहे. तरीही नेते मंळळींना याचे कुठलेही सोयरसुतक नाही. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते गटातटात विभागले आहेत. विरोधकांचा सामना करण्यासाठी पक्ष बळकट करण्याऐवजी शह-काटशहाच्या राजकारणातच ते आपली शक्तीला पणाला लावतात. आगामी निवडणुकांसाठी इतर पक्ष संघटनात्मक बांधणीवर जोर देत असतांना काँग्रेसमध्ये मात्र ‘तोडातोडी’ची भाषा केली जाते. गटातटात विभागलेल्या काँग्रेसमध्ये नेहमीच वर्चस्वाची लढाई चालते. अतिशय क्षुल्लक कारणावरून देखील टोकाचे वाद घातले जातात. त्याचा प्रयत्य पुन्हा एकदा आला.

हेही वाचा… कोणाचे ऐकावे, अजितदादा की चंद्रकांतदादांचे ? अधिकारी बुचकाळ्यात

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अभय पाटील आणि प्रदेश महासचिव मदन भरगड यांच्यात शासकीय विश्रामगृहात बाचाबाची व वाद झाला. याच वादातून डॉ. पाटील यांनी बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याचा आरोप मदन भरगड यांनी केला. डॉ. पाटील यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. डॉ. पाटील लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या एका बैठकीत मदन भरगड यांनी उमेदवारीवरून काही टिप्पणी केली. ‘पॅराशूट’ लावून पक्षात आलेल्या नेत्यांना उमेदवारी कशी देणार, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावरून दोन्ही प्रदेश नेत्यांमध्ये वाद रंगला. या वादाची दखल प्रदेश काँग्रेसने घेतली. पक्षनिरीक्षकांमार्फत पदाधिकाऱ्यांचे मते जाणून अहवाल मागविण्याची औपचारिकता पूर्ण झाली. या प्रकरणात कुणावर व नेमकी काय कारवाई करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा… आजोबा नातवाच्या सांगाती!

लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्याऐवजी गटबाजी, पक्षांतर्गत खदखद, डावलणे, नाराजी आदींमध्येच पदाधिकारी गुंतले आहेत. काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षांविरोधातच प्रचंड असंतोष दिसून येतो. जिल्हाध्यक्ष पक्ष कार्यात विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनी दोन वेळा बैठका घेऊन त्यांच्याविरोधात नाराजीचा सूर आवळला आहे. पक्षांतर्गत हा वाद सुरू असतांनाच भरगड-पाटील वादाची त्यात आणखी वाढ झाली. काँग्रेसमध्ये प्रामुख्याने परंपरागत घराणेशाही सुरूच आहे. नव्या दमाच्या नेतृत्वाचा अभाव आढळतो. वर्चस्व वाद व अंतर्गत कुरघोडीमुळे जिल्हा काँग्रेस खिळखिळी झाली. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाला अपेक्षित जनाधार मिळत नाही. प्रदेश काँग्रेसने यासंदर्भात कठोर पावले उचलण्याची खरी गरज आहे.

हेही वाचा… धर्मांतरितांना आरक्षित संवर्गातून वगळण्यासाठी भाजपची मोहीम, नाशिकमध्ये आदिवासी बांधवांचा रविवारी मेळावा

निवडणुकांना कसे समोरे जाणार?

अकोला जिल्हा भाजपचा गड असून ग्रामीण भागात वंचितचे वर्चस्व आहे. संघटनात्मक ताकद व गठ्ठा मतपेढी ही दोन्ही पक्षांची जमेची बाजू. निवडणुकांमध्ये त्यांच्यापुढे अंतर्गत वादात अडकलेल्या काँग्रेसचा निभाव कसा लागणार? असा प्रश्न निर्माण होतो. लोकसभा व इतर निवडणुका लढण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून दावा केला जातो. मात्र, पक्षवाढीसाठी कुठलेही प्रयत्न होतांना दिसत नाहीत. अंतर्गत वादावादी करण्यातच काँग्रेस पदाधिकारी धन्यता मानतात.