दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपाचेच दोन बडे नेते आमनेसामने उभे होते. या निवडणुकीकडे बहुतेक खासदारांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीतील मतदार यादीत पंतप्रधान मोदींसह लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याही नावाचा समावेश होता.
दिल्लीतील प्रतिष्ठित कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या सचिव (प्रशासन) पदासाठी ही लढत होती. यात माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी विजयी झाले. ही निवडणूक इतकी लक्षवेधक का ठरली? निवडणुकीदरम्यान नक्की काय घडले? विरोधी पक्षातील नेत्यांनी राजीव प्रताप रुडी यांच्या नावाला आपले समर्थन का दिले? जाणून घेऊयात.
दिल्लीतील प्रतिष्ठित कॉन्स्टिट्यूशन क्लबची निवडणूक
प्रतिष्ठित कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील सचिव (प्रशासन) पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप सिंह रुडी यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार संजीव बालियान यांचा सुमारे १०० मतांनी पराभव केला. मंगळवारी मतदान पार पडले आणि रात्रभर मतमोजणी सुरू होती. बुधवारी पहाटे ४ वाजता रुडी यांनी पत्रकारांना त्यांच्या विजयाची माहिती दिली.

यंदाच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या प्रशासकीय निवडणुकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, कारण भाजपाच्या दोन बड्या नेत्यांमध्ये ही लढत होती. या निवडणुकीत मतदानास पात्र असणार्या खासदार आणि माजी खासदारांची संख्या १,२९५ होती, त्यापैकी ७०७ जणांनी मतदान केले. रुडी यांना ३९१, तर बालियान यांना २९१ मते मिळाली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होती.
भाजपाचे बडे नेते आमने-सामने
रुडी यांच्या विजयामुळे क्लबमध्ये त्यांची २५ वर्षांची कारकीर्द कायम राहिली आहे. या पदावर मागील दोन दशकांपासून ते बिनविरोध निवडून येत आहेत. त्यांनी क्लबचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे, ज्याला मतदारांनी पसंती दिली आहे. निवडणुकीदरम्यान रुडी यांच्या समर्थकांनी क्लबमध्ये झालेल्या मोठ्या सुधारणांचा उल्लेख केला. मात्र, काही लोकांनी बालियान यांना पाठिंबा दिला आणि रुडी यांचा कार्यकाळ खूप मोठा झाला असून तो संपायला हवा, असे मत व्यक्त केले. खासदार आणि माजी खासदारांऐवजी क्लबमध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून किमती वाढत असल्याच्या तक्रारी येत आहेत, असेही बालियान यांना पाठिंबा देणार्या खासदारांनी म्हटले.
झारखंडमधील भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकारांना सांगितले की, “डॉ. बालियान जिंकतील, कारण हा क्लब आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि वैमानिकांच्या हातात गेला आहे. तो परत खासदारांसाठी मिळवला पाहिजे आणि तो पुन्हा खासदार आणि माजी खासदारांच्या हातात असावा, त्यामुळेच आम्ही डॉ. बालियान यांना विजयी करू.”
रुडी यांना विरोधकांचा पाठिंबा
काँग्रेसचे बहुतांश खासदार आणि माजी खासदारांनी बालियान यांच्याऐवजी रुडी यांना पाठिंबा दर्शवला. या हाय-प्रोफाईल निवडणुकीत भारतीय राजकारणातील अनेक दिग्गजांनी मतदान करण्यासाठी क्लबमध्ये हजेरी लावली होती. त्यामध्ये गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा समावेश होता. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना बालियान यांनी सांगितले की, निकाल काहीही असो, क्लबची प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे. सर्व पक्षांचे खासदार आणि माजी खासदारांसाठी एकत्र येण्याचे हे एक व्यासपीठ असल्याने क्लब पुन्हा चर्चेत येणे ही एक चांगली गोष्ट आहे.
इतरही पदांसाठी निवडणुका
एका माजी भाजपा खासदारांनी बालियान यांच्या मताशी सहमती दर्शवली. ते म्हणाले, या निवडणुकीची सर्वात चांगली बाब ही आहे की, एका निष्क्रिय क्लबला पुन्हा चैतन्य लाभले आहे आणि अनेक खासदारांना त्याचे महत्त्व कळले आहे. या क्लबमध्ये सचिव (प्रशासन), सचिव (क्रीडा), सचिव (संस्कृती), कोषाध्यक्ष आणि ११ कार्यकारी सदस्य पदांसाठी निवडणुका होतात. काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी यापूर्वीच सचिव (क्रीडा) पद बिनविरोध जिंकले होते. त्याचप्रमाणे, डीएमके खासदार तिरुची शिवा यांनी सचिव (संस्कृती) पद आणि माजी भारत राष्ट्र समितीचे खासदार ए. पी. जितेंद्र रेड्डी यांनी कोषाध्यक्ष पद बिनविरोध जिंकले.
कार्यकारी समितीसाठी प्रदीप गांधी यांना सर्वाधिक ५०७ मते मिळाली, तर नवीन जिंदाल यांना ५०२ मते मिळाली. काँग्रेसचे दीपेंद्र हुडा, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन, भाजपाचे प्रदीप कुमार, काँग्रेसचे जसवीर गिल, सपाचे अक्षय यादव, शिवसेनेचे अप्पा राव बारणे, टीएमसीचे प्रसून बॅनर्जी आणि बीजदचे कलिकेश सिंग देव यांचीही कार्यकारी समितीवर निवड झाली.
हे क्लब १९४० च्या दशकात खासदारांसाठी स्थापन झाले. या क्लबमध्ये कॉन्फरन्स रूम, कॉफी क्लब आणि आउटडोअर कॅफे आहे. तसेच खासदारांसाठी लाउंजबरोबरच बिलियर्ड्स रूम, जिम, युनिसेक्स सलून आणि स्विमिंग पूलही आहेत.