In pachora bhadgaon Jalgaon assembly MLA Kishor Patil Will have to fight on two front one against Shiv Sena and BJP also | Loksatta

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील शिवसेना अन् भाजपच्या वेढ्यात

आमदार किशोर पाटील यांना आता एकाचवेळी घरातील आणि बाहेरील अशा दोन्ही विरोधांना तोंड देत राजकीय वाटचाल करावी लागणार आहे.

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील शिवसेना अन् भाजपच्या वेढ्यात
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील शिवसेना अन् भाजपच्या वेढ्यात

दीपक महाले

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे कितीही गोडवे गात असले तरी ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर शिंदे गट आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यापर्यंत हा गोडवा अद्यापही पाझरलेला नसल्याचे उघड होत आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे त्याचेच एक उदाहरण म्हणता येईल. खुद्द चुलत बहीण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी तयारी करु लागल्याने आधीच अस्वस्थ असलेले आमदार पाटील यांच्यावर शिवसेनेपाठोपाठ स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनीही पाचाेरा नगरपालिकेच्या अनुषंगाने भ्रष्टाचाराचा आरोप केल्याने त्यांची पुरती कोंडी झाली आहे. शिवसेना आणि भाजपचा हा घेरा तोडण्यात आता आमदार पाटील यांचे राजकीय कसब पणाला लागणार आहे.

अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात घडलेल्या घटनांचे पडसाद जळगाव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. आयाराम-गयारामांची संख्या वाढली. काही पक्षाशी एकनिष्ठ राहिले, तर काही कानोसाही घेत आहेत. शिंदे गटाचे पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. यातच मुंबईत शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पाचोरा नगरपालिकेत सुमारे दोनशेवर कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप करताच, पाचोरा येथेही भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी त्यांची री ओढत पाचोरा नगरपालिकेत सुमारे दोनशे कोटींचा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आमदार पाटील यांनी या आरोपांवर विशेषत: भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्यात काहीही असले, तरी पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपशी युती अशक्य असल्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

पाचोरा नगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी गटाने दोनशे कोटींचे भूखंड लाटल्याच्या आरोपानंतर आमदार पाटील यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अ‍ॅड. अभय पाटील यांनी केलेल्या आरोपांचे खंडण केले. कोणतेही पुरावे नसताना बदनामी करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिल्याने स्थानिक पातळीवर भाजपविरोधातील त्यांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राज्यात शिंदे गट व भाजपची युती असली तरी पाचोरा-भडगाव मतदारसंघात भाजपचे अमोल शिंदे आणि आपले आयुष्यात कधीच सख्य होणार नाही, असे पाटील यांनी नमूद केल्याने याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा निवडणुकीत निश्चितच पाहायला मिळतील.

हेही वाचा… Raj Thackeray Meets Fadnavis: राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, एक तास सुरु होती बैठक, चर्चांना उधाण

विशेष म्हणजे आमदार पाटील यांच्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष बाहेरचे असले तरी घरातूनच त्यांना घेरण्याची तयारी सुरू झाली आहे. घरातून होणारा विरोध कोणालाही त्रासदायकच असतो. पाचोऱ्याचे शिवसेनेचे पहिले आमदार दिवगंत आर. ओ. तात्या पाटील यांची कन्या वैशाली सूर्यवंशी या आमदार पाटील यांच्या चुलत बहीण आहेत. त्यांनी याआधी कधीही राजकीय आकांक्षा व्यक्त केली नव्हती. मात्र, आमदार पाटील हे शिंदे गटात जाताच त्यांनी राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. त्यांनी आधी आपण लोकसभा लढविणार असल्याचे जाहीर केले असले, तरी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी त्या विधानसभेच्या रिंगणातच उतरणार असल्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. वैशाली सूर्यवंशी यांनी आपण वडिलांच्या इच्छेनुसार ‘मातोश्री’सोबत राहणार असल्याचे जाहीर केल्याने भावाविरुद्ध बहीण अशी राजकीय लढाई सुरू झाली आहे. दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या नावे असणारे शिवालय हे आमदार किशोर पाटील यांचे संपर्क कार्यालय वैशालीताईंनी ताब्यात घेऊन तिथूनच संपर्काला सुरुवात केली आहे. त्यामुळे आमदार पाटील यांना आता एकाचवेळी घरातील आणि बाहेरील अशा दोन्ही विरोधांना तोंड देत राजकीय वाटचाल करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-08-2022 at 13:39 IST
Next Story
शिंदे-फडणवीस सरकार गडगडणार; जयंत पाटील यांचे भाकीत