पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात असतानाही विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे आता पुन्हा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात सक्रिय झाले आहेत. ‘सर्वपक्षीय राहिल्यामुळे काहीच मिळत नाही. लांडे यांचे तळ्यात-मळ्यात सुरू असते. त्यांनी एक भूमिका घ्यावी’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटकारल्यानंतर लांडे हे पुन्हा अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’त सक्रिय झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
विलास लांडे यांनी २००४ मध्ये तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून, तर २००९ मध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले. अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते. लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांनी अडीच वर्षे शहराचे महापौरपद भूषविले आहे. २०१४ मध्ये भाजपची लाट आल्यानंतर लांडे यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निश्चय केला होता, असे सांगितले जाते. प्रवेशासाठी मुंबईला जात असतानाच अचानक लांडे हे निम्म्यातूनच माघारी फिरल्याचे राजकीय वर्तुळात आजही बोलले जाते. २०१४ मध्ये भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. महेश लांडगे यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविली. त्या वेळी लांडे यांना पराभव पत्करावा लागला. २०१९ मध्ये लांडे हे अपक्ष, तर लांडगे हे भाजपकडून निवडणूक रिंगणात होते. दुसऱ्या वेळीही लांडे यांना लांडगे यांनी पराभूत केले.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर लांडे यांनी अजित पवारांसोबत राहणे पसंत केले. त्यांनी लोकसभेला शिरूरमधून उमेदवारी मागितली. परंतु, पवार यांनी लांडे यांची मागणी फेटाळली. उमेदवारी न मिळालेले लांडे हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या कायम संपर्कात राहिले. त्यांचे नातलग असलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करायला लावला. पण, लांडे यांनी प्रवेश केला नाही. आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगत राहिले. पुढे भोसरीतून गव्हाणे यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर लांडे यांनी गव्हाणे यांचा आणि पिंपरी, चिंचवडमध्येही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. विधानसभेला तिन्ही मतदारसंघांतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. अजित पवार यांच्यासोबतच असल्याचे लांडे सांगू लागले. तसेच अजित गव्हाणे यांनीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करावा, असा सल्ला दिला.
संदिग्ध भूमिकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लांडे यांना फटकारले. ‘विलास लांडे नेमके कोणत्या पक्षात आहेत. याबाबत लोक मला विचारतात. सर्वच म्हणतात लांडे आपलेच. मात्र, सर्वपक्षीय राहिल्यामुळे लांडे यांना काहीच मिळत नाही. त्यासाठी काही तरी ठोस भूमिका घ्यावी लागते. लांडे यांचे तळ्यात मळ्यात सुरू असते. एकनिष्ठ राहणारे अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष झाले. त्यामुळे लांडे यांनी भूमिका घ्यावी,’ अशी सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. त्यानंतर लांडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने राज्यभरात मंगल कलश यात्रा काढण्यात आली आहे. शहरातील यात्रेत लांडे यांचा सहभाग अग्रस्थानी होता. राष्ट्रवादीच्या फलकांवरही ते झळकले.
अजित पवारांचा नाईलाज
भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हे उघडपणे अजित पवार यांना विरोध करतात. त्यामुळे पवार यांनाही लांडे यांना सामावून घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, लांडे यांचा पूर्वीप्रमाणे दरारा आणि जनाधार राहिला नसल्याची स्थिती दिसून येते.