पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी नुकतीच महापालिका मुख्यालयात येत आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. शहरातील प्रलंबित प्रश्न, माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामे मार्गी लावण्याबाबत सुमारे अर्धा तास आयुक्तांशी चर्चा केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार हे शहरात पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढविली. पण, त्यांना अपयश आले. निवडणुकीतील अपयशानंतर पार्थ हे शहराकडे फिरकले नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी शहरात येण्यास सुरुवात केली. महाविकास आघाडीचे सरकार जाताच पार्थ यांनी पुन्हा शहराकडे पाठ फिरवली. महायुतीत मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेना (शिंदे) पक्षाला सुटला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी पार्थ यांना मिळाली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ते फारसे सक्रिय दिसले नाहीत. विधानसभा निवडणुकीत पिंपरीतील पक्षाच्या उमेदवाच्या प्रचारार्थ एकवेळेस ते शहरात आले. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पुन्हा शहरात सक्रिय झाले आहेत. पार्थ पवार यांच्याकडे पक्षाने शहराची धुरा सोपविण्यात आल्याचे दिसते. पार्थ यांनी बुधवारी महापालिकेत येऊन आयुक्तांची भेट घेतली. शहरातील प्रलंबित प्रश्न, माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामे मार्गी लावण्याबाबत आयुक्तांसोबत चर्चा केली.

अजित पवारांचे बेरजेचे राजकारण

पिंपरी-चिंचवडवर पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवार यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना ताकत देण्यास सुरुवात केली. पिंपरीतून तीनवेळा निवडून आलेल्या अण्णा बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्षपद दिले. माजी आमदार विलास लांडे यांना पक्षात सक्रिय होण्याची सूचना केली. तसेच विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात गेलेले माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह त्यांच्या ३० समर्थक माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात घेतले. शिवसेना (ठाकरे) पक्षात गेलेले मोरेश्वर भोंडवे, चिंचवडमधून अपक्ष लढलेले भाऊसाहेब भोईर हे पुन्हा राष्ट्रवादीत (अजित पवार) सक्रिय झाले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजोग वाघेरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका उषा वाघेरे याही राष्ट्रवादीत सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे पवार यांनीही बेरजेचे राजकारण करत दुरावलेल्या सर्वांना पुन्हा सोबत घेतले आहे.

बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी…

राज्यातील सत्तेत एकत्रित असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांचे महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शहरात चार आमदार असलेल्या भाजपने शंभर नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला आहे. भाजपला सत्ता कायम ठेवायची असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पुन्हा महापालिका काबीज करायची आहे. त्यामुळे महायुती होईल की नाही याबाबत साशंकता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि पार्थ यांच्याकडून आयुक्तांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पवार कुटुंबातील तीन सदस्य सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची प्रभागातील कामे मार्गी लावावीत, यासाठी पार्थ पवार यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. तसेच महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला.- फजल शेख, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)