अलिबाग- युती आणि आघाडीच्या राजकारणात रायगड जिल्ह्यात स्वबळावर उमेदवार निवडून आणण्याची ताकद एकाही पक्षाची राहिलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी मित्रपक्षांच्या मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या मतांवार तटकरे यांची मतदारसंघातील वाटचाल अवलंबून असणार आहे. कारण रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी एकच विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. अलिबाग, महाड आणि दापोली या तीन विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व आहे. तर पेण मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे मित्र पक्षांची मदत तटकरेंसाठी महत्वाची असणार आहे.

हेही वाचा…नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहे. शेकाप आणि काँग्रेसच्या या दोन प्रमुख पक्षांच्या मतांवर त्यांची वाटचाल अवलंबून असणार आहे. कारण रायगड लोकसभा मतदारसंघातील केवळ गुहागर या एकमेव विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. अशा वेळी शेकाप आणि काँग्रेसची मदत गीतेंसाठी महत्वाची असणार आहे. अलिबाग आणि पेण या दोन विधानसभा मतदारसंघात शेकापचे संघटन मजबूत आहे. तर श्रीवर्धन आणि महाड मध्ये काँग्रेसची पांरपारीक मते आहेत. या मतांवर गीते यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

युती आणि आघाडीच्या राजकारणामुळे रायगड जिल्ह्यात स्वबळावर निवडून येण्याची ताकद एकाही पक्षात राहीलेली नाही. अशातच गेल्या पाच वर्षात रायगड जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दोन गट पडले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली आहे. अशा वेळी राजकीय पक्षाप्रमाणेच मतदारांमध्येही संभ्रमावस्थेत आहे. हा संभ्रम दूर व्हावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न सुरु केले असल्याचे सध्या पहायलला मिळत आहे.

हेही वाचा…“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान

रायगड आणि मावळ या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय शेकापने घेतला आहे. दोन्ही मतदारसंघात शेकापने इंडीया आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा जाहीर केला आहे. दोन्ही मतदारसंघात शेकापची किमान २ लाख मते असल्याचा दावा पक्षांनी केला आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघात ही शेकापची मते निर्णायक भूमिका बजावतील असा विश्वास शेकाप नेत्यांनी व्यक्त केला