सोलापूर : महापुरुषांचे पुतळे शासनाची परवानगी न घेताच परस्पर उभारण्याची मालिका सोलापूर जिल्ह्यात सुरू असून यात राजकीय पक्षांची आक्रमकता पाहता महायुती शासनाची भूमिकाही अप्रत्यक्षरीत्या त्यास प्रोत्साहन देणारी असल्यामुळे प्रशासनाची कोंडी आणि तेवढीच डोकेदुखी होत असल्याचे पाहायला मिळते. माळशिरस, बार्शी, मोहोळच्या पाठोपाठ आता करमाळा तालुक्यातही महापुरुषाच्या पुतळ्याच्या उभारणीवरून राजकारण होत आहे. त्याचवेळी विशेषतः सत्ताधारी घटक पक्षांच्या दबावांमुळे प्रशासनाला थेट कारवाई करणे कठीण होत आहे.

करमाळा तालुक्यातील शेटफळ गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना अर्धपुतळा हटवून त्या ठिकाणी उंच चबुतऱ्यावर शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा परस्पर उभारण्यात आला आहे. त्यावरून प्रशासन आणि करमाळा तालुक्यातील राजकीय पक्षांमध्ये जुंपली आहे. प्रसंगी रक्त सांडू, पण छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारल्याशिवाय राहणार नाही, हिंमत असेल तर प्रशासनाने कारवाई करूनच दाखवावी, असे इशारे दिले जात आहेत. पुतळा उभारण्याच्या बाजूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे शेटफळ गावकऱ्यांच्या बाजूने प्रशासनाला आव्हान देत पुढे सरसावले आहेत. शासनाच्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करू, असे सांगायचे आणि त्यानुसार नियम अटींची पूर्तता करण्यापूर्वी रातोरात महापुरुषाचा पुतळा बसवायचा आणि वर पुन्हा प्रशासनालाच दबावतंत्राद्वारे अडचणीत आणायचे, असा प्रकार शेटफळ गावी होत असल्याचे पाहायला मिळते.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

हेही वाचा – लोकांमध्ये नाराजी असल्याचे सर्वेक्षणामधून कळताच भाजपाकडून एलपीजी गॅसच्या किमतीत मोठी कपात

विनापरवाना उभारण्यात आलेला शिवछत्रपतींचा पुतळा हटविण्यासाठी प्रशासनाने कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शेटफळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यात आक्रमक झालेले ग्रामस्थ प्रशासनालाच आव्हान देत आहेत. सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेले आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

शेटफळ गावी साधारणः २० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा उभारला होता. तो आता जुना झाल्यामुळे नवीन अश्वारूढ पुतळा उभारण्यात आल्याचे शेटफळ ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या नव्या पुतळ्याच्या उभारणीकामी सर्व कायदेशीर नियम व अटींची पूर्तता करू. पण पुतळा हटविण्याबाबत बळजबरी करू दिली जाणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनीही या नवीन पुतळ्याच्या उभारणीसंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास आपण स्वतः शेटफळला येऊ, अशी भूमिका भ्रमणध्वनीद्वारे शेटफळ ग्रामसभेत विशद केली आहे. शिवसेना माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे शासन नियुक्त प्रशासकीय संचालक संजय गुटाळ आदींनी शेटफळच्या ग्रामसभेत शिवछत्रपतींचा नवीन पुतळ्याचा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.

हेही वाचा – सांगली शहरातही भाजपमधील गटबाजी वाढली

यापूर्वी माळशिरस तालुक्यात वेळापूर व इतर काही गावांमध्ये स्थानिक राजकीय संघर्षातून छत्रपती शिवरायांसह महात्मा फुले, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे पुतळे एका रात्रीत एका पाठोपाठ एक तेही प्रशासनाला पूर्ण अंधारात ठेवून परस्पर उभारण्यात आले होते. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी हे अनधिकृत पुतळे हटविणे भाग पडले होते. त्यानंतर मोहोळ तालुक्यातील पेनूर गावातही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात उभारण्यात आला असता पोलिसांनी कौशल्य पणाला लावून तो पुतळा हटविला होता. बार्शी तालुक्यातील वैराग येथेही शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा ग्रामस्थांनी परस्पर उभारला असता प्रशासनाने पुतळा हटविण्यासाठी पावले उचलली होती. त्यावेळी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. परंतु ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पुतळा हटविणे शक्य झाले नाही. परंतु अनेक दिवस तो पुतळा कापडात गुंडाळला गेला होता. शेवटी कोल्हापूरचे छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे यांनी बार्शीत येऊन आंदोलनाचा इशारा दिला असता अखेर शिवछत्रपतींचा बंदिस्त पुतळा खुला झाला. पुतळ्याच्या कायदेशीर बाबींचा प्रश्न अनुत्तरीतच आहे. वैरागच्या नंतर अलिकडे सोलापूर-पुणे महामार्गावर शहराजवळ कोंडी गावातही ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात उभारला असता प्रशासनाने हरकत घेतली होती. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असता प्रशासन मवाळ झाले. पुतळा जैसे थे स्वरूपात कायम आहे.

खरे तर कोणत्याही महापुरुषाचा पुतळा सार्वजनिक रस्त्यावर वा एखाद्या संस्थेत रस्त्याच्या अग्रभागी उभारावयाचा झाल्यास त्यासाठी प्रत्यक्ष पुतळा उभारण्यापूर्वी गृहखात्यासह सार्वजनिक बांधकाम, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर संबधित विभागाची कायदेशीर परवानगी घेणे बंधनकारक असते. यापूर्वी सोलापूर शहरात दिवंगत माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा सात रस्त्यावर उभारताना कायदेशीर पेच निर्माण झाला होता. न्यायालयीन लढाईही झाली होती. शेवटी सोलापूर महापालिकेला कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच पुतळा उभारावा लागला होता. कायदेशीर मंजुरी न घेताच परस्पर सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे उभारणे आणि त्यात प्रशासनाला हस्तक्षेप करणे भाग पडणे, त्यातून पुतळा हटविण्याची कारवाई होणे म्हणजे महापुरुषांची अवहेलना म्हणायचे. अशी अवहेलना करून महापुरुषांचे पुतळे उभारणे आणि त्यात राजकीय हितसंबंधी मंडळींनी आक्रमक भूमिका घेऊन वातावरणात तणाव निर्माण करणे या गोष्टींचा शासनाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. महापुरुषांचा पुतळा उभारायला सहसा कोणाचाही विरोध असण्याचे कारणच नाही. परंतु त्यासाठी आवश्यक कायदेशीर परवानगी मिळविणे तेवढेच गरजेचे असते. कायदेशीर परवानगी घेऊन महापुरुषांचे पुतळे उभारण्यात खरी शान आणि पुरुषार्थ असतो. याकामी महायुती शासनानेच पुतळाप्रेमींचे मनपरिवर्तन करण्याची वेळ आली आहे.