बीड : राजकारण आणि सत्ता या समीकरणात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची घडी अजूनही बसलेली नाही. विधानसभा निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर जयदत्त क्षीरसागर यांना अद्यापही राजकीय सूर सापडलेला नाही. अशा परिस्थितीत राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले राजकीय संबंध कायम ठेवत आता जयदत्त क्षीरसागर यांनी केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे.

अहमदाबाद येथे झालेल्या गुजराती तेली समाजाच्या दोन दिवसीय संमेलनाच्या व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह आणि ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर एकत्र आले होते. यामुळे जयदत्तअण्णांच्या राजकीय वाटचालीबद्दल चर्चा घडू लागली आहे. बीड जिल्ह्यातील ओबीसी नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर त्यांची भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढत गेली. याच कारणावरून त्यांना शिवसेनेतून काढण्यात आले. त्यानंतर मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी नव्या पक्षात जाण्याची चाचपणी सुरू केली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असली तरी त्यांच्या पक्षप्रवेशाला जिल्ह्यातूनही तेवढाच विरोध होत राहिला.

हेही वाचा – चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा तीन तिघाडा काम बिघाडा…

क्षीरसागर यांचा भाजपात प्रवेश होणार नाही आणि त्यांना प्रवेश दिलाच तर आम्ही सर्वजण पक्ष सोडू अशी भूमिका जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेक वेळा जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे अद्यापही जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका आणि नव्या पक्षाचा शोध संपलेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी भाजप, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट, काँग्रेस, शिवसंग्राम या सर्वांना सोबत घेऊन जयदत्त क्षीरसागर यांच्या ४० वर्षांच्या सत्तेला जबरदस्त हादरा दिला. सर्वपक्षीय महाआघाडी अशीच कायम राहिल्यास आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही प्रमुख सत्ता स्थानांना तडे जातील, याची भीती जयदत्त क्षीरसागर समर्थकांना आहे. त्या दृष्टीने पुन्हा एकदा नव्या पक्षाचा शोध घेण्याचे आव्हान जयदत्त क्षीरसागर यांच्यापुढे आहे.

हेही वाचा – कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीकडून उमेदवारांची चाचपणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अहमदाबाद येथे गुजराती तेली समाजाच्या दोन दिवसीय संमेलनात अखिल भारतीय तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रित करण्यात आले होते. संमेलनाच्या व्यासपीठावर गृहमंत्री अमित शाह आणि माजी मंत्री क्षीरसागर यांची भेट झाली. देशात जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी आपल्या भाषणातून केली. संपूर्ण भारतभर तेली समाजाला राजकीय भागीदारी मिळावी अशी अपेक्षादेखील क्षीरसागर यांनी व्यक्त केली. अमित शाह यांनीही त्या पद्धतीने निश्चितच समाजाला संधी मिळेल. कारण भारतातील प्रत्येक राज्यात, तालुक्यात भारतीय जनता पार्टीमध्ये तेली समाजाचा कार्यकर्ता सोबत असेल तर संपूर्ण समाज एका उद्देशाने प्रेरित होऊन काम करतो असे सांगितले. दरम्यान संमेलनाच्या व्यासपीठावरून जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केलेली अपेक्षा आणि केंद्रीय नेतृत्व अमित शाह यांनी त्यावर केलेले भाष्य आगामी काळात जिल्हा भाजपात एका नव्या नेतृत्वाला प्रवेश देण्याचे संकेत तर नाहीत ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.