लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा कागलमध्ये आयोजित केला आहे. तर याच दिवशी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा कागलमध्ये होत असल्याने या दोन्ही घटनांची चर्चा होत आहे. घाटगे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कागलचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे येथे गेली पाच वर्षे विधानसभेची तयारी करणारे समरजित घाटगे यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. नुकतीच त्यांनी दिल्लीवारी केली. तेथे राष्ट्रीय साखर संघाच्या कार्यक्रमात चहापानाच्या निमित्ताने शरद पवार असलेल्या ठिकाणी तेही उपस्थित होते. मात्र, या वेळी काही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येते. आपण देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचे घाटगे यांनी सांगितले.

आणखी वाचा-राजकारण सोडणार नाही, नवा पक्ष काढणार – चंपाई सोरेन

‘कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर निर्णय’

दरम्यान, आपली आगामी राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी घाटगे यांनी शुक्रवारी त्यांच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून ते आपली भूमिका निश्चित करणार आहेत. गेले काही दिवस घाटगे याबाबत कार्यकर्त्यांशी वैयक्तिक चर्चा करीत होते. त्या भूमिकेचे पडसाद या मेळाव्यात उमटतील, असे दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटगेंना रोखणार महाडिक

कागलच्या विधानसभेच्या राजकीय परिस्थितीमुळे समरजित घाटगे यांची अडचण झाली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाणार आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी सांगितले.