जालना – महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. गोरंट्याल बुधवारी मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
गोरंट्याल यांनी तीन वेळेस काँग्रेस पक्षाकडून जालना विधानसभेचे कॉग्रेस पक्षाकडून प्रतिनिधित्व केलेले आहे. मुळात स्थानिक नगरपरिषदेच्या राजकारणातून पुढे आलेले त्यांचे नेतृत्व आहे. जालना नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी ते राहिलेले आहेत. मावळत्या लोकनिर्वाचित नगरपरिषदेचे अध्यक्षपद त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांच्याकडे होते. भाजपमध्ये प्रवेशाची त्यांची तयारी पूर्ण झाली असून आता पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा तेवढी बाकी आहे. परंतु त्याआधीच त्यांनी जालना महानगरपालिकेची पहिली निवडणूक भाजपने स्वतंत्र लढवावी असा मनोदय व्यक्त केला आहे. भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढवावी असे आपण पक्षाच्या श्रेष्ठींना सांगणार असल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
मागील दोन-तीन दिवसांपासून गोरंट्याल कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. महानगरपालिकेची स्वतंत्र निवडणूक लढविली तर भाजपचे किती नगरसेवक निवडून येऊ शकतील , याचा अंदाज या बैठकांमधून घेतला जात आहे. गोरंट्याल यांच्या मुंबईतील पक्ष प्रवेशाच्या वेळी काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
मागील पस्तीस – चाळीस वर्षात जालना नगरपरिषदेचे अध्यक्षपद एकदाच भाजपकडे राहीलेले आहे. साडेतीन दशकांपूर्वी कैलास गोरंटयाल यांचे चुलते व्यंकटेश गोरंटयाल भाजपकडून नगराध्यक्षपदी निवडून आले होते. त्यानंतर एकदाही जालना शहराचे नगराध्यक्षपद भाजपकडे आलेले नाही.
मागील काळात नगरपरिषदेच्या सर्व निवडणुका भाजप आणि शिवसेनेच्या युतीने एकत्र लढविलेल्या आहेत. शिवसेनेचे नगरसेवक अधिक निवडून येत राहिल्याने यापूर्वी युतीमध्ये एकदाही नगराध्यक्षपद भाजपच्या वाट्याला आलेले नाही. जेव्हा ‘युती’स बहुमत मिळाले तेव्हा अध्यक्षपद शिवसेनेकडे आणि उपाध्यक्षपद भाजपकडे अशी वाटणी यापूर्वी कायमच राहिलेली आहे.
ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे सलग पाच वेळेस जालना लोकसभा मतदार संघातून निवडून आले तरी जालना नगर परिषदेचे अध्यक्षपद भाजपकडे येऊ शकले नाही . आता नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालेले असल्याने पहिला महापौर भाजपचा व्हावा अशी या पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा अनेकदा व्यक्त झालेली आहे.
स्वतः रावसाहेब दानवे यांनी खासदार असताना ‘ जालना शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हातात द्या, विकास करून दाखवितो’ असे आवाहन जनतेला अनेकदा जाहीर कार्यक्रमांमधून केलेले आहे. दोनदा आमदार, पाच वेळेस खासदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सरचिटणीस, भाजपचे जिल्हा अध्यक्ष, केंद्रात दोनदा राज्यमंत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य इत्यादी पदांवर दानवे राहिलेले आहेत.
जिल्हा परिषद, भोकरदन नगरपरिषद, कांही पंचायत पंचायत समित्याही त्यांच्या अधिपत्त्याखाली राहिलेल्या आहेत. परंतु एवढे असूनही जालना नगरपरिषद कधीही दानवे यांच्या अधिपत्त्यायाखाली राहिलेली नाही. म्हणजे एकदाही भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकलेला नाही. त्यामुळे गोरंट्याल यांना भाजपमध्ये घेण्यामागे जालना महापालिकेच्या पटमांडणीचा डाव असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर भाजपचा व्हावा ही सुप्त इच्छा दानवे यांच्या मनात असावी असे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मानले जाते.
कांही दिवसांपूर्वी भाजपच्या जालना शहर जिल्हा अध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू भास्कर दानवे यांची वर्णी लागली त्यावेळीही महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या दृष्टीने भाजपची ही वाटचाल असल्याचे स्पष्ट झाले होते. आता माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमधील अधिकृत प्रवेशाच्या अगोदरच भाजपने स्वबळावर महानगरपालिका निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने माध्यम प्रतिनिधींजवळ व्यक्त केलेले वक्तव्य स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.